दि. २० जून रोजी श्री देव जगन्नाथ रथ यात्रा उत्सव संपन्न झाला. सर्वसाधारणतः मराठी माणसाला जगन्नाथ म्हटलं की, ‘आपला हात जगन्नाथ’ ही म्हण पटकन आठवते. मराठीमध्ये विशिष्ट क्रियांसाठी ही म्हण वापरली जाते. काही अंशी नकारात्मक आहे. परंतु, श्री देव जगन्नाथ आणि ‘आपला हात जगन्नाथ’ ही म्हण यांचा ऐतिहासिक संदर्भ जाणून घेणे रंजक ठरेल…
‘आपला हात जगन्नाथ’ ही म्हण मूलतः हिंदीमधून मराठीमध्ये आली आहे. ‘अपना हात जगन्नाथ’ याचे ‘आपला हात जगन्नाथ’ असे रूपांतर मराठीने स्वीकारले. परंतु, या हिंदी म्हणीचा संदर्भ जगन्नाथपुरीच्या जगन्नाथ मंदिराशी आहे.
काय आहे ऐतिहासिक संदर्भ
जगन्नाथपुरीला असणारे जगन्नाथाचे मंदिर बघितले तर आपल्याला तीन मूर्ती दिसतात. बलभद्र, सुभद्रा आणि जगन्नाथ. या तीनही मूर्तींना हात नाही. यासंदर्भात एक कथा सांगितली जाते. त्रेतायुगाच्या शेवटी पुरीच्या समुद्रकिनारी एका वडाच्या झाडाखाली इंद्रनील मणीच्या स्वरुपात जगन्नाथ प्रकट झाले. त्यांच्या दर्शनाने लोकांना मोक्ष मिळू लागला. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून लोकांची मुक्तता फक्त इंद्रनील मणीचे दर्शन घेतल्याने होऊ लागली. ही गोष्ट यमदेवाला पटली नाही म्हणून त्यांने हा मणी खोल जमीनीत पुरून ठेवला. त्रेतायुगानंतर द्वापरयुगात मालवाचे राजे इंद्रद्युम्न यांना हा मणी पुरल्याची गोष्ट माहीत झाली. त्यांनी तप करुन विष्णूला प्रसन्न केले. विष्णूने त्यांना सांगितले की, पुरीच्या समुद्रकिनारी जाऊन तिथे वहात असणारे लाकडाचे ओंडके शोध. राजाने ते ओंडके शोधले, पण याचे काय करायचे ते राजाला माहीत नव्हते. म्हणून त्याने पुन्हा तप करुन नरसिंह देवाला प्रसन्न केले. नरसिंह देवाने या लाकडापासून विश्वकर्माच्या तीन वेगवेगळ्या प्रतिमा बनवण्यास सांगितले.त्याच या प्रतिमा म्हणजे मुर्ती बलभद्र, सुभद्रा आणि जगन्नाथ. या प्रतिमांना हात, कान, नाक, डोळे असे काहीही नव्हते. त्या लाकडाच्या स्वरुपातच होत्या.
हेही वाचा : विश्लेषण : प्राचीन काळी पृथ्वीवर १९ तासांचा दिवस होता ? काय सांगते नवीन संशोधन
पुढे नारदांनी या तीन प्रतिमांपासून तीन मूर्ती व त्यासाठी भव्य मंदिर उभारण्याची आज्ञा इंद्रद्युम्न राजाला केली. राजाने त्यासाठी विश्वकर्माला प्रसन्न केले. विश्वकर्म विष्णूकडे गेला व विष्णू स्वत: सुताराच्या रुपात राजाच्या दरबारात पोहोचले. सुतार अर्थात विष्णूने सांगितलं की, मी या प्रतिमांपासून भगवानांच्या मूर्ती तयार करेन, पण त्यासाठी एक अट असेल ती म्हणजे या तीन मुर्ती तयार होत नाहीत तोपर्यन्त गाभारा उघडायचा नाही. राजाने ही अट मान्य केली.सुताराने मंदिराच्या गाभाऱ्यात तीन प्रतिमांसह स्वत:ला कोंडून घेतले आणि ते मूर्ती तयार करण्याच्या कामाला लागले. काही आठवडे गेल्यानंतर राणीला सुताराच्या कामावर शंका आली. तीने गाभाऱ्याच्या दाराला कान देऊन आतून आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला कोणताच आवाज आली नाही. सुतार कोंडल्यामुळे मृत्युमुखी पडला असावा, अशी शंका तिला आली व तिने ही गोष्ट राजाच्या कानावर घातली.
हेही वाचा : विश्लेषण : उद्धव ठाकरे यांनी उल्लेख केलेले ‘गारदी’ नक्की आहेत तरी कोण? काय आहे गारदींचा इतिहास
राजाने दार उघडून पाहिले तर मूर्ती जवळपास पूर्ण झाल्या होत्या पण मूर्तीचे हात बनवण्याचे राहिले होते. दार उघडताच राजाने अट मोडली म्हणून सुतार गायब झाला आणि त्या मूर्ती तशाच स्थापन करण्यात आल्या. त्यामुळे या मूर्तींना हात नाहीत.
आता ओडिशा प्रांतात एक म्हण रुढ झाली ती म्हणजे भगवान जगन्नाथ हाताशिवाय संपूर्ण विश्वाचा सांभाळ करतात. आपल्याजवळ तर हात आहेत. आपण हात असल्यामुळे काहीही करु शकतो. आपल्या हातून सत्कर्म घडावे, चांगल्या गोष्टी घडाव्यात असा याचा उद्देश आहे. ‘अपना हाथ जगन्नाथ’ हे वाक्य चांगल्या कार्यासाठी वापरले जाते.
हेही वाचा : विश्लेषण : योग ते योगा : योगशास्त्राचा प्रवास…
मराठी भाषेत हे नकारात्मक अंगाने येते. विशिष्ट गोष्टीपुरते मर्यादित घेतले जाते. परंतु, या म्हणीला ऐतिहासिक आणि सकारात्मक संदर्भ आहे.