Bitcoin Reserve: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णयांचा धडाका लावला असून, आता त्यांनी बिटकॉइन रिझर्व्हची (राखीव निधी) स्थापना करण्याच्या निर्णयाच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. अमेरिकन सरकारचे एआय आणि क्रिप्टो झार (प्रमुख) डेव्हिड सॅक्स यांनी एक्सवर याची माहिती दिली. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणाले की, “सरकारकडे असलेले बिटकॉइन या रिझर्व्हमध्ये (राखीव निधीमध्ये) ठेवले जातील.” फौजदारी किंवा दिवाणी मालमत्ता जप्ती प्रक्रियेचा भाग म्हणून सरकारला हे बिटकॉइन्स मिळतात.
बिटकॉइन रिझर्व्ह काम कसे चालणार?
अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या एका पत्रकात म्हटले आहे की, सध्या, या बिटकॉइन रिझर्व्हच्या व्यवस्थापनासाठी कोणतेही स्पष्ट धोरण अस्तित्वात नाही.
अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने तयार केलेल्या एका पत्रकात म्हटले आहे की, “सध्या या मालमत्तेच्या व्यवस्थापनासाठी कोणतेही स्पष्ट धोरण अस्तित्वात नाही. यामुळे जबाबदारीचा अभाव आणि त्यांचे मूल्य केंद्रीकृत करण्यासाठी, सुरक्षित करण्यासाठी किंवा जास्तीत जास्त वाढवण्यासाठी पर्यायांचा शोध सुरू आहे.”
बिटकॉइन व्यतिरिक्त, क्रिप्टो रिझर्व्हमध्ये इतर कोणती चलने?
या आठवड्याच्या सुरुवातीला, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते की, बिटकॉइन रिझर्व्हमध्ये पाच प्रकारच्या डिजिटल मालमत्ता असतील. यामध्ये मार्केट कॅपनुसार जगातील सर्वात मोठे क्रिप्टो, बिटकॉइन, तसेच जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे क्रिप्टो, इथर, एक्सआरपी, सोलाना आणि कार्डानो यांचा समावेश असेल.
जागतिक परिणाम
डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे जागतिक क्रिप्टो बाजारांमध्ये मोठे बदल होऊ शकतो. अमेरिकेच्या सहभागामुळे डिजिटल मालमत्तेला वैधता मिळणार असून, त्यामुळे संस्थात्मक गुंतवणुकीला गती मिळू शकते. याचबरोबर अमेरिकन रिझर्व्हमध्ये समावेश असलेल्या विशिष्ट क्रिप्टोकरन्सीलाच गुंतवणूकदार प्राधान्य देऊ शकतात.
दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या सरकारने क्रिप्टोकरन्सीबाबत सावध भूमिका घेतली होती. पण ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेमुळे कदाचित नवीन क्रिप्टोकरन्सी नियम येऊ शकतात. तसेच डिजिटल मालमत्तेत अमेरिकेचे नेतृत्व पुढे येत असताना, टीकाकार बिटकॉइनच्या अस्थिरतेबद्दल आणि अर्थव्यवस्थेवर त्याचा अनिश्चित परिणाम होण्याचा इशारा देत आहेत.
भारतावर काय परिणाम होणार?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या क्रिप्टो रिझर्व्ह स्थापनेच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करण्याच्या निर्णयाचा भारतीय क्रिप्टो बाजारांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये तेजीची भावना निर्माण झाली असून, भारतीय एक्सचेंजेसमध्ये वाढ झाली आहे.