IRCTC login Issues: सुट्ट्यांच्या दिवसांत अनेक जण कुटुंबीयांसह गावी किंवा मित्र-मैत्रिणींसह पिकनिकला जायचा प्लॅन करत असतात, पण त्यासाठी आधी रेल्वेची तिकिटे बुक करणं खूप गरजेचं असतं नाहीतर आयत्यावेळी तिकीट मिळत नाही. यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) या ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा अनेक जण वापर करतात. या सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी वापरकर्त्यांना लॉगिन आयडी आणि पासवर्डची आवश्यकता असते. जे लोक सतत या सेवेचा वापर करत नाहीत ते कदाचित पासवर्ड विसरू शकतात.
काळजी करू नका, अशावेळी आयआरसीटीसी वापरकर्त्यांना नोंदणीकृत ईमेल आयडी किंवा मोबाइल नंबर वापरून सोप्या ऑनलाइन प्रक्रियेद्वारे त्यांचे पासवर्ड रिसेट करण्याची परवानगी देते. परंतु, हे नक्की कसं करायचं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तुमचा IRCTC पासवर्ड कसा रिसेट करायचा
तुमचा नोंदणीकृत ईमेल आयडी वापरा
१. आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या आणि ‘Forgot Password’ या लिंकवर क्लिक करा.
२. तुमचे नाव (User name) टाका आणि पुढे क्लिक करा.
३. नोंदणीदरम्यान तुम्ही सेट केलेल्या सुरक्षा प्रश्नाचे उत्तर द्या. खाते पुनर्प्राप्तीसाठी हे उत्तर लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
४. प्रश्नाचे यशस्वीरित्या उत्तर दिल्यानंतर तुमचा पासवर्ड रिसेट करण्यासाठी IRCTC कडून आलेल्या सूचनांसाठी तुमचा ईमेल तपासा.
५. नवीन पासवर्ड तयार करण्यासाठी दिलेल्या सूचनांचे पालन करा. भविष्यातील समस्या टाळण्यासाठी एक मजबूत पासवर्ड निवडा.
तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर वापरा
१. आयआरसीटीसी वेबसाइटवर जा आणि ‘Forgot Password’ हा पर्याय निवडा.
२. तुमचे नाव (User name) टाका आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
३. तुम्ही पासवर्ड रिकव्हरी पेजवर पोहोचाल. तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर एंटर करा.
४. तुमच्या मोबाइलवर एक ओटीपी (वन टाइम पासवर्ड) पाठवला जाईल. पासवर्ड रिकव्हरी पेजवर हा ओटीपी एंटर करा.
५. OTP ची पुष्टी केल्यानंतर, तुमचा नवीन पासवर्ड पुन्हा एंटर करून तो तयार करा आणि पुष्टी करा. सुरक्षितता वाढवण्यासाठी त्यात अक्षरे, संख्या आणि विशेष वर्णांचे मिश्रण असल्याची खात्री करा.
जर तुम्हाला ऑनलाइन प्रक्रियेत अडचणी येत असतील, तर आयआरसीटीसीची कस्टमर केअर तुम्हाला पासवर्ड रिकव्हरी आणि अकाउंट अॅक्सेसमध्ये मदत करण्यासाठी उपलब्ध आहे.