Dussehra 2023 : देशभरात नवरात्रीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. नवरात्रोत्सवात नऊ रात्री आणि नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. या उत्सवाला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात १५ ऑक्टोबरपासून झाली आहे. नवरात्रीचा उत्सव दसऱ्याच्या दिवशी समाप्त होतो. यंदाचा दसरा २४ ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्याचे मानले जाते. दसरा का साजरा केला जातो आणि या दिवशी शस्त्रांचे पूजन का केले जाते. याबाबतची सविस्तर माहिती ज्योतिषाचार्य राहुल स्वामी यांनी सांगितली आहे, ती जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दसरा का साजरा केला जातो?

विजयादशमी, दसरा हा हिंदूंच्या प्रमुख सणांपैकी एक महत्त्वाचा सण आहे. सर्वांत शुभ साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून दसऱ्याचे पावित्र्य मानले जाते. पौराणिक मान्यतांनुसार दसरा साजरा करण्यामागील एक समज असा आहे की, या दिवशी दुर्गा देवीने चंडीचे रूप धारण करून महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. महिषासुर आणि त्याच्या सैन्याने हैराण केल्यामुळे देवीने या राक्षसाशी नऊ दिवस युद्ध केले आणि १० व्या दिवशी महिषासुराचा अंत केला. त्यामुळे नवरात्रीनंतर दसरा साजरा करण्याची परंपरा आहे; तर प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून त्याचा वध केला, तोही याच दिवशी. या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी, असे म्हटले जाते. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. या दिवशी शस्त्रांच्या पूजेबरोबरच लोक वाहनांचीही पूजा करतात; शिवाय अनेक शुभ कामांची सुरुवातदेखील या दिवसापासून केली जाते.

हेही वाचा- गरबा नवरात्रीतच का खेळतात? पारंपरिक गरब्याचं महत्त्व काय? जाणून घ्या सविस्तर!

… म्हणून सुरू झाली शस्त्रपूजनाची परंपरा

दसरा हा कोणत्याही कामासाठी शुभ मानला जातो. प्राचीन काळी क्षत्रिय युद्धावर जाण्यापूर्वी दसऱ्याची वाट पाहत असत. या दिवशी ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामाने असत्याचा पराभव केला होता. तसेच दुर्गा देवीने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता, त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी कोणतेही युद्ध सुरू झाले तरी त्यांचा विजय निश्चित होतो, असे मानले जात होते. तसेच या काळात युद्धावर जाण्यापूर्वी शस्त्रपूजन केले जात असे. तेव्हापासून ही परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते.

शमीच्या (आपटा) झाडाचीही केली जाते पूजा

भारतात अनेकदा एखाद्या सणाचे किंवा परंपरेचे त्या त्या प्रदेशातल्या निसर्ग, पशू-पक्षी किंवा झाडे यांच्याशी नाते असल्याचे दिसून येते. त्यामुळे निसर्गातल्या गोष्टी, शक्ती यांची देवता म्हणून पूजा केली जाते. त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करून, नवीन कामांना सुरुवात केली, तर त्यातही यश निश्चितच मिळते, असे मानले जाते. पांडवांनी अज्ञातवास संपताच शक्तिपूजन करून शमीच्या (आपट्याच्या) झाडावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गाई पळवणाऱ्या कौरवांच्या सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला, तोही याच दिवशी. शिवाय, दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून आजही गावोगावी वाटली जातात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dussehra 2023 why weapons are worshiped on dasara day know the history and significance behind it jap