“नावात काय आहे?” असं शेक्सपीयर जरी म्हंटलं असलं तरी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मात्र त्याच्या या म्हणण्याला अजिबात किंमत नाही, कारण तिथे नावातच सगळं असतं असं म्हंटलं तरी वावगं ठरणार नाही. आज दाक्षिणात्य चित्रपटांनी थेट ऑस्करपर्यंत मजल मारली असल्याने तो काही आता प्रादेशिक चित्रपट राहिलेला नाही. या चित्रपटांप्रमाणेच दाक्षिणात्य सुपरस्टार्सची ख्यातीदेखील साऱ्या जगभरात पोहोचली आहे. त्यातूनही तमिळ सुपरस्टार्सची तिथली लोक एका दैवताप्रमाणे पूजा करतात.
या तमिळ सुपरस्टार्सचे चित्रपट जेव्हा मोठ्या पडद्यावर झळकतात तेव्हा त्यांच्या नावाआधी एक टायटल किंवा बिरुद लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं. उदाहरण द्यायचं झालं तर ‘उलगनायगन’ कमल हासन, ‘थाला’ अजित कुमार, ‘थलपती’ विजय ही नावं आपण बऱ्याचदा ऐकली आहेत अन् मोठ्या पडद्यावर पाहिली आहेत. आज आपण याच सुपरस्टार्सच्या नावाआधी लागणाऱ्या बिरूदाबद्दलची माहिती आणि त्यामागील खरा अर्थ जाणून घेणार आहोत.
आणखी वाचा : लोकप्रिय रॅपर रफ्तार कपिल शर्माच्या शोला म्हणाला ‘दिखावा’; म्हणाला “खऱ्या आयुष्यात…”
१. थलाईवा रजनीकांत :
रजनीकांत यांचं नाव घेतल्याशिवाय भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास पूर्ण होणार नाही. रजनीकांत यांचा चाहता वर्ग आणि त्यांची क्रेझ आजही बघून आपण हैराण होतो. रजनीकांत यांनी १९७५ मध्ये ‘अपूर्वा रागंगल’ या चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारत आपलं करिअर सुरू केलं. १९७८ च्या ‘भैरवी’ या चित्रपटाने त्यांना प्रथम सुपरस्टार ही ओळख मिळवून दिली. सुरुवातीला ‘सुपरस्टार’ या उपाधीबद्दल स्वतः रजनीकांत एवढे उत्सुक नव्हते कारण ती उपाधी त्यावेळचे तमिळ चित्रपटसृष्टिचे स्टार एमजीआर आणि शिवाजी गणेशन यांना जास्त शोभून दिसते असं त्यांचं मत होतं. पण नंतर जनतेनेच रजनीकांत यांना सुपरस्टार हे बिरुद लावलं आणि त्या सुपरस्टारचं रूपांतर ‘थलाईवा’मध्ये झालं. तमिळ भाषेत या शब्दाचा अर्थ ‘बॉस’, ‘नेता’ किंवा ‘लीडर’ असा होतो.
२. उलगनायगन कमल हासन :
सुपरस्टार हे बिरुद कमल हासन यांच्या साठीसुद्धा बऱ्याचदा वापरलं गेलं आहे, पण तमिळ चित्रपटविश्वात कमल यांच्या नावाआधी लागणारं ‘उलगनायगन’ हे बिरुद जास्त लोकप्रिय आहे. याचा अर्थ ‘ युनिव्हर्सल हीरो (वैश्विक कीर्तीचा हीरो)’ असा होतो. ८० च्या दशकात कमल हासन यांच्या अभिनयाचे लाखो चाहते होतेच पण १९९२ च्या ‘तेवर मगन’ या चित्रपटामुळे कमल हासन यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. या चित्रपटाची कथासुद्धा कमल यांनीच लिहिली होती. त्यावेळी हा चित्रपट ऑस्करसाठी अधिकृत एन्ट्री म्हणून पाठवण्यात आला होता. तेव्हा कमल हासन ऑस्कर आणणार ही चर्चा चांगलीच रंगली आणि यातूनच त्यांना ‘उलगनायगन’ म्हणजेच ‘युनिव्हर्सल हीरो’ हे बिरुद मिळालं. याआधी १९८४ मध्ये ‘नम्मावर’ या चित्रपटात काम केल्याने कमल यांना नम्मावर म्हंटलं जायचं ज्याचा अर्थ ‘आपला माणूस’ असा होतो. २०१८ मध्ये जेव्हा कमल हासन यांनी स्वतःचा राजकीय पक्ष काढला तेव्हा ते म्हणाले कि “आता मी पुन्हा ‘उलगनायगन’चा ‘नम्मावर’ झालो आहे.”
