मागच्या आठवड्यात दोन हजारांच्या नोटा वितरणातून बाहेर करण्याचा निर्णय झाला आहे. आपल्याजवळ असलेल्या दोन हजारांच्या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत बदलण्याची मुदत आहे. २०१६ मध्ये नोटबंदीचा निर्णय झाला. त्यावेळी ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. आता २ हजारांच्या नोटाही बदलून घ्यायच्या आहेत. दोन हजारांच्या नोटा बदलून कशा घ्यायच्या आहेत? त्याविषयीच्या नऊ प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देणार आहोत
१) २ हजार रुपयांच्या नोटा काही वर्षांपूर्वी बंद झालेल्या ५०० आणि हजार रुपयांच्या नोटांप्रमाणे बाद झाल्या आहेत का?
उत्तर- दोन हजारांच्या नोटा या चलनातून बाद झालेल्या नाहीत तर त्या वितरणातून बाद झाल्या आहेत. दोन हजारांची नोट ही वैध असणार आहे.
२) २ हजार रुपयांच्या फक्त १० नोटा म्हणजे फक्त २० हजार रुपयेच बदलता येणार का?
उत्तर : RBI ने केलेल्या घोषणेनुसार एका वेळी २ हजार रुपयांच्या १० नोटा बदलता येतील. एका वेळी, एका व्यक्तीला २ हजार रुपयांच्या १० नोटाच बदलता येणार आहे. समजा एखादा व्यक्ती एकाऐवजी जास्त वेळा बँकेत आला आणि नोटा बदलू लागला तर तसं करण्याला संमती आहे. रांगेत दहावेळा उभं राहून २ हजारांच्या १०० नोटाही एखादा व्यक्ती बदलू शकतो.
३) दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी मागच्या वेळी नोटबंदी झाल्यावर जसा फॉर्म भरावा लागला तसा भरावा लागणार?
उत्तर : दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी फॉर्म भरावा लागणार नाही. तसंच ओळखपत्रही दाखवण्याची आवश्यकता नसणार आहे.
४) दोन हजारांच्या नोटा बँकेत जमा करण्याची काही सीमा आखून देण्यात आली आहे का?
उत्तर: दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी एका वेळी १० नोटांची मर्यादा आहे. मात्र एखादा व्यक्ती किती नोटा जमा करतोय त्याची कुठलीही सीमा आखून देण्यात आलेली नाही.
५) दोन हजारांची नोट वैध आहे का? त्याद्वारे व्यवहार केले जाऊ शकतात का?
उत्तर : RBI च्या घोषणेनुसार दोन हजारांच्या नोटा वैध आहेत. त्यामुळे या नोटांद्वारे व्यवहार करता येऊ शकतो.
६) बँक खातं नसेल तरीही २ हजारांच्या नोटा बदलता येतील का?
उत्तर : होय. बँक खातं नसेल तरीही दोन हजारांच्या नोटा बदलता येणार आहेत. कुठल्या बँकेच्या कुठल्याही शाखेत जाऊन दोन हजार रुपयांच्या नोटा बदलता येणार आहेत.
७) दोन हजारांच्या नोटा तुमचं खात जिथे असेल तिथेच बदलता येणार का?
उत्तर : दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी तुमचं खातं आहे तिथेच तुम्हाला नोटा बदलता येतील असं नाही. तुम्ही कुठल्याही बँकेतून तुम्ही नोटा बदलू शकता.
८) ज्येष्ठ नागरिक दोन हजारांच्या १० पेक्षा जास्त नोटा बदलू शकतात का?
उत्तर : ज्येष्ठ नागरिकही एका वेळी १० नोटाच बदलू शकतात. ज्येष्ठ नागरिकांना दहाच नोटा बदलता येणार आहेत. वरिष्ठ नागरिकांनाही दहा नोटा कितीहीवेळा बदलता येणार आहेत.
९) दोन हजारांच्या नोटा बदलण्याची मुदत किती आहे?
उत्तर : RBI ने केलेल्या घोषणेनुसार ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत या नोटा बदलून घेता येणार आहेत.
तर ही उत्तरं आहेत तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची. २३ मे पासून नोटा बदलता येणार आहेत. मात्र मुळात हा फरक लक्षात घ्या की ही नोट बंद झालेली नाही. फक्त वितरणातून बाहेर गेली आहे. NDTV ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.