Economy of these 15 countries is growing faster than India : भारत हा सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. सध्या अर्थव्यवस्थेच्या रांगेत भारत पाचव्या क्रमांकावर आहे. तर, येत्या काही वर्षांत भारताने तिसऱ्या क्रमांकावर येण्याकरता प्रयत्न सुरू केले आहेत. पण असेही काही लहान देश आहेत ज्यांची अर्थव्यवस्था भारतापेक्षाही वेगाने वाढतेय. महत्त्वाचं हे देश तुम्हाला जगाच्या नकाशावर सहज सापडतही नाहीत.
दक्षिण सुदानची अर्थव्यवस्था सर्वांत वेगात
आयएमएफच्या मते, यावर्षी भारताची अर्थव्यवस्था ६.२ टक्के दराने वाढण्याची अपेक्षा आहे. भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. त्यापुढे अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपान आहेत. आयएमएफच्या मते, दक्षिण सुदानची अर्थव्यवस्था या वर्षी सर्वात वेगाने वाढण्याची शक्यता आहे.
तेलाचा साठा आढळल्यानंतर ‘गयाना’ची प्रगती सुरू
काही वर्षांपूर्वी दक्षिण सुदान सुदानपासून वेगळे झाले. या वर्षी या देशाची अर्थव्यवस्था २७.२% वेगाने वाढण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर गयाना आहे. या कॅरिबियन देशाचा जीडीपी १४.४ टक्के दराने वाढू शकतो. काही वर्षांपूर्वी गयानामध्ये तेलाचा मोठा साठा आढळला होता. तेव्हापासून या देशाची अर्थव्यवस्था वेगाने वाढली आहे. तर, आफ्रिकन देश लिबिया (१३.७%) तिसऱ्या क्रमांकावर आहे.
यादीत कोणा-कोणाचा नंबर?
या वर्षी सेनेगलची अर्थव्यवस्था ९.३% दराने वाढण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर पलाऊ (८.५%), सुदान (८.३%), युगांडा (७.५%), नायजर (७.३%), मकाऊ (७.३%), भूतान (७.२%), मंगोलिया (७%), झांबिया (६.६%), बेनिन (६.५%), इथिओपिया (६.५%) आणि रवांडा (६.५%) यांचा क्रमांक लागतो. भारतापेक्षा वेगाने वाढणाऱ्या १५ देशांपैकी १० आफ्रिकन देश आहेत.
‘फिच’कडून विकास दर अंदाज घटून ६.४ टक्क्यांवर
जागतिक पतमानांकन संस्था ‘फिच रेटिंग्ज’ने चालू आर्थिक वर्षांसाठी भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीसंबंधी अंदाज सुधारून घेत, तो ६.४ टक्क्यांपर्यंत खाली आणला आहे. अमेरिका आणि चीनमधील वाढता व्यापार तणाव आणि त्यापरिणामी जागतिक व्यापार युद्ध अधिक तीव्र होण्याच्या चिंतेमुळे अर्थव्यवस्थेच्या विकासाची गती मंदावणार असल्याचे ‘फिच’ने गुरुवारी हा सुधारित अंदाज वर्तवताना स्पष्ट केले. मात्र पुढील आर्थिक वर्षासाठीचे अंदाज कायम ठेवले आहेत.