Zero Gravity Places In India: निसर्गाची किमया जितकी नव्याने जाणून घ्याल तेवढं थक्क व्हायला होतं. वेळोवेळी सोशल मीडियावर असेच सुंदर नजारे दाखवणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आजही आपण अशाच एका नैसर्गिक चमत्काराची माहिती घेणार आहोत. पृथ्वीवर सर्वत्र गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. याच शक्तीमुळे कोणतीही वर उडणारी गोष्ट ही खाली खेचली जाते. पण तुम्हाला माहित आहे का पृथ्वीवर अशीही काही ठिकाणं आहेत जिथे गुरुत्वाकर्षण शक्ती शून्य आहे. म्हणूनच अशा ठिकाणी खाली पडण्यापेक्षा वस्तू हवेतच वर तरंगत राहतात किंवा वरील बाजूस फेकल्या जातात. विशेष म्हणजे यातील एक ठिकाण आपल्याच महाराष्ट्रातील कडेकपाऱ्यांमध्ये दडले आहे.
महाराष्ट्रातील शून्य ग्रॅव्हिटी ठिकाण
महाराष्ट्रात कोकणात एक असा धबधबा आहे जिथे पाणी वर हवेत उडते. आंबोलीतील कावळेसाद पॉईंट येथे उलटया दिशेने वाहणारा धबधबा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरतो. विशेषतः पावसाळ्यात हा धबधबा बघण्यासाठी प्रचंड गर्दी होते. कावळेसाद पॉईंटला एका बाजूला सपाट मैदान तर दुसऱ्या बाजूला दीड ते दोन हजार फूट खोल दरी आहे. थंडीत व पावसाळ्यात इथे धुक्यासह वरच्या बाजूला उडणारे धबधब्याचे पाणी पाहायला मिळते. काही वैज्ञानिकांच्या मते हे हवेच्या दबावामुळे होते तर काहींच्या मते या ठिकाणी शून्य गुरुत्वाकर्षण बळ आहे.
भारतातील मॅग्नेटिक पर्वत
भारतात लडाखच्या डोंगराळ भागात मॅग्नेटिक हिल्स आहेत. लेहवरून जवळपास ३० किमी अंतरावर समुद्रसपाटीपासून १४००० फूट उंचीवर हे ठिकाण आहे. असं म्हणतात की इथे तुम्ही उतारावर जरी गाडी उभी केली तरी ती खाली येत नाहीत. गाडीला ब्रेकही न लावता सपाट मैदानाप्रमाणे गाडी उतारावर सुद्धा स्थिर राहते त्यामुळे या ठिकाणाला मॅग्नेटिक हिल्स असे म्हंटले जाते. याशिवाय असं म्हणतात की या भागाच्या वरून उडताना विमान सुद्धा अधिक उंचावर जाते. कारण याभागातील मॅग्नेटिक शक्तीमुळे विमानात बिघाड होण्याची शक्यता असते.
हे ही वाचा<< १००० किलो वजन असूनही ढग हवेत कसे तरंगतात? गुरुत्वाकर्षणाने ढग जमिनीवर का पडत नाहीत?
दरम्यान, भारताप्रमाणेच इंग्लंडमध्ये सुद्धा शून्य गुरुत्वाकर्षण धबधबा आहे. डर्बीशायर पीक जिल्ह्यातील किंडर नदीच्या भागात उलट वाहणारा धबधबा आहे. नदीमुळे एक झरा वाहू लागतो व हवेच्या दबावाने यातील पाणी वरच्या बाजूला वाहू लागते.