जगभरात नियम आणि कायद्याचं उल्लंघन केल्यास दंड आणि शिक्षा ठोठावली जाते. काही देशांचे कायदे खूप कडक आहेत, यामध्ये UAE सारख्या देशांचा समावेश आहे, जिथे प्रत्येक चूक किंवा नियम तोडल्यास शिक्षा दिली जाते. मात्र २० ते २२ मार्च या कालावधीत यूएईमध्ये नियम तोडणाऱ्यांना ५० टक्के सूट दिली जाणार आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना ही कसली ऑफर आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, जिथे नियम तोडण्यासाठी सूट दिली जात आहे. पण ते खरे आहे. खरं तर २० मार्चला जागतिक आनंद दिना(International Day of Happiness)निमित्त यूएई सरकारने लोकांना मोठा दिलासा दिला आहे. २० मार्च ते २२ मार्चदरम्यान जर कोणी दैनंदिन जीवनातील महत्त्वाचे नियम मोडले तर त्याला फक्त ५० टक्के दंड भरावा लागणार आहे.
जागतिक आनंद दिना(International Day of Happiness)निमित्त खास ऑफर
जीवनात आनंदी आणि हसत राहणे या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने जुलै २०१२ मध्ये २० मार्च हा आंतरराष्ट्रीय आनंद दिन म्हणून घोषित केला. तेव्हापासून जगभरातील लोक आनंदाचा दिवस साजरा करतात आणि म्हणूनच यूएई सरकार नियम तोडल्याबद्दल नागरिकांना हा दिलासा देत आहे.
३ दिवसांसाठी दंडावर ५०% सूट
खलीज टाइम्सच्या वृत्तानुसार, या निमित्ताने रास अल खैमाह सार्वजनिक सेवा विभागाने ३ दिवसांच्या कालावधीसाठी म्हणजे २० मार्च ते २२ मार्च २०२३ या कालावधीसाठी ५० % दंड माफ करण्याची घोषणा केली. दैनंदिन जीवनात कचरा टाकणे, धूम्रपानरहित झोनमध्ये धूम्रपान केल्यास ५० टक्के दंड आकारला जाणार आहे. तसेच टोल-गेटचे उल्लंघन करण्यासह इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रास अल खैमाहच्या रहिवाशांना ५० % दंड माफी मिळणार आहे.
२०१३ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या १९३ सदस्य देशांनी जागतिक आनंद दिन साजरा केला. मानसशास्त्रीयदृष्ट्या ज्या दिवशी आपल्याला कळेल की, जीवनात आनंद किती महत्त्वाचा आहे, त्या दिवसापासून आपण अधिक उत्साही राहायला शिकतो आणि दीर्घकाळ जगतो. सर्व लोकांच्या जीवनाचे ध्येय आनंदी राहणे असले पाहिजे, असे संयुक्त राष्ट्राचेही मत आहे.