भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. आषाढ महिन्याची सुरुवात या दिवसाने होते. भारतीय संस्कृतीत आई-वडिलांनंतर गुरुला विशेष स्थान देण्यात आले आहे. गुरुकडून आपल्याला मिळणाऱ्या विद्येबद्दल गुरुची पूजा करणे, त्यांच्यासमोर नतमस्तक होणे या दिवशी अभिप्रेत असते. या काळात जास्त थंडी आणि उकाडा दोन्ही नसल्याने पूर्वीच्या काळी हा कालावधी गुरुकडून ज्ञान घेण्यासाठी चांगला मानला जात असे. गुरुपौर्णिमेनेच आषाढ महिन्याची सुरुवात होते. सामान्यपणे गुरुपौर्णिमा ही जून ते जुलैच्या कालावधीमध्ये येत. हिंदू कालगणनेनुसार यंदा गुरुपौर्णिमा २४ जुलै रोजी साजरी केली जाणार आहे.

…म्हणून गुरुपौर्णिमा शनिवारी साजरी होणार

यंदाच्या वर्षी गुरुपौर्णिमा २३ तारखेला आहे की २४ याबद्दल अनेकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. मात्र हिंदू पंचांगानुसार, आषाढ महिन्याची पोर्णिमा २३ जुलै (शनिवारी) सकाळी १० वाजून ४३ मिनिटांनी सुरु होणार आहे. तर पौर्णिमेची समाप्ती ही २४ जुलै रोजी सकाळी आठ वाजून ६ मिनिटांनी होणार आहे. उदया तिथीमध्ये पौर्णिमा साजरी केली जाणार असल्याने गुरुपौर्णिमा ही २४ जुलै रोजी साजरी करावी असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळेच गुरुपौर्णिमा यंदा शनिवारी म्हणजेच २४ जुलै रोजी साजरी केली जाईल.

चांगला योग…

यंदाच्या गुरुपौर्णिमेला सर्वाथ सिद्धी आणि प्रीति योग जुळून आला आहे. २४ जुलै रोजी सकाळी ६ वाजून १२ मिनिटांनी प्रीति योग सुरु होईल. हा योग २५ जुलै रोजी पहाटे तीन वाजून १६ मिनिटांपर्यंत असेल. तर सर्वार्थ सिद्धी योग हा २४ जुलै रोजी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांपासून २५ जुलैला पहाटे पाच वाजून ३९ मिनिटांपर्यंत असेल. हे दोन्ही योग शुभ कार्यांंच्या सिद्धीसाठी उत्तम मानले जातात.

चंद्रोदय कधी?

आषाढ पौर्णिमेच्या दिवशी चंद्रोदय सायंकाळी सात वाजून ५१ मिनिटांनी होणार आहे.

राहूकाळ कधी?

राहूकाळ हा आषाढ पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ९ वाजून ३ मिनिटांपासून १० वाजून ४५ मिनिटांपर्यंत असेल. राहूकाळामध्ये शुभकार्याला सुरुवात करु नये असं म्हटलं जातं.

…म्हणून व्यासपौर्णिमा नावानेही ओळखली जाते

व्यासांच्या कार्याचं स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. व्यास ऋषी हे संस्कृतचे महान अभ्यासक आणि विद्वान व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी चारही वेदांची रचना केली आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमा ही व्यासपौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. गुरुने आपल्याला ज्ञान दिले नाही तर आपण काहीही करु शकत नाही अशी धारण पूर्वीच्या काळी होती. त्यामुळे समाजात गुरुंना विशेष स्थान होते. आताही देशभरात ही पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

Story img Loader