29 Years of First Mobile Call: सध्याच्या काळात मोबाइल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. कॉल करणं, शॉपिंग, सोशल मीडिया वापरणं, बिलं भरणं, बँकेची कामं करणं या सगळ्या गोष्टी आपण फोनवरून करतो. पण भारतात सर्वात पहिला कॉल कधी, कोणी व कुणाला केला होता हे तुम्हाला माहीत आहे का? भारतात सर्वात पहिला कॉल करण्यात आला, त्या गोष्टीला २९ वर्षे पूर्ण झाली आहेत.
२९ वर्षांपूर्वी ३१ जुलै १९९५ रोजी भारतात सर्वात पहिला मोबाइल कॉल करण्यात आला होता. या फोन कॉलनंतर संवाद साधण्याची पद्धत बदलली आणि भारतात दूरसंचार क्रांती झाली. कारण मोबाईल वापरून कॉल करण्याची ही पहिलीच वेळ होती. दूरसंचार विभागाने एक एक्स पोस्ट करून २९ वर्षांपूर्वीची आठवण शेअर केली आहे.
कोणी कोणाला केला होता पहिला फोन?
Who made first mobile call: भारतातील सर्वात पहिल्या फोन कॉलमध्ये एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधला होता. पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बासू यांनी तत्कालीन केंद्रीय दूरसंचार मंत्री सुख राम यांना ३१ जुलै १९९५ रोजी मोबाइल वापरून पहिला कॉल केला होता. भारतात झालेल्या या संवादासाठी नोकियाचे दोन्ही मोबाइल फोन वापरले गेले होते. यासाठी भारतातील बी.के. मोदी ग्रुप व ऑस्ट्रेलियातील टेलस्ट्रा यांच्या मोदी टेलस्ट्रा या मोबाइल नेटवरून हा कॉल करण्यात आला होता.
पुण्यात इतक्या पेठा असूनही ‘नवी पेठ’ची निर्मिती का करण्यात आली?
कलकत्तामधून दिल्लीत केला होता फोन
१९९५ साली तो फोन तत्कालीन कलकत्तामधील (आताचे कोलकाता) रायटर्स बिल्डिंगमधून नवी दिल्ली येथील संचार भवनात करण्यात आला होता. तो कॉल मोदी टेलस्ट्राच्या मोबाइलनेट सर्व्हिसवरून केला होता. त्या सेल्युलर कॉलने कोलकात्यात मोबाइलनेट सर्व्हिसचे उद्घाटन केले होते. भारतात सेल्युलर सर्व्हिस पुरवण्यासाठी परवाना मिळालेल्या आठ कंपन्यांपैकी ही कंपनी एक होती.
न्यूज १८ च्या वृत्तानुसार, त्याकाळी आउटगोइंग व इनकमिंग दोन्ही कॉल्ससाठी कॉलचे दर ८.४ रुपये प्रति मिनिट होते. मोबाइल फोनच्या ट्रॅफिक अवर्समध्ये हे दर वाढून १६.८ रुपये प्रति मिनिटांवर जायचे. आता या २९ वर्षांच्या काळात कॉल व इंटरनेट दोन्हीचे दर खूप स्वस्त झाले आहेत. इतकंच नाही तर आता भारतात १.२ बिलियन मोबाईल वापरकर्ते आहेत.
कॉल करण्यासाठी वापरलेल्या मोबाइलची किंमत किती?
कॉल करण्यासाठी वापरलेले ते फोन परवडणारे नव्हते. एका फोनची किंमत त्या काळी ४० हजार रुपयांपेक्षा जास्त होती. भारतातील पहिल्या मोबाइल फोन कॉलमध्ये नोकियाचे नेमके कोणते मोबाइल वापरले गेले होते, याची स्पष्ट माहिती नाही. १९९५ पासून ते आता २०२४ पर्यंत भारतातील दूरसंचार क्षेत्राने खूप मोठे बदल पाहिले आहेत. आता इंटरनेट स्पीड व मोबाईल, त्यांच्या किमती व फीचर्समध्ये बरेच बदल झाले आहेत. आता मार्केटमध्ये अगदी काही हजार रुपयांच्या फोनपासून ते लाखो रुपयांचे फोन मिळतात.