Car Flood Insurance: पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. देशातील काही भागांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडू लागला आहे. या पावसात सर्वांत मोठी अडचण होते ती, चारचाकी आणि दुचाकी वाहनांची. अनेक ठिकाणी पाणी साठल्याने नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो. या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साठते. त्यामुळे वाहतुकीवर प्रतिकूल परिणाम होतो. रस्त्यांवर पाण्याचा पूर म्हणजे निर्माण झालेल्या कृत्रिम नदीत अनेक गाड्या वाहून जातात. मग अशा परिस्थितीत वाहनांच्या नुकसानीचा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागतो. कारमध्ये पाणी शिरल्यास इंजिन खराब होऊ शकते, तसेच इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये पाणी शिरल्याने सिस्टीम व ॲक्सेसरीज खराब होऊ शकतात. अशा वेळी विमा योजना फायदेशीर ठरते. परंतु, कोणत्या प्रकारचा कार विमा पुरामुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण करू शकतो हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर जाणून घेऊ त्याबाबत सविस्तर…

नवीन कार खरेदीदारांनी कार विमा संरक्षणाशी संबंधित पैलू समजून घेतले पाहिजेत. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती यांसारख्या कारणांमुळे तुमचे आणि तुमच्या वाहनाचेही नुकसान होऊ शकते. त्यासाठीच विमा पॉलिसी खरेदी करणे हा अशा प्रकरणांमध्ये होणाऱ्या आर्थिक नुकसानीचा सामना करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. विमा क्षेत्रातील कंपन्या अनेक प्रकारच्या कार विमा पॉलिसी देतात. मग अशा नुकसानीपासून वाचविण्यासाठी आपल्याला कोणती पॉलिसी फायदेशीर ठरू शकते, ते पाहू.

पुरामुळे कारचे नुकसान कसे होऊ शकते?

तुमच्या गाडीमध्ये पाणी शिरल्याने इंजिन निकामी होणे, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टीमचे नुकसान, गंज व दुर्गंधी यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. पाणी जास्त प्रमाणात शिरल्याने गिअर बॉक्स खराब होऊ शकतो. जेव्हा उभ्या करून ठेवलेल्या वाहनात पाणी शिरते, तेव्हा ते कारच्या आतील भागात – सीट, पॅनल्स इ.चेदेखील नुकसान करू शकते. यापैकी काही समस्या ताबडतोब उघड होतात; परंतु काही ठरावीक कालावधीनंतर लक्षात येतात.

(हे ही वाचा : ‘बॉम्बे ब्लड ग्रुप’ म्हणजे काय? १० हजार लोकांपैकी फक्त एकामध्ये आढळतो हा रक्तगट; जाणून घ्या सविस्तर )

पुराशी संबंधित नुकसान कोणत्या पॉलिसी कव्हर करतात?

एका सर्वसमावेशक पॉलिसीमध्ये आग, पूर व चोरीमुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या अपघातांचा समावेश होतो. सर्वसमावेशक कार विमा पॉलिसी पुराशी संबंधित नुकसानीवर कव्हरेज देते. कारच्या वयाच्या आधारावर अवमूल्यनाच्या अधीन सर्व प्लास्टिक आणि रबरी भागांसाठी ५० टक्के घसारा लागू आहे. याचा अर्थ एकूण दुरुस्ती खर्चापैकी केवळ अर्धा भाग परत केला जाईल आणि पॉलिसीधारकाला उर्वरित रकमेचा खर्च सहन करावा लागेल. तथापि, एक स्वतंत्र सर्वसमावेशक कार विमा पॉलिसी पुरामुळे होणाऱ्या सर्व नुकसानीपासून संरक्षण देऊ शकत नाही.

विमा कंपनी पुराच्या नुकसानीशी संबंधित दावे नाकारू शकते का?

मूलभूत सर्वसमावेशक कार विमा पॉलिसी पुराशी संबंधित सर्व नुकसानांबाबत कव्हरेज प्रदान करते. तरीही चालकाच्या हेतुपुरस्सर कृती वा चुकीमुळे कारचे नुकसान झाल्यास विमा कंपन्या परतफेड करण्यास नकार देऊ शकतात.

जर तुमची कार तळघरात उभी असेल आणि ती पाण्यात बुडाली असेल आणि तुम्ही थेट विमा कंपनीकडे तक्रार करून सर्व्हिस सेंटर किंवा गॅरेजमध्ये नेले, तर कोणतीही अडचण नाही. परंतु, जर तुम्ही तुमची कार पाण्यात बुडाल्यानंतर ती सुरू करण्याचा प्रयत्न केला, तर तुमचे इंजिन हायड्रोस्टॅटिक लॉकमध्ये जाईल. अशा परिस्थितीत विमा कंपनी इंजिनाच्या बिघाडासाठी कव्हरेज देणार नाही. कारण- हे जाणूनबुजून केलेल्या कृतीमुळे होणारे नुकसान आहे, अशी माहिती Policybazaar.com चे मोटर इन्शुरन्स बिझनेस हेड नितीन कुमार यांनी दिली आहे.

एखाद्याने कोणत्या प्रकारच्या कार विमा संरक्षणाची निवड करावी?

कार विमा संरक्षण पॉलिसी खरेदी करताना, मुसळधार पावसाच्या वाढत्या घटना लक्षात घेतल्या पाहिजेत. मानक सर्वसमावेशक कार विमा योजनेसह एखाद्याने ॲड-ऑन कव्हर जसे की शून्य घसारा आणि इंजिन संरक्षण कव्हरेज असणारी पॉलिसी घेतली पाहिजे.