आपल्याला एखादी गोष्ट विकत घ्यायची असेल तर त्यासाठी आपण जवळपासच्या जनरल स्टोअरमध्ये जातो आणि आपल्याला जी आवश्यक वस्तू हवी ती दुकानदाराकडे मागतो, तो ती वस्तू आपल्याला देतो, आपण त्याची ठरलेली किंमत दुकानदाराला देतो अन् ती वस्तू घरी घेऊन येतो. डी मार्ट आणि तत्सम सुपर मार्केटमध्येही आपण साधारण हाच नियम पाळतो, पण तुम्ही असे कोणते दुकान पाहिले आहे की जिथे एकही दुकानदार नाही, गल्ल्यावर एकही माणूस नाही तरीही लोक त्या दुकानात येऊन खरेदी करतात आणि त्या खरेदी केलेल्या वस्तूंची किंमत देऊन जातात.
तुम्हाला वाटत असेल हे कोणते तरी अजब तंत्रज्ञान असलेले किंवा स्विगी झोमॅटोसारखे इंटरनेटवरचे दुकान असेल, पण तसे अजिबात नाही तर हे दुकान आहे ‘प्रामाणिकपणा’चे. हो हो अगदी बरोबर ऐकलेत या दुकानात एकदा तुम्ही शिरलात की तुमच्या प्रामाणिकपणाची इथे जणू परीक्षाच होते. इथे कुणीही माणूस नसतो, किंबहुना दुकानाला दारे किंवा खिडक्याही नाहीत, तरी इथला सगळा व्यवहार चोख होतो. चला तर जाणून घेऊ या या अजब दुकानाबद्दल.
आणखी वाचा : भारताकडे आहे जगातील पहिली हॉस्पिटल ट्रेन, रेल्वे कसा करते या ट्रेनचा वापर ? जाणून घ्या
गुजरातच्या छोटा उदयपूर या जिल्ह्यातील केवाडी गावातील हे दुकान आहे. हे दुकान २४ तास आणि आठवड्यातील सातही दिवस सुरू असते. या दुकानात येणारी माणसे ही त्यांना हवे असलेले सामान घेतात आणि त्याची किंमत त्या दुकानातच ठेवून जातात. गेल्या ३० वर्षांपासून हे दुकान लोकांच्या याच विश्वासावर सुरू आहे.
या दुकानाचे मालक आहेत सईद भाई आणि वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी हे दुकान सुरू केले. केवळ ग्राहकांच्या विश्वासावर हे दुकान सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. इतकेच नव्हे तर जेव्हा केव्हा सईद भाई दुकानात उपस्थित असतात तेव्हासुद्धा ते कोणतेही सामान देत नाहीत आणि कोणाकडूनही पैसे घेत नाहीत. या दुकानात दैनंदिन जीवनातील सगळ्या गोष्टी उपलब्ध असतात.
एवढे होऊनही मध्यंतरी या दुकानात एक छोटीशी चोरीही झाली होती, पण ही चोरी पैशांसाठी नसून चक्क काही बॅटरीजसाठी ही चोरी करण्यात आली होती. अर्थात यामुळे सईद भाई यांनीही या चोरीची तक्रार पोलिसांत केलेली नाही. आजच्या जगात आपल्या जवळच्या व्यक्तीवर आपण पूर्णपणे विश्वास ठेवू शकत नाही, अशा काळात ३० वर्षे केवळ लोकांच्या विश्वासावर अशा रीतीने दुकान चालवण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे.