Why does milk overflow when boiled: दूध तापवताना अनेकदा गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागते. नेहमी गॅससमोर उभे राहूनच दूध तापवावे लागते. चुकून जरी थोडसं लक्ष इकडे तिकडे गेलं की दूध उतू गेलंच म्हणून समजा, त्यामुळे दूध तर वाया जातेच, पण स्वयंपाकघर आणि गॅसही खराब होतो. तुम्हालाही ही समस्या भेडसावत असेलच. आपल्या दैनंदिन जीवनात अशा अनेक गोष्टी घडत असतात, ज्या आपल्याबरोबर किंवा आपल्या आजूबाजूला घडत असतात. आपण त्यांना पाहतो, पण त्यांचे कारण आपल्याला माहिती नसते. यापैकी एक म्हणजे दूध उकळणे आणि ते पातल्याबाहेर जाऊन पडणे. पण, पाण्याच्या बाबतीत असे होत नाही. तुमच्या घरी असे अनेकदा घडले असेल की दूध उकळले म्हणून तुम्हाला फटकारले गेले असेल. पण, दूध उकळल्यावर भांड्यातून बाहेर का पडतं, याचा कधी तुम्ही विचार केला आहे का? तर पाण्याच्या बाबतीत बघायला गेलं तर असं काही होत नाही. पाणी जेव्हा उकळते तेव्हा भांड्याच्या बाहेर पडत नाही. असं का होतं? चला तर आज आपण यामागील वैज्ञानिक कारण आपण समजून घेऊया…
खरंतर दुधामध्ये चरबी, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, जीवनसत्त्वे आणि अनेक प्रकारची खनिजे असतात. दुधात प्रामुख्याने चरबीचे रेणू असतात आणि केसीन रेणू प्रथिनांच्या स्वरूपात आढळतात. दुधात ८७ टक्के पाणी, ४ टक्के प्रथिने, ५ टक्के लॅक्टोज असते. दुधात भरपूर पाणी असल्याने ते गरम केल्यावर वाफेत बदलू लागते, यामुळे चरबी, प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्वे आणि अनेक प्रकारची खनिजे घट्ट होऊ लागतात.
दूध जास्त उकळलं तर भांड्याबाहेर का येतं?
येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, दुधात आढळणारे चरबी, प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्त्वे आणि खनिजे वजनाने हलके असतात, ज्यामुळे ते गरम होताच दुधावर तरंगू लागतात. आता तळाशी सोडलेल्या मिश्रणात मोठ्या प्रमाणात पाणी शिल्लक राहते, जे गरम केल्यावर वाफेत बदलते, परंतु वर चरबी, प्रथिने आणि इतर गोष्टींचा थर वाफेला बाहेर पडू देत नाही. पण, सहसा ज्याच्याकडे जास्त संख्या असते तो जिंकतो. म्हणजेच, पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने वरचा थर काढल्यानंतर त्याचे बाष्पीभवन होते, त्यामुळे वरचा थर उकळून बाहेर पडतो आणि भांड्यात फक्त उरलेले दूध उकळत राहते. यावरून आईच्या फटकाराचा अर्थ आता तुम्हाला नक्कीच समजला असेल.
भांड्यातून पाणी का बाहेर पडत नाही?
खरंतर पाण्यात कोणत्याही प्रकारचे चरबी, प्रथिने, कार्बोहायड्रेट किंवा जीवनसत्व नसतात, त्यामुळे पाण्यावर कोणत्याही प्रकारचा थर तयार होत नाही. उकळत्या पाण्यातील वाफेला बाहेर पडण्यास कोणताही अडथळा येत नाही, त्यामुळेच गरम करूनही पाणी उकळत राहते आणि बाहेर पडत नाही.