E Bike Taxi महाराष्ट्रात ई बाईक टॅक्सीला संमती देण्यात आली आहे. यासंदर्भातला महत्त्वाचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत पार पडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ई बाईक टॅक्सीला मंजुरी देण्याचा निर्णय झाला आहे. आपण जाणून घेऊ हा निर्णय काय आणि ई बाईक टॅक्सी म्हणजे काय?
ई बाईक टॅक्सीबाबतचा निर्णय काय? काय म्हणाले प्रताप सरनाईक?
“परिवहन विभागाच्या माध्यमातून ई-बाईक टॅक्सीचा प्रस्ताव मंत्रिमडळाच्या मान्यतेसाठी ठेवला होता. सर्व मंत्र्यांनी महाराष्ट्रात बाईक टॅक्सीला परवानगी दिली आहे. आत्तापर्यंत एकट्या प्रवाशांची गैरसोय होत होती. रिक्षा-टॅक्सीसाठी एका प्रवाशालाही तिप्पट भाडं द्यावं लागत होतं. आता ई-बाईक टॅक्सीच्या माध्यमातून सर्वसामान्य प्रवाशांची ही गैरसोय दूर होणार आहे”, असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं.
काय आहे ई बाईक टॅक्सी?
ई बाईक टॅक्सी म्हणजे इलेक्ट्रिक बाईकची सेवा. पारंपरिक टॅक्सी किंवा रिक्षा ऐवजी ई बाईक टॅक्सीचा वापर या सेवेत केला जातो. पर्यावरणात प्रदूषण कमी करण्याचं काम ई बाईक करतात. या बाईकची किंमतही कमी असते. वाहतूक कोंडी असतानाही ई बाईक टॅक्सी त्यातून टॅक्सी आणि रिक्षांच्या तुलनेत लवकर वाट काढू शकतात. जवळच्या अंतरावर जाण्यासाठी ई बाईक टॅक्सीचा पर्याय हा लोकांना उपयुक्त ठरतो.
ई बाईक टॅक्सी सेवा आणणारं पहिलं राज्य गोवा
दुचाकी टॅक्सी सेवेत दुचाकीद्वारे प्रवाशांची वाहतूक केली जाते. अशा प्रकारच्या कार्ट बाईक किंवा बाईक टॅक्सींना काही देशांमध्ये प्रवासी वाहतुकीचा परवाना देण्यात आला आहे. तेथे अनेक वर्षांपासून ही सेवा सुरू आहे. भारतात गोवा राज्यातही ही सेवा सुरू आहे. साधारणत: पर्यटकांची संख्या जास्त असलेल्या देशात या टॅक्सी मोठ्या प्रमाणात धावतात. यात एक प्रवासी असतो, जो दुचाकी चालवणाऱ्याच्या मागे बसून प्रवास करतो. काही देशांमध्ये या टॅक्सीचालकाच्या गणवेशाचा रंगही निश्चित आहे. भारतातील गोव्यामध्ये सर्वात पहिली दुचाकी टॅक्सी सेवा सुरू झाली आणि यशस्वीही ठरली. आता महाराष्ट्रात या ई बाईक टॅक्सी सेवेला संमती देण्यात आली आहे.
गोव्यात ई बाईक टॅक्सीचा प्रयोग यशस्वी
गोव्यात ई बाईक टॅक्सीचा प्रयोग यशस्वी ठरला, कारण या राज्यात पर्यटकांची संख्या भरपूर आहे. देश विदेशातले पर्यटक या ठिकाणी येत असतात. पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी अनेकदा अरुंद रस्त्यांवरुन जावं लागतं. त्यामुळे ई बाईक टॅक्सी गोव्यात यशस्वी ठरली आहे. आता याच धर्तीवर ही सेवा महाराष्ट्रात यशस्वी ठरणार का? हे पाहणंही महत्त्वाचं असेल.