देशात पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे अनेक लोक अस्वस्थ आहेत. इंधनांचे दर दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. असं असताना जर आपल्या कार वा बाइकसाठी वापरत असलेलं पेट्रोल-डिझेल इतकं महाग आहे; मग विमानातलं इंधन किती महाग असेल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. लोक विमानात बसण्यासाठी प्रवास करण्यासाठी उत्सुक असतात. पण, अनेकांना विमान कुठल्या इंधनावर चालतं हे माहीत नसेल. विमानात पेट्रोल किंवा डिझेल लागत नाही; मग कोणतं इंधन लागतं..सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्याची किंमत किती आहे. हेदेखील अनेकांना माहिती नाहीये. चला तर मग आज आपण याबद्दल जाणून घेऊ.
विमानात कुठलं इंधन वापरतात ?
विमानात वापरलं जाणारं जे इंधन आहे, ते दोन प्रकारचं असतं. पहिलं AVGAS आहे; जे लहान विमानात वापरलं जातं. दुसरं म्हणजे जेट ए व जेट बी अशा दोन प्रकारांतील जेट इंधन. त्यांच्या गुणवत्ता आणि अतिशीत बिंदूनुसार ते दोन प्रकारांमध्ये विभागलं गेलं आहे. जेट बी इंधन प्रामुख्याने लष्करी कार्यात आणि अत्यंत खराब हवामान परिस्थितीत वापरलं जातं. जेट बी इंधन हे जेट ए इंधनापेक्षा कमी शुद्ध आहे.
हेही वाचा >> भारतातील कोणत्या शहराला ‘वाईन कॅपिटल’ म्हणतात? तिथे प्रत्येक घरात वाईन बनते का? जाणून घ्या…
विमानात इंधन किती रुपये लीटरने मिळतं ?
आता या इंधनांच्या किमतींबद्दल जाणून घेऊ. विमानात वापरलं जाणारं इंधन हे पेट्रोल किंवा डिझेलसारखं लिटरमध्ये विकलं जात नाही, तर ते किलोलिटरमध्ये विकलं जातं. एव्हिएशन टर्बाइन इंधनाची किंमत प्रतिकिलोलिटर एक लाखाच्या वर आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये त्याची किंमत वेगवेगळी आहे. दिल्लीत हे इंधन १,१७,५८७.६४ रुपयांना; तर मुंबईत ते १,१६,५०५.२४ रुपये प्रतिकिलोलिटरनं विकलं जातं. चेन्नई आणि कोलकत्तामध्येही त्याच्या वेगवेगळ्या किमती आहेत. चेन्नईमध्ये ही किंमत १,२२,२२०.५९ रुपये; तर कोलकत्तामध्ये १,२४,३५९.८३ इतकी आहे. bankbazaar या वेबसाईटनं संबंधित आकडेवारी दिली आहे.