बालगंधर्व(Balgandharv) रंगमंदिर हे महाराष्ट्रातील प्रतिष्ठित नाट्यगृहांपैकी एक आहे. पुण्यातील जंगली महाराज रोडवर स्थित असलेल्या या रंगमंदिरात अनेक लोकप्रिय कलाकारांच्या प्रसिद्ध नाटकांचे प्रयोग सादर होताना पाहायला मिळतात. २६ जून १९६८ रोजी या रंगमंदिराचे उद्घाटन झाले होते. मात्र, बालगंधर्व रंगमंदिर उभे करण्याची संकल्पना कोणाची होती, हे तुम्हाला माहीत आहे का?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बालगंधर्व रंगमंदिराची संकल्पना कोणाची होती?

बालंगधर्व रंगमंदिराची संकल्पना प्रख्यात लेखक पु. ल. देशपांडे यांनी मांडली होती. तेव्हा बालगंधर्व हयात होते. नारायणराव राजहंस ऊर्फ बालगंधर्व यांच्या कारकि‍र्दीला सलाम म्हणून रंगमंदिर उभारणीचं काम व्हावं. त्या ठिकाणी एक थिएटर उभं राहावं, असे पु. ल. देशपांडे यांनी सुचवले होते. महत्वाचे म्हणजे, या रंगमंदिराचे भूमिपूजन ८ ऑक्टोबर १९६२ रोजी बालगंधर्व यांनीच केले होते. रंगमंदिराचे बांधकाम १९६६ मध्ये सुरू झाले. १५ जुलै १९६७ रोजी बालगंधर्व यांचे निधन झाले. पु.ल. देशपांडे यांनी या रंगमंदिराची रचना सर्वोत्तम असावी यासाठी प्रयत्न केले.

बालगंधर्व यांच्या जन्मदिनानिमित्त २६ जून १९६८ रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिराचे उद्घाटन झाले होते. त्याबरोबरच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. के. अत्रे होते. पु. ल. देशपांडे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते.

पु. ल. देशपांडे यांनी या कार्यक्रमात असे म्हटले होते की, नटेश्वराचं मंदिर इथे उभे राहत आहे. बालगंधर्वच्या बाजूला जो पूल आहे, तो महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पूल आहे. तो त्यावेळी नव्हता. तो पूल बांधण्याचं प्रस्तावित होतं. त्याचा उल्लेख करत पु. ल. देशपांडे यांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला की, आमच्या महापौरांनी इथे पूल बांधण्याचं ठरवलं आहे. पलीकडे ओंकारेश्वर आहे आणि ओंकारेश्वराकडून नटेश्वराकडे येणारा हा पूल असेल.

हेही वाचा: ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ मालिकेसाठी अशोक सराफांनी निवेदिता यांना दिला होता ‘हा’ सल्ला; काय म्हणाले? वाचा…

दरम्यान, ५४-५५ वर्षांत बालगंधर्व या रंगमंदिरात नाटकांचे प्रयोग, लावणी महोत्सव, एकपात्री प्रयोग, काही राजकीय सभाही झाल्या आहेत. आजही या रंगमंदिरात अनेक लोकप्रिय नाटकांचे प्रयोग होताना दिसतात. पुण्याचे सांस्कृतिक वैभव, अशी बालगंधर्व रंगमंदिराची ओळख आहे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do yoy know who conceived the concept of balgandharva rang mandir pune purushottam laxman deshpande nsp