भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. पण या रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून भारतीय रेल्वेने अनेक नियम तयार केले आहेत. रेल्वे प्रवासादरम्यान आपण कधी कधी लहान मुलांनाही सोबत नेतो. पण तुमच्याकडे त्या लहान मुलाचे तिकीट नसेल तर नियमानुसार काळजी करण्याची गरज नाही. कारण भारतीय रेल्वेने याबाबतही काही नियम केले आहेत. यामुळे तुम्हीही कधी रेल्वेने प्रवास करत असाल आणि तुमच्यासोबत एक लहान मूल असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
अलीकडे काही बातम्या पसरल्या होत्या की, ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी तिकीट बुक करणे अनिवार्य असेल. पण भारतीय रेल्वेने असा कोणताही बदल लागू केलेला नाही. जुन्या नियमांनुसार, तुम्ही तुमच्या लहान मुलाला पूर्वीप्रमाणेच ट्रेनमध्ये नेऊ शकता.
५ वर्षांखालील मुलांसाठी भारतीय रेल्वेचा काय आहे नियम?
जर तुम्ही ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलासोबत ट्रेनमध्ये प्रवास करत असाल तर तुम्हाला त्यांच्यासाठी बर्थ बुक करण्याची गरज नाही. तुम्ही त्यांना सोबत मोफत घेऊन जाऊ शकता. जर तुम्हाला मुलाची सोय लक्षात घेऊन मुलासाठी स्वतंत्र तिकीट आणि बर्थ बुक करायचा असेल तर तुम्ही ते कोणत्याही निर्बंधाशिवाय करू शकता.
मुलासाठी तिकीट आणि बर्थ बुक करण्याचे काय फायदा मिळतात?
जर तुम्हाला मुलासाठी मोफत प्रवास सुविधेचा लाभ घ्यायचा नसेल आणि तुम्हाला त्यासाठी पैसे भरायचे असतील तर तुम्ही त्यांच्यासाठी स्वतंत्रपणे बर्थ बुक करू शकता. जर प्रवाशांना मुलासाठी स्वतंत्र बर्थची गरज वाटत नसेल तर ते मुलाला मोफत प्रवास करू शकतात.
मुलांचे तिकीट आणि बर्थ चार्जेस
लहान मुलासाठी तिकीट आणि बर्थ बुक करण्यासाठी प्रौढांएवढेच पूर्ण भाडे आकारले जाईल. भारतीय रेल्वेने 06.03.2020 रोजी जारी केलेल्या परिपत्रकात हा नियम स्पष्ट केला आहे.