आजकाल सर्व कामे डिजिटल पद्धतीने केली जातात. मग ऑफिसमध्ये काम करणारे लोक असो किंवा विद्यार्थी असो, आजकाल प्रत्येक जण ईमेलचा वापर करतो. त्यात अगदी कॉलेजचे प्रोजेक्ट सबमिशन असो, कंपनीला सीव्ही पाठवायचा असो, बॉसला कामाचा रिपोर्ट द्यायचा असो किंवा कोणाला फोटो पाठवायचे असोत, तुमच्यापैकी अनेक जण ईमेला वापर करतात. त्यात तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, ईमेल पाठवताना तुमचा बॉस किंवा टीममेट सांगतात की, मला CC किंवा BCC मध्ये ठेव. यावेळी ईमेल ड्राफ्ट करताना त्यावर तुम्हालाही TO, CC आणि BCC असे तीन पर्याय दिसतात. पण याचा नेमका अर्थ काय हे आजही अनेकांनी माहीत नाही. तर आज आम्ही तुम्हाला या तीन शब्दांचा अर्थ आणि योग्य वापर कसा करायचा ते सांगणार आहोत.
CC चा नेमका अर्थ काय?
जेव्हा तुम्ही ईमेल ड्राफ्ट करता, तेव्हा तुम्ही तो ज्या व्यक्तीला पाठवू इच्छिता, त्याचा ईमेल आयडी टाकता. पण, खाली तुम्हाला आणखी दोन पर्याय दिसतात. एक म्हणजे CC आणि दुसरा म्हणजे BCC. टू फील्डमधील व्यक्तीला मेल पाठवण्याव्यतिरिक्त आपण CC द्वारे मेलमध्ये इतर कोणासही लूपमध्ये ठेवू शकता. ईमेलमधील या CC चा अर्थ कार्बन कॉपी (Carbon Copy). याचा अर्थ तुम्ही या व्यक्तीसोबत सर्व माहिती शेअर करीत आहात. तुम्ही CC मध्ये ज्या कोणाचा ईमेल आयडी टाकता ती व्यक्ती तुमचा संपूर्ण मेल पाहू शकते. तसेच वाचूही शकते. आणखी एक फायदा म्हणजे याच्या मदतीने तुम्हाला दोन वेगवेगळ्या व्यक्तींसाठी दोन वेगळे ईमेल लिहावे लागत नाहीत. याचा अर्थ एकाच वेळी दोन व्यक्तींना मेल पाठवता येतो.
उदा. जर तुम्हाला एखाद्या प्रोजेक्टशी संबंधित क्लायंटला मेल करीत असाल, तर त्याबद्दल तुमच्या मॅनेजरलाही माहिती द्यायची असेल, तर तुम्ही मॅनेजरला CC मध्ये ठेवून मेल करू शकता म्हणजे क्लायंटचा ईमेल अॅड्रेस TO मध्ये आणि मॅनेजरचा ईमेल अॅड्रेस CC मध्ये टाकावा लागेल.
BCC चा अर्थ काय?
सर्वप्रथम BCC चा अर्थ म्हणजे ब्लाइंड कार्बन कॉपी (blind carbon copy). BCC आणि CC मध्ये खूप फरक आहे आणि दोघांची काम करण्याची पद्धतही वेगळी आहे. जर तुम्हाला अधिक लोकांना ईमेल पाठवायचा असेल आणि इतर व्यक्तीचा ईमेल पत्ता कोणालाही कळू नये असे वाटत असेल, तर तुम्ही BCC फिल्ड वापरू शकता. BCC मध्ये असलेली व्यक्ती TO मध्ये असलेल्या व्यक्तीला दिसत नाही किंवा CC असलेल्या व्यक्तीलाही दिसत नाही.
सामान्यत: BCC हा शब्द वापरला जातो जेव्हा तुम्हाला एकाच वेळी अनेक लोकांना ईमेल पाठवायचा असतो आणि तो सगळ्यांनी बघू नये, अशी तुमची इच्छा असेल तर हा पर्याय वापरला जातो. BCC फिल्डमध्ये नमूद केलेले सर्व ईमेल अॅड्रेस लपले जातात आणि त्यामुळे ते To आणि CC फिल्डमधील लोक ते पाहू शकत नाहीत. अशा वेळी त्यांना वाटेल की, एक वेगळा ईमेल फक्त तुम्हालाच पाठवला गेला आहे. त्यामुळे गोपनीयता राखली जाते आणि ईमेल कोणाला पाठवला गेला आहे हे एकमेकांना कळत नाही.
BCC आणि CC ऑप्शनमध्ये आणखी एक फरक आहे. CC मध्ये ठेवलेल्या सूचीला मेलला मिळालेले उत्तरदेखील कळते; परंतु बीसीसी सूचीमध्ये उत्तर लपवले जाते.