वानखेडे स्टेडियमवर पंजाबने मुंबईचा १३ धावांनी पराभव केला. अर्शदीप सिंगने चार विकेट काढल्या तर सॅम करनने अर्धशतकी खेळी केली या दोघांच्या कामगिरीमुळे पंजाबला सामना जिंकता आला. अर्शदीपने वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात चार विकेट घेतल्या त्याचं कौतुक तर झालंच पण दोनदा अर्शदीपने स्टंप तोडला. एखाद्या गोलंदाजाचा मारा किती भेदक असू शकतो हे अर्शदीपने दाखवून दिलं. अर्शदीपच्या या कामगिरीवर सगळेच फिदा झाले आहेत. तसंच IPL च्या सामन्यांमध्ये जे स्टंप्स वापरले जातात त्याची किंमत किती असते? हा प्रश्न आता अख्ख्या जगाला पडला आहे.
IPL मॅचमध्ये वापरले जाणारे स्टंप्स आणि बेल्स असतात LED
IPL च्या मॅचेसमध्ये वापरण्यात येणारे स्टंप्स आणि त्यावर ठेवलेल्या बेल्स हे LED असतात. २०१४ ला जो ICC T20 विश्वचषक झाला त्या स्पर्धेत सर्वात प्रथम हे LED स्टंप्स आणि बेल्स वापरण्यात आले होते. नेहमीच्या वापरात असलेल्या स्टंप्सपेक्षा LED स्टंप्स आणि बेल्स यांची किंमत खूप जास्त आहे.
अर्शदीपची ‘स्टंपतोड’ कामगिरी
मुंबईविरोधात खेळत असताना बॉलर अर्शदीपने शेवटच्या षटकात दोनवेळा स्टंप्स तोडले. शेवटच्या षटकातल्या तिसऱ्या चेंडूवर तिलक वर्माला क्लिन बोल्ड करत अर्शदीपने पहिल्यांदा मिडल स्टंप तोडला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर नेहल वढेराची विकेट घेताना आणखी एक स्टंप तोडला. मुंबई विरोधातल्या सामन्यात पंजाबचा १३ धावांनी विजय झाला त्यात अर्शदीपच्या या कामगिरीचा सिंहाचा वाटा आहे.
काय असते LED स्टंप्सची किंमत?
IPL मध्ये जे LED स्टंप्स वापरण्यात येतात त्याच्या एका सेटची किंमत अंदाजे २५ ते ३५ लाख या घरात असते. आपण अगदी एका सेटची किंमत २५ लाख रूपये जरी धरली तरीही अर्शदीपने दोनवेळा जी स्टंपतोड कामगिरी केली त्यामुळे एका मॅचमध्ये IPL चं ५० लाखांचं नुकसान झालं आहे असं म्हणता येईल. क्रिकट्रॅकरने या स्टंप्स सेटची किंमत ३० लाख रुपये असल्याची इंस्टा पोस्ट केली आहे.
का महाग असतात हे LED स्टंप्स?
या स्टंप्समध्ये LED लाईट लागलेले असतात. त्यामुळे रनआऊट किंवा स्टंपिंगचा निर्णय घेण्यासाठी थर्ड अंपायरला या स्टंप्सचं निरीक्षण करून निर्णय देणं सोपं जातं. या स्टंप्सना चेंडू लागला किंवा हात लागला तर त्यामध्ये असलेले LED लाईट चमकतात. त्यावरून थर्ड अंपायर्सना नेमकं काय घडलं आहे हे पाहून निर्णय देणं सुलभ होतं. एवढंच नाही तर या स्टंप्समध्ये खास प्रकारचा माईकही लावण्यात आलेला असतो. त्यामुळे बॅटला चेंडू लागला की नाही याचाही आवाज ऐकता येतो. तसंच या स्टंप्समध्ये कॅमेरेही लावलेले असतात. अत्यंत अद्ययावत अशा सोयींनी हे स्टंप्स उपयुक्त असतात. त्यामुळेच या स्टंप्सच्या एका सेटची किंमत ही २५ ते ३५ लाखांच्या घरात असते.