आश्विन-कार्तिक महिना सुरु झाला की, थंडीची चाहूल लागतेच. पण त्यासोबत गावोगावी ऐकू येतात काकड आरतीचे सूर. काही गावांमध्ये आश्विन पौर्णिमेपासून पासून तर काही ठिकाणी कार्तिक महिन्यांमध्ये काकड आरती होते. काही मंदिरांमध्ये रोज पहाटे काकड आरती केली जाते. काकड आरती म्हणजे काय ? ती का करतात, तिच्या परंपरा जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
हिंदू धर्मामध्ये सकाळच्या वेळी देवाला जागवण्यासाठी करण्यात येणाऱ्या आरतीला काकड आरती असे म्हणतात. काही मंदिराची काकड आरती ही नित्य परंपरा असली महाराष्ट्रातील काही गावांमध्ये आश्विन-कार्तिक महिन्यात काकड आरती करण्यात येते. कार्तिक एकादशीपासून त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत गावोगावी काकड आरती करण्यात येते. महाराष्ट्रातील काही मंदिरांमध्ये प्रत्येक गुरुवारी, विशिष्ट काळात, उत्सवाच्या वेळी काकड आरती करण्यात येते.
हेही वाचा : चंद्रावर सापडलेल्या खनिजातून समोर आले चंद्राचे खरे वय; काय सांगते नवीन संशोधन…
काकड आरतीला काकडारती असेही म्हणतात. वारकरी संप्रदायामध्ये ब्राह्ममुहूर्तावर ‘काकडा’ ज्योतीने देवाची केलेली आरती म्हणजे काकडारती म्हटले आहे. एका अभंगामध्ये ‘भक्तीचिया पोटी बोध काकडा ज्योती’ म्हटले आहे, यावरून काकडा ज्योतीने आरती करण्यात येत असावी, असा संदर्भ मिळतो. तसेच स्वतःच्या आळशी, ऐषारामी प्रवृत्तीला काकड्याच्या रूपाने जाळून टाकावे, अशी भावना सांगणारी एक ओवी आहे, सत्व रज तमात्मक काकडा केला, भक्ती स्नेहेयुक्त ज्ञानाग्नीवर चेतविला। भक्तिभाव वाढवणे हे काकड आरतीचे प्रयोजन आहे. शैव आणि वैष्णव संप्रदायामध्ये ब्राह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयाच्या आधी देवाची आरती करण्यात येत असे. कालांतराने ही परंपरा सर्व हिंदू संप्रदायांनी स्वीकारली. संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास यांनी काकड आरतीच्या रचना केलेल्या दिसतात. काकड आरती नंतर भजन, भूपाळी म्हणण्याची परंपरा दिसून येते.
हेही वाचा : दारूची बाटली मिळणार आता बॉक्सशिवाय; का घेतला मद्य कंपन्यांनी हा निर्णय?
काकड आरतीला इंग्रजीमध्ये मॉर्निंग चॅटिंग म्हणजे सकाळी करण्यात येणारे नामस्मरण, भजन असे म्हणतात. प्रातःकाळी देवाचे नामस्मरण करावे, दिवसाची प्रसन्न सुरुवात करावी, सर्व गावाने एकत्र यावे, असे यामागचे उद्देश आहे. आश्विन-कार्तिक महिन्यांमध्ये पाऊस थांबलेला असतो, हलकी थंडी पडायला सुरुवात झालेली असते. कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो, त्यानंतर मंदिरांमध्ये उत्सवांना सुरुवात होते. एकूणच धार्मिक वातावरण असते. सामाजिक आणि सांस्कृतिक अंगांनी या काळात काकड आरतीला महत्त्व प्राप्त होते.