Eastmancolor : ‘अमर अकबर अँथोनी’, ‘आराधना’, ‘मेरे हुजूर’ अशा बऱ्याच जुन्या चित्रपटांच्या नावाखाली ‘ईस्टमन कलर’ ( Eastmancolor ) असं लिहिलेलं असतं. बहुतांश जुने बॉलीवूड चित्रपट पाहताना आपल्याला प्रश्न पडतो की, हे ‘ईस्टमन कलर’ म्हणजे काय? याचा नेमका अर्थ काय असेल? याबाबत आता सविस्तरपणे जाणून घेऊयात…
२० व्या शतकाच्या सुरुवातीपासून हॉलीवूडमध्ये रंगीत चित्रपटांवर अनेक नवनवीन प्रयोग सुरू होते. १९०८ मध्ये जॉर्ज आल्बर्ट स्मिथ या ब्रिटीश वैज्ञानिकाने ‘किनेमाकलर’ ही दुरंगी रंगप्रक्रिया सिनेमासाठी विकसित केली. यात लाल व निळा असे दोन रंग एकूण बत्तीस चित्रचौकटींमध्ये गाळणीतून फिरवले जायचे. पुढे, १९१० मध्ये लेपनप्रकियेद्वारे चित्रपटाची रीळ बनवण्यास सुरुवात झाली. यामध्ये रात्रीसाठी निळा, आगीसाठी लाल, तर फुलांसाठी पिवळा रंग वापरला जायचा. असे विविध प्रयोग हॉलीवूडमध्ये सुरू होते. अशातच ईस्टमन कोडॅक कंपनीने १९३० मध्ये विविध रंगांमध्ये रंगवलेली कृष्णधवल चित्रफित ‘सोनोक्रोम’ या नावाने बाजारात आणली. या काळात हॉलीवूडमध्ये रंगीत चित्रपट बनवण्यासाठी विविध प्रणालींचा वापर केला जायचा. साहजिकच हॉलीवूडप्रमाणे भारतात सुद्धा रंगीत चित्रपटांबाबत उत्सुकता निर्माण झाली.
‘ब्लॅक अँड व्हाइट’ चित्रपटांच्या तुलनेत रंगीत चित्रपटांच्या निर्मितीसाठी जास्तीचा खर्च यायचा. फ्लिम हेरिटेज फाऊंडेशनने दिलेल्या माहितीनुसार १९५० मध्ये ईस्टमन कोडॅक कंपनीने ‘ईस्टमन कलर’ ही प्रणाली लॉन्च केली. यामुळे रंगीत चित्रपट बनवण्यासाठी तुलनेने कमी खर्च येऊ लागला.
‘ईस्टमन कलर’ ( Eastmancolor ) हे ईस्टमन कोडॅक कंपनीने रंगीत मोशन चित्रपटांच्या निर्मितीमध्ये वापरलेलं तंत्रज्ञान आहे. जॉर्ज ईस्टमन यांनी या कंपनीची स्थापना केली होती. या ‘ईस्टमन कलर’ तंत्रज्ञानाला डीलक्स कलर, वॉर्नरकलर, मेट्रोकलर, पॅथेकलर आणि कोलंबियाकलर यांसारख्या इतर नावांनी देखील ओळखलं जायचं.
‘ईस्टमन कलर’ प्रक्रियेतील पहिला हिंदी चित्रपट
‘हम हिंदुस्थानी’ हा ‘ईस्टमन कलर’ प्रक्रियेतील पहिला हिंदी चित्रपट होता. हा चित्रपट रंगीत करण्यासाठी लंडनला न पाठवता मुंबईतील फिल्म सेंटर लॅबमध्ये प्रक्रिया करून बनवण्यात आला होता. ‘ईस्टमन कलर’ ही प्रक्रिया ‘टेक्निकलर’ तंत्रज्ञानापेक्षा कमी क्लिष्ट पण, महाग होती. ‘हम हिंदुस्तानी’ चित्रपटात सुनील दत्त, आशा पारेख, जॉय मुखर्जी, हेलन यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.
हेही वाचा : First Mobile Call in India: भारतात पहिला कॉल कोणी कोणाला केला होता? एक मिनिट बोलण्यासाठी यायचा ‘इतका’ खर्च
‘हम हिंदुस्तानी’नंतर १९६१ मध्ये आलेल्या शमी कपूर यांच्या ‘जंगली’ चित्रपटाला रंगीत बनवण्यासाठी ‘ईस्टमन कलर’ हे तंत्रज्ञान वापरण्यात आलं होतं. ‘ईस्टमनकलर’ प्रणालीमध्ये सुपरहिट ठरलेला हा पहिला चित्रपट होता.