पावसाळ्यात आहाराची योग्य ती काळजी घेतली नाही तर काही विशिष्ट आजार उद्भवलेच म्हणून समजा. ते टाळण्यासाठी पावसाळ्यात आपला आहार कसा असायला हवा, याची माहिती घेऊ या.
‘नेमेचि येतो मग पावसाळा’- या म्हणीप्रमाणे पाऊस दरवर्षी हजेरी लावतो. पण त्या काळात आरोग्याची व स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर पावसाबरोबरच रोगांचे आगमनही होते. पावसात चिंब भिजून उघडय़ावर विकले जाणारे वडे, सामोसे व भजी खाताना मज्जा येते खरी, पण काही वेळा त्यामुळे होण्याऱ्या गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते.
>
कावीळ (jaundice), विषमज्वर (typhoid), अतिसार (diarrhoe), संग्रहणी (dysentery) यांसारखे काही आजार पावसाळ्यात खूप प्रमाणात पसरतात.हेपाटाइटीस-एपावसाळ्यात हेपाटाइटीस-ए या रोगाचा संसर्ग सहज होऊ शकतो.
>
संसर्गजन्य आजारात यकृत म्हणजेच लिव्हर (liver) या शरीरातील अतिशय महत्त्वाच्या अवयवाच्या कार्यात बिघाड होतो. नक्की काय होऊ शकते हे समजून घेण्यापूर्वी आपण यकृताचे शरीरातले काम काय याची माहिती करून घेणे आवश्यक आहे.आहारातून अतिरिक्त प्रमाणात पोटात गेलेल्या पिष्टमय पदार्थातील ग्लुकोजचे यकृतात गेल्यावर ग्लायकोजेनमध्ये रूपांतर होते. ते उर्जास्रोत म्हणून साठवले जाते व शरीराला ऊर्जा कमी पडेल तेव्हा त्याचा वापर होतो. अतिरिक्त पिष्टमय पदार्थामध्ये जर जास्त प्रमाणात सिंपल शुगर्स म्हणजे साखरयुक्त पदार्थ, गूळ, मध, कॅरामेल, चोकॉलेट, शीतपेये किंवा सिरपसारख्या गोडवा वाढविणाऱ्या पदार्थाचा समावेश असेल तर मात्र त्यापासून ट्रायग्लिसेराइड या चरबीची निर्मिती केली जाते.
>
यकृतात कोलेस्टेरॉलचीही निर्मिती रोज होतच असते. रक्त गोठवण्याच्या क्रियेतील महत्त्वाचा घटक म्हणजे ‘प्रोथ्रोम्बिन’ हे यकृतात तयार होते. फळे व पालेभाज्यांमधील कॅरोटीन याचे जीवनसत्त्व ‘अ’ मध्ये रूपांतर केले जाते. तसेच जीवनसत्त्व ‘अ’, ‘ब’ व ‘ड’ यकृतात साठवलेही जाते. पित्त (bile) व रक्तकणिका (platelets) याची निर्मिती देखील यकृतात होते. प्लीहा व लीम्फ नोड्सप्रमाणे यकृतातही जुन्या लाल पेशींचे विघटन होते. या प्रक्रियेत लाल रक्तपेशींमधील लोह हे खनिज शरीरात पुन्हा वापरले जाते व त्यातील ‘बिलीरुबिन’ नावाचा पिवळसर लाल रंगाचा घटक यकृतातून पित्ताशयात पाठवला जातो. नंतर तो मलावाटे (faeces) बाहेर टाकला जातो. मलाचा विशिष्ट रंग हा ‘बिलीरुबीन’मुळे असतो. हेच ‘बिलीरुबिन’ स्निग्ध पदार्थाच्या पचनासही मदत करत असते.
>
यकृताच्या कार्यात बिघाड झाल्यास रक्तातील ‘बिलीरुबीन’ची पातळी वाढते व त्वचेला पिवळसर रंग प्राप्त होतो. यालाच ‘कावीळ’ असे म्हणतात. कावीळ होणे हे खरे तर रोग नसून यकृत या अवयवाच्या कार्यात बिघाड झाला आहे हे दर्शवणारे एक वाईट लक्षण आहे. यकृताच्या कार्यातील कुठल्याही कारणाने बिघाड हा या लक्षणाद्वारे दाखवला जातो. यात त्वचा नखे व डोळ्यांतील पांढरा भाग हा पिवळसर दिसू लागतो.यकृताच्या कार्यात बिघाड होण्याची अनेक कारणे आहेत.
