Most expensive flowers in the world: फुलं ही निसर्गानं दिलेली सर्वांत सुंदर देणगी आहे. फुलांच्या सौंदर्य अन् सुगंधानं मोहित केलं नसेल अशी व्यक्ती सापडणं विरळाच. आपण घरातल्या कुंडीत गुलाब, मोगरा, झेंडू अशी अनेक फुलं आपण लावतो. परंतु, तुम्हाला ठाऊक आहे का? जगात अशी अनेक फुलं आहेत जी त्यांच्या वैशिष्ट्य आणि मर्यादित उपलब्धतेमुळे खूप महाग आहेत. या महागड्या फुलांच्या यादीत नेमकी कोणकोणती फुलं आहेत ते आपण जाणून घेऊ…

जगातील सर्वांत दुर्मीळ आणि महागडी फुलं

कडुपुल फूल

कडुपुल हे फूल जगातील सर्वांत दुर्मीळ आणि मौल्यवान फूल मानलं जातं. हे फूल केवळ किमतीमुळेच नाही, तर ते खरोखरच अमूल्य आहे. हे फूल फक्त रात्रीच दिसतं आणि पहाटेच्या आधी कोमेजतं. त्याच्या नाजूक पांढऱ्या पाकळ्या आणि मोहक सुगंध त्याच्या सौंदर्यात भर घालतो, तसेच हे फूल श्रीलंकेच्या जंगलात आढळतं.

ज्युलिएट रोज

ज्युलिएट रोज हे जगातील सर्वांत महागडे गुलाबाचे फूल आहे. ज्युलिएट रोज हे आतापर्यंत विकसित केलेल्या सर्वांत महागड्या फुलांपैकी एक आहे. हे फूल उगवण्यासाठी १५ वर्षं मेहनत घ्यावी लागते आणि या फुलाची किंमत १३० कोटी आहे. ज्युलिएट रोजचे फूल सुकत नाही आणि रात्रीच ते बहरते.

शेन्झेन नोंगके ऑर्किड

शेन्झेन नोंगके ऑर्किड हे फूल चीनमधील शास्त्रज्ञांनी अत्यंत काटेकोरपणे तयार केले होते. आठ वर्षांच्या संशोधन आणि विकासानंतर, हे मानवनिर्मित चमत्कारी फूल दर चार-पाच वर्षांनी फक्त एकदाच फुलते. त्याची नाजूक रचना आणि दुर्मीळता यांमुळे २००५ मध्ये त्याची २,९०,००० ऑस्ट्रेलियन डॉलर्स इतकी विक्रमी लिलावी किंमत झाली, ज्यामुळे ते आतापर्यंत विकल्या गेलेल्या सर्वांत मौल्यवान फुलांपैकी एक बनले. या फुलाची किंमत १६.५४ कोटी इतकी आहे.

किनाबालु ऑर्किड

मलेशियातील किनाबालु राष्ट्रीय उद्यानात उमललेले, गोल्ड ऑफ किनाबालु ऑर्किड हे जगातील सर्वांत दुर्मीळ आणि महागड्या फुलांपैकी एक आहे. त्याचे आकर्षक नमुने आणि मोठ्या पाकळ्या यांमुळे ते खरोखरच लोकप्रिय ठरते. परंतु, त्याची दुर्मीळता त्याच्या मंद वाढीमुळे आहे. या फुलाला फुलण्यासाठी १५ वर्षांपर्यंतचा कालावधी लागतो. मर्यादित उपलब्धता आणि जास्त मागणी यांमुळे या प्रत्येक फुलाची किंमत सुमारे ४.९६ लाख रुपये इतकी आहे.

केशर क्रोकस

केशर क्रोकसला मराठीत केशर, असे म्हणतात. केशर क्रोकसचे फूल स्वतः खूप महाग नसले तरी त्यातून तयार होणारा मसाला म्हणजेच केशर हा जगातील सर्वांत मौल्यवान मसाल्यांपैकी एक आहे. फक्त ५०० ग्रॅम केशर तयार करण्यासाठी सुमारे ८०,००० फुले लागतात. या फुलाच्या गडद जांभळ्या पाकळ्या आणि चमकदार पिवळ्या रंगाचे पुंकेसर फुलाला अधिक आकर्षक बनवतात.

Story img Loader