भारतीय आणि त्यांचे खाद्यप्रेम हे जगजाहीर आहे. अगदी एखाद्या लहानशा गल्लीपासून ते अगदी पंचतारांकित हॉटेल्सपर्यंत तुम्हाला कुठेही चांगल्या चवीचे आणि नाविन्यपूर्ण पदार्थ अगदी सहज मिळू शकतात. मात्र, काही पदार्थ हे त्यांच्या चवीबरोबरच त्याच्या रंजक इतिहासाबद्दल ओळखले जातात. महाराष्ट्रात तर असे कितीतरी पदार्थ आपल्याला पाहायला मिळू शकतील. त्यापैकी आपण या बातमीमध्ये आमटी, कालवण आणि पांढऱ्या रश्श्याबद्दल काही भन्नाट आणि रंजक माहिती घेऊया.
आपण दररोज जेवताना भातावर खायला, आमसूल घालून बनवलेली तिखट मात्र काहिशी आंबट-गोड चवीची आमटी आवर्जून घेतो किंवा पुरणपोळीबरोबर खाण्यासाठी कटाची आमटी बनवली जाते. मात्र, याचे खरे नाव तुम्हाला माहीत आहे का? खरंतर आमटी हा कोकणातून आलेला पदार्थ आहे. त्याचे मूळ नाव ‘कोरड्यास’असे आहे. आमसूल घालून केलेली आमटी म्हणजेच, कोसरड्यास. मात्र, हा पदार्थ पुढे सर्वदूर गेल्यानंतर, कोरड्यासची आमटी झाली.
मग कोकणात शिंपले वापरून बनवले जाणारे कोरड्यास यालाही आपण आमटी म्हणू शकतो का? तर नाही. कोकणात शिंपले घालून केलेल्या कोरड्यासला कालवण असे म्हटले जाते. त्यामुळे यापुढे कोकणात गेल्यानंतर जर तुम्हाला कुणी कोरड्यास किंवा शिंपल्याचे कोरड्यास खाणार का, असे विचारले तर गोंधळून जाऊ नका.
ही झाली आमटी आणि कालवणाची माहिती. आता पाहू आपल्या लाडक्या कोल्हापुरातील तांबड्या-पांढऱ्या रश्श्याची खास आणि ऐतिहासिक कहाणी.
कोल्हापूर म्हटलं की आपल्यासमोर दोन गोष्टी चटकन डोळ्यासमोर येतात. पहिली कोल्हापुरी चपला, दुसरी म्हणजे झणझणीत तांबडा आणि सौम्य चवीचा पांढरा रस्सा. हा रस्सा अगदी जगभरात प्रसिद्ध आहे, असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. तुम्ही कोल्हापुरी थाळी मागवली की त्यामध्ये लाल भडक रंगाचा झणझणीत असा तांबडा रस्सा मिळतो, तर त्याच्या बरोबरीला तितकाच सौम्य चवीचा पांढरा रस्सा आपल्याला दिला जातो. मात्र, यामधील पांढऱ्या रश्श्याबद्दल एक खास गोष्ट ‘कहाणी शब्दांची’ या पुस्तकामध्ये दिलेली आहे.
त्यानुसार या रश्श्याची निर्मिती ही राजर्षी शाहू महाराजांच्या काळात झाली आहे. त्या काळामध्ये आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते. तेव्हादेखील इंग्रजांना आपल्या इथे मिळणारे जेवण तिखट लागत असे. असे असताना कोल्हापुरातील भरपूर तिखट घालून बनवलेला, लालभडक आणि झणझणीत रस्सा खाणे म्हणजे केवळ अशक्य. एक घास जरी खाल्ला तरी त्यांच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागायच्या.
आता यावर उपाय म्हणून, शाहू महाराजांच्या खानसाम्याने एक शक्कल लढवली. त्याने तीळ आणि मिरपूड यांचा वापर करून पहिल्यांदा हा पांढरा रस्सा, खास गोऱ्या अधिकाऱ्यांसाठी बनवला होता. मात्र, आता याच तांबड्या आणि पांढऱ्या रश्श्याच्या जोडीने सर्व खवय्यांची मने जिंकली. पुढे तांबड्याबरोबरीने पांढरा रस्सादेखील कोल्हापूरची शान आणि ओळख बनली हे वेगळे सांगायला नको.
वरील माहिती ही सदानंद कदम यांनी लिहिलेल्या ‘कहाणी शब्दांची’ नावाच्या पुस्तकातून घेतलेली आहे.