लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. हा सोहळा भव्यदिव्य व्हावा असे अनेकांना वाटते. पण एका व्यक्तीने लग्न करण्याचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. आजवर आपण नख वाढवण्याचे, दाढी वाढवण्याचे, वजन वाढवण्याचे रेकॉर्ड ऐकले असतील, पण एका व्यक्तीने १०० हून अधिक महिलांसोबत लग्न करण्याचा रेकॉर्ड केला आहे. या रेकॉर्डमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. यामुळे या व्यक्तीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
या व्यक्तीने १०० हून अधिक महिलांना आपला जोडीदार बनवले आहे. वयाच्या ३२ व्या वर्षांपासून तो व्यक्ती लग्न करत सुटला होता. त्याने या महिलांशी १९४९ ते १९८१ दरम्यान लग्न केले आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीने इतके लग्न करून कोणाला घटस्फोट दिला नाही. त्यामुळे सर्वाधिक लग्न करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने त्याचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. १०० हून अधिक महिलांशी विवाह करणाऱ्या व्यक्तीचे नाव जियोविन्नी विग्लिओटो असे आहे. पण हे त्याचे खरे नाव नसल्याचे सांगितले जात आहे. पण त्याने आपल्या शेवटच्या पत्नीशी लग्नाच्या वेळी हेच नाव वापरले होते.
वयाच्या ५३ व्या वर्षी या व्यक्तीच्या १०० हून अधिक लग्नाची गोष्ट समोर आली आहे. या व्यक्तीचा जन्म ३ एप्रिल १९२९ रोजी इटलीतील सिसिली येथे झाला. त्यावेळी त्याने आपले नाव निकोलाई पेरुस्कोव्ह असे सांगितले. पण नंतर एका फिर्यादीने असा दावा केला की, त्याचे खरे नाव फ्रेड झिप आहे आणि त्याचा जन्म ३ एप्रिल १९३९ रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला होता.
जियोविन्नी विग्लिओटो या व्यक्तीने १९४९ ते १९८१ या काळात १०४ ते १०५ महिलांशी लग्न केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यापैकी एकही महिला एकमेकांना ओळखत नव्हती. एवढेच नाही त्या महिलांना विग्लिओटोबद्लही फारशी माहिती नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, या व्यक्तीने १४ देश आणि अमेरिकेच्या २७ वेगवेगळ्या राज्यांमध्ये विविध महिलांशी लग्न केले. तो या महिलांना बनावट ओळखपत्र देऊन फसवायचा.
विग्लिओटो या महिलांना चोर बाजारात भेटायता. पहिल्याच भेटीत तो या महिलांना लग्नासाठी प्रपोज करायचा. नंतर तो त्यांच्याकडील पैसे आणि मौल्यवान वस्तू घेऊन पळून जायचा. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या वेबसाइटनुसार, विग्लिओटो अनेकदा महिलांना सांगत असे की, त्याचे घर खूप दूर आहे, त्यामुळे त्यांनी सर्व सामान त्याच्याकडे आणावे. यानंतर तो महिलांच्या घरातील सामानाने भरलेला ट्रक घेऊन फरार व्हायचा. यानंतर तो सापडायचा नाही. तो ते सामान नंतर चोरबाजारात विकायचा आणि दुसऱ्या महिलेला जाळ्यात फसवण्यासाठी निघायचा. त्याच्याविरोधात अनेक तक्रारी आल्या मात्र तरीही तो फरारच असायचा.
पण शेवटचा बळी ठरलेल्या महिलेने त्याला फ्लोरिडामध्ये पकडले. शेरॉन क्लार्क नावाची ही महिला इंडियाना येथील चोर मार्केटमध्ये काम करायची. २८ डिसेंबर १९८१ रोजी विग्लिओटो पकडला गेला. यानंतर जानेवारी १९८३ मध्ये त्याच्याविरोधात खटला सुरू झाला, ज्यामध्ये त्याला ३४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. याशिवाय ३३६,००० डॉलरचा दंडही ठोठावण्यात आला आहे. आयुष्यातील शेवटची ८ वर्षे त्याने अॅरिझोना येथील तुरुंगात घालवली. १९९१ मध्ये वयाच्या ६१ व्या वर्षी त्याचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले.