भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत; जी अचंबित करणारी आहेत. भारतातील अशा अनेक आश्चर्यकारक आणि वास्तवात सत्य असणाऱ्या रहस्यमयी कथा तुम्ही अनेकदा ऐकल्या किंवा वाचल्या असतील. आज आपण अशाच एका रहस्यमयी मंदिराविषयी जाणून घेणार आहोत.
कर्नाटकातील हसन जिल्ह्यात असलेलं हे हसनंबा मंदिर. हे मंदिर अतिशय रहस्यमय असल्याचे मानले जाते. विशेष म्हणजे हे मंदिर वर्षातून एका आठवड्यासाठी उघडले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टाइम्स ऑफ इंडियानी दिलेल्या एका वृत्तानुसार, हसनंबा मंदिर हे वर्षातून एका आठवड्यासाठी म्हणजेच सात दिवसांसाठी दिवाळीत उघडले जाते. या मंदिरात हसनंबा देवीची पूजा केली जाते. या मंदिराला भेट देण्याची एक विशिष्ट वेळ आहे. हे मंदिर सकाळी ७ ते १० आणि दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत सुरू असते. इतिहासाच्या नोंदीप्रमाणे हे मंदिर १२ व्या शतकात बांधले गेले आहे; पण कोणी आणि कसे हे मंदिर बांधले, आजवर याविषयी माहिती समोर आलेली नाही.

हे मंदिर वर्षातून एका आठवड्यासाठी उघडत असल्यामुळे या एका आठवड्यादरम्यान मंदिराला भेट देण्यासाठी भाविक गर्दी करतात. या दरम्यान हसनंबा देवीचे दर्शन घेता आले तर भाविक स्वत:ला भाग्यवान समजतात.

स्थानिकांची श्रद्धा

या मंदिराचे दरवाजे वर्षभर बंद असतात. मंदिर बंद करण्यापूर्वी हसनंबा देवीला फुले अर्पण केली जातात, नैवेद्य दाखवला जातो आणि देवीसमोर दिवा लावला जातो. असं म्हणतात की, जेव्हा एका वर्षानंतर मंदिराचे दरवाजे उघडतात, तेव्हा ती फुले एक वर्षानंतरही ताजी दिसतात, नैवेद्यसुद्धा ताजा असतो आणि दिवासुद्धा पेटत असतो; अशी स्थानिकांची श्रद्धा आहे.

हसनंबा मंदिरावरून पुढे हसन गावाचे नाव हसनंबा झाले. या मंदिराविषयी आजही अनेक लोकांना कुतूहल वाटते. या रहस्यमय मंदिरावर अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या मंदिराला बघण्यासाठी दिवाळीत लोकं खूप गर्दी करतात.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hasanamba temple in karnataka opens once a week in a year do you know unique temple diya burn for the entire year ndj