>
दारू, विशिष्ट औषधे यांच्या अति सेवनाने हे कार्य बिघडू शकते. पण याचबरोबर विशेषत: पावसाळ्यात सर्वात महत्त्वाचे व जास्त प्रमाणात आढळणारे कारण असते ते म्हणजे ‘विषाणूसंसर्ग (infection). मलप्रदूषित पाणी व अन्नाच्या सेवनाने एका प्रकारचा विषाणूसंसर्ग होतो. यालाच हिपेटाइटीस ए या प्रकारची लागण असे म्हटले जाते. यामध्ये आजाराची काहीच लक्षणे दिसत नसतानाही पहिले दोन आठवडे रोगी माणसाच्या मलामधून विषाणू बाहेर टाकले जात असतात. अशा रोगी माणसामुळे त्याच्या नकळत मलप्रदूषित झालेले पाणी जर प्यायच्या पाण्यात मिसळले गेले अथवा त्या मलावर माशा किंवा अन्य कीटक बसून ते अन्नावर बसले तर या प्रदूषित पाणी व अन्नाच्या सेवनाने हे विषाणू निरोगी माणसाच्या शरीरात प्रवेश करतात व यकृताचे काम बिघडवतात. हे कार्य बिघडू लागल्याची प्राथमिक लक्षणे म्हणजे भूक मंदावणे, थकवा, उलटय़ा, जुलाब, मळमळ, ताप, वजन कमी होणे, यकृतात सूज येऊन पोटात उजवीकडे वरच्या बाजूस दुखणे. या लक्षणाकडे थोडेफार दुर्लक्ष झाले किंवा योग्य प्रकारची उपाययोजना व आहारातील बदल केले गेले नाहीत तर वर सांगितल्यानुसार ‘बिलीरुबीन’ची पातळी वाढते. म्हणजेच ‘कावीळ’ होते. सर्व अंगावरची त्वचा, नखे, डोळ्याच्या आतला पांढरा भाग पिवळा दिसू लागतो. या विकारात यकृताची पचनशक्ती कमी झालेली असते. त्याचा विचार करून पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी किंवा आहारयोजना करावी. या आजारात पुरेशा विश्रांतीची खूपच गरज असते. पुरेसा आराम केल्यास आजार लवकर बरा होतो.
>
दर दोन तीन तासांनी हलका आहार घ्यावा. एकाच वेळी खूप प्रमाणात खाऊ नये.कबरेदके व प्रथिनयुक्त असा आहार घ्यावा. त्यात भात, खिचडी, गाईच्या दुधातील खीर, अंडय़ातील पांढरे, सहज पचणारी मोडाची कडधान्ये, इडली, डोसा, पांढरा ढोकळा, आप्पे असे आंबवलेले पदार्थ, गायीच्या दुधापासून केलेले पनीर (कमी प्रमाणात) या गोष्टींचा समावेश असावा.
>
खजूर, अंजीर, जर्दाळू, बेदाणे यासारखा सुकामेवा खावा.यकृताच्या कामात बिघाड झाल्यामुळे स्निग्ध पदार्थ पचायला कठीण होते. यामुळे स्निग्ध पदार्थ पूर्णत: टाळावेत किंवा अत्यंत कमी प्रमाणात घ्यावेत.
>
वडे, सामोसे, भजी, चकली व इतर तळलेले पदार्थ आहारातून वज्र्य करावेत. काजू, बदाम, अक्रोड, पिस्ते, चॉकलेट्स, मिठाई खाऊ नयेत. —मांसाहारी पदार्थ आहारातून पूर्णत: वज्र्य असावेत. एखाद वेळी उकडलेले मासे खाण्यास हरकत नसते.या आजारात सतत मळमळ होत असल्याने अन्न खाऊ नये असे वाटते. भूक मंदावते. मसाल्यांचा वापर केवळ भूक उद्युक्त करण्यापुरताच करावा.
>
उग्र वासाच्या भाज्या टाळाव्यात. कोणते वास सहन होत नसतील तर आधी फक्त द्रवाहार घ्यावा. तो जास्त प्रथिनयुक्त असायला हरकत नाही. -खीर, गाईच्या दुधाचा मिल्क शेक, डाळीचे सूप, ताजे गोड ताक यांचा समावेश असावा. तसेच उकळलेले पाणी, स्वच्छतेची पुरेशी काळजी घेऊन केलेला ताज्या फळांचा रस, नारळ पाणी, मिश्र भाज्यांचे सूप याचा आहारात समावेश करून द्रवपदार्थ वाढवावेत.
>
चहा, कॉफी याचे प्रमाण खूप कमी असावे. शीतपेये टाळावीत. दारू व इतर अमली पदार्थाचे सेवन अजिबात करू नये.यकृताच्या कोणत्याही प्रकारच्या आजारात ‘कावीळ’ हे लक्षण दिसते. हे लक्षण बळावले असता द्रव व घन आहाराचे फार काळजीपूर्वक नियोजन करावे लागते. ते असे.
