Trishundi Ganapati Temple: सध्या राज्यभरात सगळीकडे गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून, येत्या ७ सप्टेंबर रोजी घरोघरी, सार्वजनिक मंडळांमध्ये गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जाईल. गणपती हे अवघ्या महाराष्ट्राचे लाडके आराध्य दैवत आहे. मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पुण्यातीलही अनेक प्रसिद्ध गणेशमूर्तींचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक येतात. खरे तर, लोकमान्य टिळकांनी पुण्यातूनच सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली होती. पुण्यात गेल्यावर गणपतीचे दर्शन घ्यायचे म्हटले की, दगडूशेठ हलवाई गणपती, कसबा गणपती, केसरीवाड्याचा गणपती यांसारखी काही प्रसिद्ध नावे आपल्या डोळ्यांसमोर येतात. पण, याच प्रसिद्ध गणेशमूर्तींमध्ये असे एक गणपती मंदिर आहे, जे जवळपास १८व्या शतकात बांधले गेले आहे. हे पुरातन मंदिर कोणते? मंदिराची रचना कशी आहे ते आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यात १८व्या शतकात बांधले गेलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण मंदिराचे नाव त्रिशुंड गणपती मंदिर, असे आहे. त्रिशुंड गणपती मंदिर भीमगीरजी गोसावी महंत यांनी १७५४ साली बांधल्याचे म्हटले जाते. या मंदिरातील गणपतीच्या मूर्तीला तीन सोंडा आहेत. दुर्मीळ स्थापत्यशैली आणि तळघर यांसारख्या अनेक गोष्टींमुळे हे मंदिर आजच्या काळातही आवर्जून पाहावे, असेच आहे.

त्रिशुंड गणपती हे पुण्यातील सोमवार पेठेत असलेले एक पुरातन मंदिर गिरी गोसावी पंटाचे आहे. या गणपतीच्या मंदिरातल्या मूर्तीच्या खाली तळघरात मंदिराचे संस्थापक महंत श्री दत्तगुरू गोस्वामी महाराज यांची समाधी आहे. मूर्तीवर अभिषेक केला की, तळघरात असलेल्या समाधीवर ते जल ओघळते.

मंदिरातील मूर्ती

गर्भगृहात गणपतीच्या मूर्तीमागे शेषशायी भगवान विष्णूची एक साडेतीन फूट उंचीची रेखीव मूर्ती आहे; पण गर्भगृहातील अंधार व गणेशमूर्तीमुळे ती दिसून येत नाही. मोरावर बसलेल्या या गणेशमूर्तीची बैठक चौकोनी आहे. या गणेशमूर्तीच्या तीन सोंडांपैकी उजवी सोंड खालच्या हातात असलेल्या मोदकांना स्पर्श करतेय, मधली सोंड गणपतीच्या पोटावर आहे आणि डावी सोंड डाव्या मांडीवर बसलेल्या शक्तीच्या हनुवटीस स्पर्श करताना दिसत आहे.

हेही वाचा: जगातील ‘या’ देशांमध्ये एकही नदी नाही; हे देश जलस्रोतांचे व्यवस्थापन कसे करतात?

मंदिराची वास्तू

या मंदिराची वास्तू कोरीव लेण्यांसारखी असून, येथील प्रत्येक दारावर शिल्पकलेचा नमुना पाहायला मिळतो. या मंदिरामध्ये अनेक ठिकाणी कोरीव लेणीही पाहायला मिळत आहे. तसेच या मंदिराला कळस नाही. मंदिराच्या वरच्या बाजूस कासव आहे. माहितीनुसार वर शिवलिंग प्रतिष्ठापित करण्याची कल्पना अपूर्ण राहिल्याचे म्हटले जाते. मंदिरावर शिखराऐवजी एकावर एक अशी शिवलिंगे आहेत.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh chaturthi 24 18th century trishundi ganapati temple pune mysterious temple sap