Earbuds सध्याचा काळ ब्लूटूथ हेडफोन आणि इअर बड्सचा आहे. तंत्रज्ञानाने प्रचंड प्रमाणावर प्रगती केली आहे. अशात अनेकदा तरुण तरुणी ऐकण्यासाठी त्रास होतो, नीट ऐकू येत नाही अशा तक्रारी करताना आढळतात. काहींना तर कानाचं इन्फेक्शनही होतं. या सगळ्या गोष्टींमागचं कारण ब्लू टूथ हेडफोन आणि इअरबड्स आहेत. कशी काळजी घ्यायची ते समजून घेऊ.
वायरलेस इअरबड्स किंवा हेडफोन हे कानांवर कसा परिणाम करतात?
वायरलेस हेडफोन किंवा इअर बड्स हे ब्लू टूथ कनेक्ट होतात. मोठ्या आवाजात गाणी ऐकणं. दीर्घकाळ हेडफोन किंवा इअर बड्स कानाला लावून ठेवणं याचा परिणाम कानांवर होतो.
१) कानाच्या आत असलेल्या नलिकेला इजा पोहचणे
२) मोठ्या आवाजात गाणं, संगीत ऐकल्याने तशाच पद्धतीचं ऐकण्याची सवय लागणे याचाही परिणाम कानांवर होतो.
संगीत क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही होऊ शकतो त्रास
ध्वनी क्षेत्रात काम करणारे लोक किंवा संगीतकार हे १०० ते ११० डेसिबलपर्यंतचे संगीत ऐकतात. हेडफोन किंवा इअर बड्स लावल्याने कानातील सूक्ष्म पेशींना इजा पोहचते. हेडफोन आणि इअर बड्स कायमस्वरुपी वाप केल्याने या पेशी फुटण्याचाही धोका संभवतो ज्यामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो.
श्रवणशक्ती गमावण्याची शक्यता का उद्भवते?
सातत्याने मोठ्या आवाजात हेडफोन किंवा इअरबड्सने ऐकण्याची सवय लागल्याने ऐकण्याची क्षमता तात्पुरती कमी होण्याचाही धोका संभवतो. तसंच याचा परिणाम पुढे श्रवणशक्ती कायमची गमावण्यातही होऊ शकतो.
टिनिट्सचा धोका
मोठ्या आवाजाच्या संपर्कात सातत्याने राहिल्याने, मोठ्या आवाजात संगीत किंवा गाणी ऐकल्याने, संवाद ऐकल्याने टिनिट्स हा आजार होऊ शकतो. हा आजार काहीवेळा तात्पुरत्या स्वरुपाचा असतो. कायमस्वरुपाचा आजार झाल्यास त्यावर आत्ता तरी कुठलाही उपचार नाही.
संसर्गाचा धोका
हेडफोन किंवा इअर बड्स सातत्याने वापरल्याने कानाच्या आतील आवरणावर परिणाम होऊन कानाच्या संसर्गाचे काही आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. फंगस होण्याचाही धोका संभवतो. इअर बड्स स्वच्छ न करता ते दुसऱ्या व्यक्तीने वापरले तर त्या व्यक्तीकडेही संसर्गाने फंगस किंवा बुरशीचा आजार जाण्याची शक्यता आहे. यापासून नेमका बचाव कसा करायचा? हे आपण समजून घेऊ.
या सगळ्यापासून बचाव कसा करायचा?
संगीत ऐकताना, गाणं ऐकताना ६० टक्क्यांचा नियम पाळा. तुमच्या मोबाइल किंवा आयपॉडची क्षमता १०० टक्के असेल तर ६० टक्के आवावरच गाणं, संगीत ऐका. दर ६० मिनिटांनी किमान अर्धा तास कानांना विश्रांती द्या. इअर बड्स किंवा हेडफोन हे ३० मिनिटांसाठी बाजूला काढून ठेवा.
ब्लू टूथ इअरबड वापरणं सक्तीचं असेल तर काय कराल?
नोकरीच्या धावपळीत, धकाधकीत इअरबड वापरणं सक्तीचं असेल तर एका कानाचाच बड वापरा, दुसऱ्या कानाला विश्रांती द्या, मग दुसऱ्या कानाला काही वेळ विश्रांती द्या असं आलटून पालटून इअर बड वापरा जेणेकरुन दोन्ही कान व्यवस्थित राहण्यास मदत होईल दोघांवरही ताण येणार नाही. शिवाय ६० टक्के आवाज हे सूत्र इथेही कायम ठेवा.
डॉक्टरांकडून चेक अप करुन घेणं महत्त्वाचं
तसंच सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सगळी काळजी घेऊनही तुम्हाला ऐकण्यासंबंधी काही तक्रारी असतील. कानात इनफेक्शन होत असेल तर कान नाक तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घ्या. त्यांचा याबाबत सल्ला घ्या. डॉ. दर्शील वैष्णव यांनी टाइम्स न्यूजशी बोलताना ही माहिती दिली आहे.