>
पहिल्या आठवडय़ात रसाहार करावा – उदा. टोमॅटोचा रस, द्राक्षे, संत्री, मोसंबी, बीट, पालक, उस यांचे रस. यातून नैसर्गिक साखर, जीवनसत्त्वे व खनिजे मिळतील. परंतु हे घरी स्वच्छतेची काळजी घेऊन केलेले हवेत. बाहेरून आणलेले जंतुविरहित असतीलच याची हमी देता येत नाही. त्यानंतर तीन ते पाच दिवस साले काढून फलाहार करावा. त्यानंतर हळूहळू तीनचार फळे व दोनतीन वेळा थोडी थोडी डाळ-तांदळाची खिचडी, दही-भात, मऊ भात असे पचायला हलके, मऊ व खूप शिजवलेले पदार्थ घ्यावेत.
>
पुष्कळ प्रमाणात ‘बार्ली वॉटर’ प्यावे. पहिले दोन ते तीन आठवडे म्हशीचे दूध, लोणी, साय, तेल, तूप, बटर, खवा, मावा व त्यापासून बनवलेले पदार्थ अजिबात खाऊ नयेत, अति गोड पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ, मसालेदार पदार्थ, लोणची, पापड, मांसाहार, जंक फूड पूर्णत: वज्र्य करावेत.घरी बनवलेले ताजे पदार्थ खावेत. बाहेर उघडय़ावर विकत असलेले पदार्थ अजिबात खाऊ नयेत. अशा प्रकारे काळजी घेतल्यास यकृत पूर्ववत कार्यशील होण्यास मदत होते.
>
हेपाटाइटीस-ए प्रमाणे हेपाटाइटीस-बी व हेपाटाइटीस-सी हेही आजार विषाणूंमुळेच होतात. परंतु ते मुख्यत्त्वेकरून योग्य तऱ्हेने र्निजतुक न झालेल्या सुया वा इतर साधनांमार्फत होतात. हे आजार जास्त मोठय़ा प्रमाणावर गंभीर आजार आहेत. टायफॉइड आणि पॅरा टायफॉइडपावसाळ्यात उद्भवणारा व सहजतेने पसरणारा दुसरा धोकादायक आजार म्हणजे टायफॉइड व पॅरा टायफॉइड. सॅलमोनेला टायफी (Salmonella Typhi) व सॅलमोनेला एटरिका (Salmonella Enterica) या नावाच्या जीवाणूच्या (bacteria) प्रादुर्भावाने हे रोग उद्भवतात. या दोन्ही आजारांची कारणे व लक्षणे सारखीच आहेत. दूषित पाणी व अन्नामार्फत जीवाणूंचा शरीरात प्रवेश होतो. त्यानंतर साधारणपणे आठ ते १४ दिवस व काही वेळा अगदी ३० दिवसांनंतर आजाराची लक्षणे (सौम्य ते तीव्र स्वरूपाची) दिसू लागतात. असा रोगी या जीवाणूंचा वाहक बनतो व आजाराची लक्षणे दिसत नसूनही त्याच्या मलातून जीवाणू बाहेर टाकले जातात. हे मलातील जीवाणू अन्नातून अथवा पिण्याच्या किंवा स्वयंपाकघरात वापरलेल्या पाण्यातून एखाद्या निरोगी व्यक्तीच्या पोटात शिरले तर हा आजार पसरतो. प्राण्यांमुळे हा आजार पसरत नाही हे लक्षात घेतले पाहिजे.या आजाराची लक्षणे :ताप हळूहळू वाढत जाऊन अनेक दिवसांपर्यंत राहतो. ताप अगदी १०४ पर्यंत पोहोचतो.अतिशय थकवा येतो.अंगदुखी, पोटदुखी, बद्धकोष्ठता व डोकेदुखीचा त्रास होतो.काही जणांच्या पोटावर किंवा छातीवर गुलाबी रंगाच्या ठिपक्यासह पुरळ येते.अशा वेळी जर रोग्यावर योग्य उपचार झाले नाहीत तर त्याच्यामार्फत रोग पसरतो. हा आजार हळूहळू कसा बळावत जातो ते पाहूया.
