Good Friday 2025 : गुड फ्रायडे हा दिवस ख्रिस्ती धर्मातील एक धार्मिक दिवस म्हणून ओळखला जातो. तसंच या दिवसाकडे एक शोक दिवस म्हणून पाहिलं जातं. कारण हा दिवस येशू ख्रिस्ताचा बलिदान दिवस म्हणून ओळखला जातो. यावर्षी म्हणजेच २०२५ मध्ये हा शुक्रवार अर्थात गुड फ्रायडे १८ एप्रिल रोजी येतो आहे. काय घडलं जाणून घेऊ.

प्रत्येक वर्षी तारीख का बदलते?

रॉयल म्युझियमग्रीनविच वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार गुड फ्रायडे दरवर्षी शुक्रवारीच साजरा केला जातो. वसंत ऋतूतीतल पौर्णिमेनंतरच्या शुक्रवारी गुड फ्रायडे येतो. त्यामुळे दरवर्षी या दिवसाच्या तारखेत फरक असतो. दरवर्षी ईस्टरच्या तीन दिवस आधीच्या शुक्रवारी गुड फ्रायडे साजरा केला जातो. हा शुक्रवार आज आहे.

येशू ख्रिस्तांचं स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो

येशू ख्रिस्ताची कथा त्याग आणि क्षमा या आदर्शांवर केंद्रित आहे. येशूला इसवी सन ३० च्या दशकात याच दिवशी अटक करण्यात आली, खटला चालवण्यात आला आणि क्रूसावर चढवून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्यामुळे आजचा शुक्रवार हा येशूच्या स्मरणात व्यतित केला जातो. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त दिलं आहे.

गुड फ्रायडेच्या प्रमुख परंपरा काय आहेत?

१) गुड फ्रायडेच्या दिवशी ख्रिस्ती बांधव काळच्या रंगाची वस्त्रं परिधान करतात. ही वस्त्रं धारण करणं शोक, नम्रता आणि आत्मचिंतन यांचं प्रतीक म्हणून परिधान केली जातात.

२) दुपारी १२ ते ३ या वेळेत विशेष प्रार्थना केल्या जातात. येशू ख्रिस्तांना तीन तास छळ करुन क्रूसावर चढवण्यात आलं होतं.

३) यानंतर क्रूसाच्या प्रतीकाचं चुंबन घेऊन येशू ख्रिस्तांना आदरांजली वाहिली जाते आणि त्यांची आठवण करुन त्यांचा सन्मान केला जातो.

४) या दिवशी ख्रिस्ती बांधव घरातली सजावट हटवतात. घरातलं वातावरण हे शांत आणि निश्चल ठेवण्यासाठी प्रयत्नशील असतात.

५) या दिवशी कॉफिन ज्या ठिकाणी दफन केले आहेत त्या जागेची स्वच्छताही केली जाते.

ईस्टर संडेची तयारी कशी केली जाते?

गुड फ्रायडेनंतर येणाऱ्या रविवारला ईस्टर संडे असं म्हटलं जातं. बायबलचं पठण केलं जातं येशू ख्रिस्तांचं स्मरण केलं जातं.

ईस्टर संडेला पांढरे कपडे परिधान केले जातात. पांढरा रंग शांततेचं प्रतीक आहे.

ईस्टरच्या दिवशी इस्टर एग हंट हा खेळही खेळला जातो, लहान मुलं यात त्यांचा सहभाग नोंदवतात.