देशभरात यंदा २४ जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या दिवसाला व्यास पौर्णिमा म्हणून देखील ओळखलं जातं. भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमेच्या या दिवसाला मोठं महत्त्व आहे. आपल्याकडे आई वडिलांनंतर मोठ्या मानाचं आणि आदराचं स्थान हे स्थान आपल्या गुरूला देण्याची शिकवण आहे. गुरूने आपल्याला दिलेल्या ज्ञान आणि विद्येप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्यापुढे नतमस्तक होण्याचा हा खास दिवस! म्हणूनच आपल्याकडे देशातील विविध भागांत मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो.
महर्षी वेद व्यास हे संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी हिंदू धर्मातील एकूण सर्व १८ पुराणांची आणि चारही वेदांची रचना केली आहे. महर्षी वेद व्यास यांच्या याच योगदानाचं स्मरण करण्यासाठी गुरुची उपासना करून हा दिवस साजरा करण्याची परंपरा सुरु झाल्याचं म्हटलं जातं. म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असंही म्हणतात. दरम्यान, विशेषतः शिक्षण आणि कला या क्षेत्रांत गुरुपौर्णिमेचा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
गुरुपौर्णिमेच्या या दिवशी शाळा-महाविद्यालयांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण असतं. या दिवशी आपल्या शिक्षकांना एक दिवस विश्रांती देऊन काही विद्यार्थीच शिक्षक बनतात. विद्यार्थ्यांसाठी आपल्या शिक्षकांच्या कामाप्रती आदर व्यक्त करण्याची ती एक संधी असते. यावेळी विद्यार्थी आपल्या आवडत्या शिक्षकांना गुलाब आणि एखादी भेटवस्तू देखील देतात.
यंदाची गुरुपौर्णिमा नेमकी कधी ?
हिंदू पंचांगानुसार, यंदाची गुरुपौर्णिमा २३ जुलै म्हणजेच शुक्रवारी सकाळी १० वाजून ४३ मिनिटांनी सुरु होईल आणि २४ जुलै रोजी शनिवारी सकाळी ८ वाजून ६ मिनिटांनी समाप्त होईल.
गुरुपौर्णिमेचा चंद्रोदय
यंदाच्या गुरुपौर्णिमेचा चंद्रोदयाची वेळ २४ जुलै रोजी संध्या ७ वाजून ५१ मिनिटांनी आहे.
खरंतर आयुष्यातील वेगवेगळ्या वळणांवर आपल्याला भेटणाऱ्या व्यक्ती आपल्याला निश्चित काही ना काहीतरी शिकवून जातात. त्या अनुभवांसोबतच आपण घडत जातो, चांगल्या बदलांचा स्वीकार करत, चांगल्या-वाईटाला पारखायला शिकतो, शिकत पुढे जात राहतो. त्यामुळे आपल्या आयुष्यात येणारा हाच प्रत्येक व्यक्ती नकळत एक प्रकारे आपला गुरु ठरतो!