३. थाला अजित कुमार :
९० च्या दशकात पदार्पण करणाऱ्या अजित कुमार यांचाही प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. २००१ मध्ये आलेल्या ‘दिन’ या चित्रपटामुळे त्यांच्या लोकप्रियतेमध्ये भर पडली, त्यांना एक अॅक्शन स्टार म्हणून ओळख मिळाली. या चित्रपटातील एका गाण्यात त्यांच्या पात्रासाठी ‘थाला’ या शब्दाचा वापर केला गेला. याचा अर्थ होतो ‘लीडर’. यानंतर मात्र स्टार अजित कुमारच्या नावाआधी ‘थाला’ हे बिरुद लागलं ते कायमचं.
४. चियान विक्रम :
‘अपरिचित’ या चित्रपटाने संपूर्ण देशाला वेड लावलं आणि यात मुख्य भूमिका साकारणाऱ्या विक्रमची जादू आजही कायम आहे. विक्रमचं खरं नाव केनडी जॉन विक्टर, चित्रपटसृष्टीत मात्र त्याला ‘चियान’ विक्रम या नावानेच ओळखलं जातं. तमिळ भाषेतील ‘चियान’ या शब्दाचा अर्थ गंभीरता आणि विद्वत्ता असा काहीसा आहे. अर्थात हे नाव विक्रमच्या व्यक्तीमत्त्वाला साजेसच आहे. विक्रमला हे बिरुद एवढं आवडतं की बऱ्याच लोकांना तो त्याला याच नावाने हाक मारायला सांगतो.
५. थलपति विजय :
जोसेफ विजय चंद्रशेखर उर्फ विजयने आपल्या वडिलांबरोबर वेगवेगळ्या चित्रपटात काम केलं. १९९४ मध्ये वडिलांनी केलेल्या ‘रसिगन’ या चित्रपटात विजयच्या नावाआधी ‘इलयाथलपती’ म्हणजेच ‘तरुण कमांडर’ हे बिरुद लावलं अन् विजयचा हा पहिला सुपरहीट चित्रपट ठरला. २०१७ मध्ये मात्र दिग्दर्शक अॅटलीने ‘मर्सल’ या चित्रपटामध्ये विजयच्या नावाआधी फक्त ‘थलपती’ लावलं ज्याचा अर्थ होतो ‘कमांडर लीडर’.
६. नदिप्पिन नायकन सूर्या :
तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्याला मिळालेलं बिरुद हे फारसं कोणालाच ठाऊक नाही. बॉलिवूडमध्ये ‘सिंघम’ आणि ‘गजनी’ सुपरहीट ठरले पण ते याच तमिळ सुपरस्टारच्या चित्रपटांचे रिमेक होते. नुकतंच ‘जय भीम’, ‘जन गण मन’, ‘विक्रम’सारख्या चित्रपटातून सूर्याने पुन्हा बॉक्स ऑफिसवर धमाका केला. पण २००१ मध्ये आलेल्या ‘नंदा’ या चित्रपटातून सूर्याने प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटातील सूर्याच्या लाजवाब अदाकारीमुळेच त्याला ‘नदिप्पिन नायकन’ म्हणून ओळख मिळाली. याचा अर्थ ‘अभिनय विश्वात सर्वोत्तम’ असा होतो.
७. मक्कल सेल्वन विजय सेतुपती :
‘९६’, ‘विक्रम वेधा’, ‘विक्रम’ आणि नुकतीच आलेली ‘फर्जी’ वेबसीरिजमधून प्रेक्षकांवर स्वतःच्या वेगळ्या अभिनयाची छाप पडणारा विजय सेतुपती हा सुद्धा तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रचंड लोकप्रिय अभिनेता आहे. ‘धर्मदुराई’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शक सीनू रामस्वामी यांनी हे बिरुद विजय सेतुपतीला दिलं. ‘मक्कल सेल्वन’म्हणजे ‘जनतेचा खजिना किंवा अशी व्यक्ती ज्याच्यावर लोक प्रचंड प्रेम करतात’. विजय सेतुपती यांची लोकप्रियता बघता त्यांना मिळालेलं हे विशेषण अगदी योग्य आहे.