भारतात सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी नाही. अनेकजण आवडीने एकदा तरी सोन्याचा दागिना खरेदी करतात. या सणासुदीला सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा एक वेगळा ट्रेंड भारतात पाहायला मिळतोय. या सर्वात महाग धातू्च्या पुढे इतर धातूच्या दागिन्यांची चमकही फिकी पडत आहे. सोन्याच्या प्रचंड मागणीमुळे आज त्यांची किंमत ६० हजार प्रति ग्रॅमच्या पुढे पोहचली आहे. सोन्याच्या कॅरेटनुसार किंमती रोज बदलत असल्यामुळे खरेदीमध्ये अडचणी येतात, अशावेळी काही ज्वेलर्स मनमानीचे दर आकारून ग्राहकांना फसवतात. मात्र सोने खरेदी करण्यापूर्वी फक्त या ५ महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्यास कोणताही ज्वेलर्स तुमची सोने खरेदी करताना फसवणूक करणार नाही. यामुळे सोने खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याबाबत इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष कमल जैन पलवाल यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
सर्वप्रथम सोन्याच्या कॅरेटचे गणित समजून घ्या
जर तुम्ही २४ कॅरेट बिस्किट खरेदी करत असाल २४ कॅरेट सोन्याची किंमत सारखीच असेल, पण तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करत असाल तर ते भारतात २३, २२, २०, १८ आणि १४ या कॅरेटमध्ये बनवले जातात. त्यानुसार सोन्याची किंमत निश्चित केली जाते.
२३ कॅरेट – ९५. ८८ टक्के सोने
२२ कॅरेट – ९१.६६ टक्के
२० कॅरेट – ८४ टक्के
१८ कॅरेट – ७५.७६ टक्के
१४ कॅरेट – ५८.५० टक्के
सोन्याच्या दागिन्यांवर काय लिहिलेले असावे?
सोने खरेदी करताना त्यावर हॉलमार्क असले पाहिजेत. दागिन्यांवर BIS ची त्रिकोणी खूण लिहिली पाहिजे, ज्याला भारतीय मानक ब्युरोने मान्यता दिली आहे असे मानले जाते. यासोबतच दागिन्यांच्या मागील बाजूस किंवा आतील बाजूस HUID (हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन) क्रमांक देखील लिहिलेला असतो, जो 6-अंकी अल्फान्यूमेरिक कोड असतो ज्यामध्ये काही संख्या आणि काही अक्षरे लिहिलेली असतात.
उदाहरणार्थ, जर तुमचा दागिना २२ कॅरेटचा हॉलमार्क असल्याचे सांगत असेल, तर त्या दागिन्यावर BIS मानक मार्कसह 22k916 लिहिलेला असेल, त्यासोबत 6 अंकी HUID क्रमांक असेल. तसे नसेल तर दागिना हॉलमार्क केलेला नाही. यामध्ये भेसळ होऊ शकते.
दागिन्यांचे दर कसे ठरवले जातात?
कॅरेट आणि हॉलमार्क जाणून घेतल्यावर, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दागिन्यांची किंमत. सोन्याच्या दागिन्याची किंमत ही कॅरेटवर निश्चित होते.
त्याचे साधे गणित असे आहे की, समजा २४ कॅरेट सोन्याची किंमत ६० हजार रुपये असेल तर तर २२ कॅरेट सोन्याची किंमत ६० हजार रुपयांचे ९१.६६ टक्के काढणार ती असेल. ज्वेलरच नाही तर तुम्ही देखील ते कॅलक्युलेट करु शकता. ज्वेलर तुम्हाला काही वेगळी किंमत सांगत असेल तर त्याच्याशी बोला. 18 कॅरेटमध्येही असेच असेल.
सोन्याचे दर कसे चेक कराल?
सोन्याचे दर रोज बदलत असले तरी तुम्ही लाईव्ह दर चेक करु शकता. यासाठी सोन्याचे थेट दर इंडिया बुलियन असोसिएशनच्या वेबसाईटचा वापर करणे चांगले आहे, ज्यावरून तुम्हाला रोजच्या सोन्याच्या दराचा अंदाज लावता येईल. हा दर तुम्ही तुमच्या ज्वेलर्सला सांगू शकता.
सोन्याचा मेकिंग चार्ज किती असतो?
सोन्याची किंमत फायनल झाल्यानंतर येतो त्याचा मेकिंग चार्ज. सोन्याचे दागिने खरेदी केल्यानंतर त्यावर मेकिंग चार्ज आकरला जातो. यामध्ये, ज्वेलर्स प्रति ग्रॅम सोन्यासाठी १० टक्के ते ३० टक्क्यांपर्यंत मार्जिन घेतात, यात मोठे दागिने खरेदी करताना ग्राहकाला ओझे वाटते. तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर लक्षात ठेवा मेकिंग चार्ज निगोशिएबल आहे. तुम्ही ते कमी देखील करू शकता, यासह साध्या डिझाईनच्या वस्तू खरेदी करण्यासाठी कमी खर्च येतो परंतु बारीक आणि खोल डिझायनर सोन्याच्या वस्तूंवर जास्त खर्च येतो.
लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही सोने परत करायला किंवा विकायला जाता तेव्हा तुम्हाला हा मेकिंग चार्ज परत मिळत नाही तर फक्त सोन्याची किंमत मिळते.