एखादा हत्ती म्हातारा झाला की त्याला आपले आयुष्य संपणार असल्याची चाहूल लागते असे म्हटले जाते. अशावेळेस आपल्यामुळे आपल्या समूहाला त्रास होऊ नये, यासाठी ते स्वतःला हळूहळू त्यांच्या जवळच्या व्यक्तींपासून, मित्र-परिवारापासून वेगळे करून घेतात आणि त्यांच्या पूर्वजांनी जिथे आपले प्राण सोडले, त्या एका विशिष्ट ठिकाणी जाऊन आपला अखेरचा श्वास घेतात. असे काही गोष्टींमधून, दंतकथांमधून म्हटले जाते; अशी माहिती स्टुअर्ट ब्लॅकमन यांच्या बीबीसी वन्यजीव मासिकासाठी लिहिलेल्या लेखातून मिळते.
समूहातील इतर हत्तींमध्येसुद्धा त्यांची स्मशानभूमी हा एक कौतुकाचा विषय असून, आपला मार्ग बदलून ते त्यांच्या पूर्वजांना भेटण्यासाठी, सोप्या भाषेत त्यांना नमस्कार करण्यासाठी म्हणून त्या जागेला भेट देत असतात असे समजते. खरंतर हत्तींच्या समूहाची स्मशानभूमी हा फारच अद्भुत विषय आहे. कारण त्याच्या या क्रियेमुळे मनुष्याला तो अमर नसल्याची आठवण तर होतेच; पण सोबतच हत्ती हे किती समूहप्रिय, सहानुभूती दर्शवणारे, इतर जीवांना मदत करणारे आणि कोणतीही गोष्ट न विसरणारे असे बुद्धिमान जीव आहेत, याबद्दलदेखील सतत आठवण करून देत असतात. पण, अशा या बलाढ्य हत्तींची स्मशानभूमी खरंच अस्तित्वात आहे का?
हेही वाचा : हृदय आणि मेंदू दोन्ही नसूनही सर्वांत बुद्धिमान आहे जेली फिश! नक्की वाचावी अशी माहिती….
हत्तीच्या स्मशानभूमीबद्दल माहिती
खरंतर हत्तीची विशिष्ट अशी स्मशानभूमी असते, हे सांगणारे फारसे पुरावे नसल्याने यास दंतकथा म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. परंतु, कोणतीही गोष्ट किंवा दंतकथा उगाच प्रचलित होत नाही. तसेच काहीसे या विषयाचेसुद्धा आहे. हत्तीची स्मशानभूमी ही संकल्पना प्रचलित होण्यामागे कारणंदेखील तशीच आहेत.
काही रेकॉर्ड्सनुसार, एकाच ठिकाणच्या जवळ-जवळच्या काही भागांत हत्तींची बरीच हाडं आढळल्याचे समजते. परंतु, एकाच ठिकाणी अनेक हत्ती मरण पावण्यामागचे दुष्काळ हे एक कारण समोर येतं.
त्यासोबतच, ज्यामध्ये शेवाळं जमा झाली असतील अशी विषारी पाण्याची डबकी, इतर शिकारी जीव यांसारख्या कारणांचादेखील समावेश करता येतो. काही ठिकाणे अशी असू शकतात, जिथे पाणी आणि खाण्यासाठी मुबलक अन्न उपलब्ध असतील; अशा ठिकाणी वृद्ध हत्तींची तब्येत सुधारण्यासाठी मदत होऊ शकते, म्हणून तिथेच वास्तव्य केले आणि म्हणून त्या जागेवर अनेक हत्ती मरण पावले असावेत, अशी शक्यता नाकारता येत नाही.
फार कमी प्राणी असे असतात हे आपल्या समूहातील इतर प्राण्यांच्य मृतदेहांबद्दल आपुलकी व्यक्त करतात. अशा प्राण्यांमध्ये वानरांसोबत हत्तीचादेखील समावेश होतो. काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, असे वागणे म्हणजे अगदी एखाद्या शोकसभेसारखे भासते. त्यांच्या अशा वागण्यामुळे, हत्तीला आपल्या मृत्यूची जाणीव असावी की काय? हा विचार करण्यास भाग पडते.
हत्तीच्या समूहातील एखाद्या हत्तीचा मृत्यू झाल्यास, इतर सर्व हत्ती त्याला स्पर्श करून, त्याचा वास घेऊन त्या मृत हत्तीला उचलण्याचा किंवा त्यावर माती घालण्याचा प्रयत्न करत असतात. असे अनेक वैज्ञानिक पुरावे असल्याचे, स्टुअर्ट ब्लॅकमनच्या लेखातून समजते. यासोबतच, अनेकदा मृत हत्तीचा केवळ सांगाडा राहिल्यानंतरसुद्धा, समूहातील इतर हत्ती त्यांच्या जुन्या मित्राला भेटण्यासाठी पुन्हा येत असल्याची माहिती मिळते.
गेंड्यासारख्या इतर सस्तन प्राण्यांपेक्षा, हत्तीला आपल्या समूहातील मृत हत्तीच्या हाडांमध्ये अधिक रस असल्याचे, काही नियंत्रित प्रयोगांवरून समोर आले. या प्रयोगांमधून असे समजते की, हत्तीला मृत हत्तीच्या इतर हाडांपेक्षा त्याच्या दातांबद्दल/ सुळ्यांबद्दल अधिक ओढ असते. कदाचित ते [दात/सुळे] शरीराबाहेर आणि सतत त्यांच्या डोळ्यासमोर असतील म्हणून असावे.
हेही वाचा : ‘मोये मोये’ गाण्याचा ट्रेंड तर माहित आहे; पण त्याचा नेमका अर्थ काय ते पाहा…
परंतु, हत्ती त्यांच्या प्रजातींच्या आणि इतर प्रजातींच्या हाडांमध्ये फरक करू शकत नसल्याने, ही ओढ विशिष्ट नसून सामान्य आहे असे दिसते.
[स्टुअर्ट ब्लॅकमन यांनी, बीबीसी वाईल्डलाईफ मॅगझीनसाठी [BBC wildlife magazine] लिहिलेल्या एका लेखावरून, आपल्याला हत्ती आणि हत्तीच्या स्मशानभूमीबद्दल प्रचलित असणाऱ्या दंतकथेविषयी ही थोडी माहिती मिळते.]