केंद्र सरकारच्या नियमांनुसार कर्मचारी आणि काही परिस्थितीत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना निवृत्ती वेतनाचा लाभ देण्यात येतो. कुटुंब निवृत्ती वेतन योजना १९७१ नुसार सेवा काळ सुरु असताना एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबीयांना निवृत्ती वेतनाची रक्कम देण्याच येते. यापूर्वी ७ व्या वेतन आयोगाच्या नियमांनुसार अशा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना निवृत्ती वेतन देण्यात आलं होतं ज्यांचा सेवा सुरू असताना मृत्यू झाला आहे आणि त्यांनी केंद्रीय सेवेत सात वर्षांचा कालावधीही पूर्ण केला आहे. परंतु कुटुंब निवृत्ती वेतन योजना १९७१ च्या ५४ व्या बदलानुसार केंद्र सरकारच्या ज्या कर्मचाऱ्यांची सात वर्षे सेवा पूर्ण झाली नाही आणि सेवेदरम्यान त्यांचा मृत्यू झाला अशा कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारनं या नियमात बदल केले.
बदलण्यात आलेल्या नियमांनुसार जे कर्माचारी सेवेत होते आणि सेवेची सात वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला त्यांना १० वर्षांच्या अखेरीस मिळणाऱ्या वेतनाच्या ५० टक्के रक्कम कुटुंबीयांना निवृत्ती वेतन म्हणून देण्यात येणार आहे. यापूर्वी ज्या कर्मचाऱ्यांनी आपली सात वर्षे सेवा दिली असेल आणि सेवा सुरू असतानाच ज्यांचा मृत्यू झाला असेल त्यांच्या कुटुंबीयांना संबंधित कर्मचाऱ्याच्या अखेरच्या वेतनाच्या ५० टक्के असलेली रक्कम कुटुंबीयांना निवृत्ती वेतन म्हणून देण्यात येत होती. तर ज्यांची सेवा सात वर्षांपेक्षा कमी होती त्यांच्या कुटुंबीयांना ३० टक्केच निवृत्ती वेतन देण्यात येत होतं.
कुटुंब निवृत्ती वेतन योजनानेनुसार निवृत्ती वेतनाची रक्कम मृत कर्मचाऱ्याच्या पत्नी अथवा पतीलाच देण्यात येते. परंतु केंद्रीय कर्मचाऱ्याच्या मृत्यूवेळी त्यांच्या मुलाचं अथवा मुलीचं वय २५ वर्षांपेक्षा कमी असेल तरीही त्यांना निवृत्ती वेतनाची रक्कम देण्यात येते. तसंच त्यांचा विवाह होईपर्यंत किंवा त्यांचं वेतन ९ हजार रुपयांपेक्षा अधिक होईपर्यंत ही रक्कम देण्यात येते.