कोकण तसेच पुणे परिसरातील काही घरांमध्ये २० ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन झाले आहे. बहुतांशी महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये गणपतीचे आगमन दि. १९ सप्टेंबर रोजी होणार आहे. मग, २० ऑगस्ट रोजी गणपतीचे आगमन कसे झाले ? तर टिळक पंचांगानुसार दि. २० ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू झाला आहे. या पंचांगानुसार श्रावण हा अधिक मास नव्हता. तर, टिळक पंचांग म्हणजे काय आणि त्याची रचना जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टिळक पंचांग म्हणजे काय ?

टिळक पंचांगकर्ते प्रो. केरो लक्ष्मण छत्रे यांनी १८६५ पासून हे भारतातील पहिले दृकप्रत्ययी शुद्ध निरयन पंचांग उदयास आणले. रत्नागिरीतील जगन्मित्र छापखान्याचे मालक जनार्दन आठल्ये हे १८६९ ते १८८९ या काळात पंचांग स्वखर्चाने छापत होते. १८९० पासून पुण्यातील वासुदेव जोशी छापू लागले. लोकमान्य टिळकांनी पंचांगाचा पुरस्कार केल्यावर १९२६ पासून हे पंचांग केसरी मराठा संस्थेतर्फे छापले जात आहे. रत्नागिरीमध्ये हे पंचांग मिळते. टिळक हे थोर गणिती व खगोलशास्त्र विषयातील जाणकार होते. त्यांनी सखोल अभ्यास करून जे पंचांग विकसित केले, ते ‘ टिळक पंचांग’. सध्या बाजारात उपलब्ध असलेले बहुतांश दिनदर्शिका सोलापूरकर दाते पंचांग वापरतात.

हेही वाचा : नागपंचमीला भावासाठी उपवास का करतात ? सापांची उत्पत्ती कशी झाली ? काय आहेत आख्यायिका

रत्नागिरी जिल्ह्यात ठराविक गावांमध्ये टिळक पंचाग वापरकर्ते कुटुंब आहेत. त्यांच्या घरी जुलै महिन्यातच श्रावणातील व्रतवैकल्यांना प्रारंभ झाला आहे. दर तीन वर्षांनी अधिक महिना येतो. टिळक पंचागानुसार पुढील वर्षी चैत्र महिना अधिक आहे. त्यामुळे श्रावणातील सर्व सण, गणेशोत्सव, दीपावलीसह सर्व सण एक महिना आधी साजरे होणार आहेत. त्यानंतर निर्णयसागर पंचागानुसारचे सण साजरे होतील. चैत्र महिन्यानंतर दोन्ही पंचांगांचे सणवार एकत्र साजरे होऊ लागतील.
या वर्षी १९ वर्षांनंतर श्रावण महिना अधिक आला आहे. त्यामुळे दोन्ही पंचांगांचे सणवार वेगवेगळे साजरे होतील. टिळक पंचागानुसार सध्या श्रावणातील सर्व सण साजरे होणार आहेत. यानुसार व्रतवैकल्ये, मंगळागौर, नागपंचमी, रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा सण साजरे केले जातील. चांद्रमास व ऋतू यांची सांगड कायम राहण्यासाठी पंचागकर्त्यांनी अधिक मास दिला आहे. ज्या चांद्रमासात सूर्याचे राशीसंक्रमण होत नाही तो अधिकमास असतो. जुन्या आणि टिळक पंचागांमध्ये फरक येण्याचे कारण यांच्या सूर्यसंक्रांतीच्या वेळेत सुमारे चार दिवसांचे अंतर हे आहे. हे अंतर दोन्ही पंचागकर्त्यांनी राशिचक्रारंभास्थान वेगवेगळे मानल्याने येते.

हेही वाचा : महिलांना शस्त्रे दिल्यामुळे प्रश्न सुटणार की वाढणार ?

दोघांच्या राशिचक्रारंभ स्थानामध्ये चार अंशाचा फरक आहे. जुन्या पंचांगानी पूर्वीच्या गणिताच्या स्थूलतेमुळे झालेली चूक तशीच ठेवली आहे व टिळक पंचांगाने ही चूक दुरुस्त केली आहे.

टिळक पंचांगाची वैशिष्ट्ये

टिळक पंचांग व दाते पंचांग यात थोडासा जो फरक पडतो तो नववर्षदिनामुळे (पाडवा). दाते पंचागाप्रमाणे चित्रेच्या तार्‍यापासून बरोबर १८० अंशावर सूर्य आला की नव्या वर्षाची कालगणना सुरू होते. टिळक पंचांगाप्रमाणे हीच कालगणना सूर्य झीटा पिशियम तार्‍यापाशी आला की सुरू होते. या दोन्ही स्थानांमधे ४ ते ५ अंशाचा फरक असल्याने टिळक पंचांग व दाते पंचांग यात काही दिवसांचा फरक पडतो.

टिळक पंचांगाप्रमाणे सण

टिळक पंचांगानुसार साजरे होणारे सण – २३ जुलै- नागपंचमी, १ ऑगस्ट- नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन-८ ऑगस्ट, श्रीकृष्ण जन्माष्टमी, ९-गोपाळकाला. भाद्रपद महिन्यातील सण- १९ ऑगस्ट-हरितालिका, २०-श्री गणेश चतुर्थी, २१- ऋषिपंचमी, २४- गौरी आवाहन, २५- गौरीपूजन, २६- गौरीविसर्जन, २८- वामन द्वादशी, ३०- अनंत चतुर्दशी.

टिळक पंचाग वापरणाऱ्या लोकांकडे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे भागात काही लोकांकडे गणरायाचे रविवारी आगमन झाले आहे. तसेच दरवर्षीसुद्धा गणपतीच्या आगमनात एक-दोन दिवसाचा फरक असतो.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganpati arrived in some houses ganeshotsav started according to tilak panchang know about tilak panchang vvk
Show comments