Do You Know Why Dogs Chase Their Tails : तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, श्वान त्यांच्या शेपटीचा पाठलाग करतात, हे दृश्य बघायला खूपच मजेशीर असते, ज्यामुळे हे पाहून कधी कधी पाळीव प्राण्याच्या मालकाच्या चेहऱ्यावरसुद्धा हसू येते. वरवर ही कृती तुमचे मनोरंजन करत असली तरीही ते चिंतेचे कारणसुद्धा असू शकते. त्यामुळे तुमचा श्वान शेपटीचा पाठलाग का करतो हे समजून घेण्यासारखे असते. कारण- शेपटीचा पाठलाग करणे खेळकर वागण्यापासून ते वृद्ध श्वानांमधील तणाव किंवा वैद्यकीय समस्यांपर्यंत अनेक समस्यांचे कारण असू शकते.
WAAT पेट क्लिनिकचे संस्थापक, डॉक्टर हर्ष वीरभान यांनी सांगितले की, पिल्लू आणि श्वानांमध्ये शेपटीचा पाठलाग करणे (Why Dogs Chase Their Tails) सामान्यतः निरुपद्रवी असते. हे अगदी सामान्य आहे आणि अनेकदा खेळकरपणा, कुतूहल किंवा त्यांच्यासाठी ऊर्जा खर्च करण्याचा एक मार्गसुद्धा आहे. श्वानांची पिल्ले, अगदी लहान मुलांप्रमाणे खेळकर कृतींद्वारे वातावरण आणि स्वतःचा शोध घेतात. त्यामुळे स्वतःच्या शेपटीचा पाठलाग करणे हा त्याच शोधाचा एक भाग असू शकतो.
शेपटीचा पाठलाग करणे केव्हा चिंतेचा विषय ठरू शकतो? (Why Dogs Chase Their Tails)
लहान श्वान जेव्हा शेपटीचा पाठलाग करतात (Why Dogs Chase Their Tails) तेव्हा ते स्वाभाविक असते. पण, जेव्हा हे तुम्हाला मोठ्या पाळीव श्वानांमध्ये हे लक्षण दिसेल तेव्हा तुम्हाला अधिक लक्ष द्यावे लागेल. डॉक्टर वीरभान सांगतात की, मोठ्या श्वानांमध्ये शेपटीचा पाठलाग करणे हे सूचित करते की, तुम्हाला तुमच्या श्वानाकडे लक्ष देण्याची गरज आहे. हे कंटाळवाणेपणा, तणाव किंवा कधी कधी वैद्यकीय समस्यांमुळेसुद्धा उद्भवू शकते.
१. कंटाळवाणेपणा किंवा स्टिम्युलेशनचा अभाव : श्वान हा अत्यंत हुशार प्राणी आहे. शारीरिक आणि मानसिक स्टिम्युलेशनशिवाय ते वेळ घालवण्यासाठी शेपटीचा पाठलाग करण्यासारख्या वर्तनाचा अवलंब करू शकतात.
२. तणाव किंवा चिंता : ज्याप्रमाणे माणसांमध्ये चिंता विकसित होते, त्याचप्रमाणे श्वान चिंता किंवा तणावाचा सामना करण्याचे एक यंत्र म्हणून त्यांच्या शेपटीचा पाठलाग करू शकतो.
३. वैद्यकीय समस्या : पिसू (फ्लेअज) (fleas), गुदद्वारासंबंधीचा ग्रंथी अस्वस्थता किंवा अगदी न्यूरोलॉजिकल विकार यांसारख्या परिस्थितीमुळे शेपटीचा पाठलाग करण्यास प्रवृत्त होऊ शकते. या प्रकरणांमध्ये, चिडचिड किंवा अस्वस्थता दूर करण्यासाठी श्वान त्यांच्या शेपटीवर लक्ष केंद्रित किंवा त्याचा पाठलाग करू शकतात.
हे कसे थांबवावे?
श्वानाला शेपटीचा पाठलाग करण्यापासून थांबवण्यासाठी किंवा त्यावर उपाय करण्यासाठी, डॉक्टर वीरभान सुचवतात की, तुमच्या श्वानाला भरपूर शारीरिक, मानसिक उत्तेजन मिळेल याची खात्री करा. नियमित खेळाचे सत्र, प्रशिक्षण आणि सामाजिक संवाद यांसारख्या ॲक्टिव्हिटी तुमच्या प्रेमळ मित्राला व्यग्र आणि आनंदी ठेवण्यासाठी खूप मदत करू शकतात.
सतत किंवा वेडेपणाने शेपटीचा पाठलाग करणारी वर्तणूक करणाऱ्या श्वानांसाठी, पशुवैद्यकीय सल्लामसलत महत्त्वपूर्ण आहे. कधी कधी, हे गुदद्वारासंबंधीच्या ग्रंथीतील अस्वस्थता किंवा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरसारख्या अंतर्निहित समस्येचे लक्षण असू शकते. त्यामुळे मूळ कारण शोधणे महत्त्वाचे आहे, असा सल्ला डॉक्टर हर्ष वीरभान देतात.