>
पहिल्या आठवडय़ात शरीराचे तापमान वाढत राहते व कमी-जास्त होते. डोकेदुखी, थकवा, खोकला होतो. काहींना नाकातून रक्त येते व पोटात दुखते. त्याकाळात पांढऱ्या पेशी कमी होतात. पहिल्या आठवडय़ात विडाल टेस्ट (widal test) ही रक्ततपासणी निगेटिव्ह तर ब्लड कल्चरची (blood culture) तपासणी पॉझिटिव्ह असते.दुसऱ्या आठवडय़ात रोग्याला अत्यंत थकवा येतो, उठायचीही ताकद राहत नाही. अतिशय वाढलेला ताप व हृदयाच्या ठोक्यांची गती मंदावते. रोगी तापात असंबद्ध बोलू, बरळू लागतो. पोट व छातीच्या खालील भागात गुलाबी ठिपके येतात. छातीत घरघर आवाज येऊ लागतो. पोट फुगते. मलाचा रंग हिरवा होतो. विडाल टेस्ट पॉझिटिव्ह येते. अशा अवस्थेत योग्य उपाययोजना झाली नाही तर तिसऱ्या आठवडय़ात आहार बळावतो व गुंतागुंतीची परिस्थिती ओढवते. न्यूमोनिया, ब्रॉन्कायटिस, डिहायड्रेशन या सर्वाना तोंड द्यावे लागते. त्यामुळे वेळेवर योग्य औषधोपचार घेणे व काही आहाराची पथ्ये पाळणे गरजेचे ठरते. स्वच्छतेच्या व अन्नसेवनाच्या चुकीच्या सवयींमुळे या रोगाचा जास्त प्रसार होतो. उघडय़ावर शौच केल्यामुळे त्यावर माश्या बसून त्या उघडय़ा अन्नपदार्थावर, पाण्यावर बसतात, अन्न व पाणी प्रदूषित होते.
>
आहारातील बदल व काही सूचना : उघडय़ावर शौच न करणे, शौचास जाऊन आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुणे, माश्या व कीटक बसलेले उघडय़ावरचे अन्न न खाणे अशा सर्व गोष्टी अमलात आणणे खूप गरजेचे आहे. आजार झाल्यास ताप उतरेपर्यंत पहिले काही दिवस द्रव पदार्थाचा आहार असावा.
>
द्रव पदार्थाचे स्रोत जसे उकळलेले पाणी, नारळ पाणी, बार्लीचे पाणी, ग्लुकोजचे पाणी, ताजे ज्यूस, विविध मिश्र भाज्यांचे व डाळींचे सूप, ताक, तांदळाची पेज असे पदार्थ जास्त प्रमाणात घ्यावेत. चहा-कॉफी कमी प्रमाणात तर शीतपेये टाळावीत. मद्यपान वज्र्य करावे. ताप उतरू लागला की हळूहळू भूक वाढते. त्या वेळी फलाहार व उकडलेल्या भाज्या घ्याव्या. त्यात केळी, कलिंगड, खरबूज, टरबूज, द्राक्ष, पीच आणि ओले जर्दाळू, उकडलेल्या गाजर, फरसबी, बीट, तोंडली, फ्लॉवर अशा भाज्या घ्याव्यात. पण ही फळे साले काढून खावीत किंवा स्वच्छ पाण्याने धुऊन किंवा कोमट पाण्यात थोडय़ा वेळ ठेवून मगच खावीत.
>
भूक अजून वाढली की उकडलेला बटाटा, मऊ शिजवलेला भात दही किंवा थोडे वाफवलेले सफरचंद, पेर असे पदार्थ खावेत. या आजारात शारीरिक झीज जास्त होत असल्यामुळे आजारातून बरे होताना प्रथिनयुक्त पदार्थ आहारात असावेत.
>
प्रथिनांची गरज पुरविण्यासाठी इतर मांसाहारी पदार्थ घेण्यापेक्षा गाईचे दूध व दही, अंडी व वाफवलेले मासे खाणे योग्य. तसेच चिकन किसून सूपमध्ये घालून खावे. शाकाहारी व्यक्तीने डाळी, कडधान्य, इडली व डोसा असे काही आंबवलेले पदार्थ, मिश्र डाळींच्या पिठाची धिरडी, घरी केलेले गाईच्या दुधाचे पनीर खावे.
>
मसालेदार, तेलकट व तिखट पदार्थ टाळावेत. जास्त प्रमाणात तंतू असलेले पदार्थ जसे कच्च्या भाज्या, सालासकट फळे, अख्खे धान्य व कडधान्य, सॅलेड टाळावेत. घरचेच सूप, हलके अन्न घ्यावे. रस्त्यावरील विक्रेत्यांकडून सँडविच, भेळ व इतर चाट, चायनीज भेळ असे कच्च्या भाज्या असलेले पदार्थ खाऊ नयेत. बाहेर खाण्याची क्वचित वेळ आलीच तर गरम पदार्थ खावेत. तसेच बाहेरून आणलेले मिठाई, पेढे, बर्फी, पनीर व इतर दुग्धजन्य पदार्थ टाळावेत.काही स्वच्छतेच्या सवयी व योग्य आहार अमलात आणून आपल्या आरोग्याची काळजी घ्या व पावसाळ्याचा मनसोक्त आनंदही लुटा.
डॉ. वैशाली जोशी
सौजन्य – लोकप्रभा