– धिरेंद्र मह्यावंशी

सध्या करोनाव्हायरस (कोविड 19) रोगाने जगाला आश्चर्यचकित केले आहे अस म्हणण वावगं ठरणार नाही. १ जानेवारी २०२० रोजी कोणीही असा विचार केला नसेल की अवघ्या तीन महिन्यांतच जगाला एवढ्या मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. ह्या विषाणूने बर्याच लोकांचा जीव घेतला आहे आणि जगाला अस्थिर केले आहे. परंतु रोगाचा सामना करण्यासाठी वैद्यकीय स्त्रोतांच्या अभावामुळे त्याचा परिणाम वाढला आहे. त्यामध्ये सरकारला लोकांच्या आरोग्य सेवेला प्राधान्य देणं गरजेचं आहे, आणि अशा घटनांचा परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.

कठीण समयीचा मित्र –
व्यक्तिगतरित्या विचार केला तर आरोग्याशी संबंधित अडचणींचा परिणाम कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करणे. आरोग्याशी संबंधित मुद्द्यांचा एखाद्या व्यक्तीवर वेगवेगळ्या तर्हेने परिणाम होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खच्चीकरण तर होतेच, तथापि वैद्यकीय उपचार, रुग्णालयात भरती आणि औषधांचा खर्च ह्या सगळ्या गोष्टींचा एखाद्या व्यक्तीवर आणि त्याच्या कुटुंबावर आर्थिकदृष्ट्याही मोठा परिणाम होऊ शकतो . आरोग्य विमा पॉलिसी ह्या सर्वातून बचाव करू शकते.

मूलभूत आरोग्य विमा पॉलिसीमध्ये सामान्यतः एखाद्या विशिष्ट आजाराशी संबंधित वैद्यकीय आणि इस्पितळात होणारा खर्च भागविला जातो. याव्यतिरिक्त विमाकंपन्या मूलभूत विम्यामध्ये एकापेक्षा जास्त रायडर देखील देतात ज्यामध्ये गंभीर आजारांशी संबंधित खर्च आणि इतर अतिरिक्त खर्च इत्यादी गोष्टींचा समावेश असतो.

आरोग्य विमा पॉलिसी करोनाव्हायरसपासून आपले रक्षण करू शकते –

करोनाव्हायरस हा व्हायरसचा एक प्रकार आहे ज्यामुळे मानवांमध्ये फ्लू सदृश्य आजार होतो. करोनाव्हायरसची लक्षणे इतर फ्लूसारखीच, खोकला, सर्दी आणि ताप, श्वास घेण्यास त्रास होणे ह्यापैकी आहेत. दुर्दैवाने या रोगास सध्या लस किंवा औषध नाही. हीच गोष्ट ह्या रोगाला विशेषतः धोकादायक बनवते. म्हणूनच आपण आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना विषाणूचा धोका नाही हे सुनिश्चित करण्यासाठी आपण अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. यापैकी काही उपायांमध्ये मास्क घालणे, आपले हात पूर्णतः स्वछ धुणे आणि वारंवार अल्कोहोल असलेला सॅनिटायझर वापरणे समाविष्ट आहे. हे सर्व असले तरी ह्या आजाराचा धोका सर्वांनाच आहे. अश्या वेळीस आपणास आरोग्य विमा पॉलिसी मदत करू शकते.

तज्ञांच्या मते, जर आरोग्य विमा पॉलिसी असलेल्या एखाद्या व्यक्तीस रोगाचा संसर्ग झाल्यास या आजारावर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा समावेश पॉलिसीमध्ये केला जाईल, तथापि एखाद्या व्यक्तीने रोगाचा संसर्ग झाल्यानंतर पॉलिसीची निवड केली तर त्याला किंवा तिला उपचारासाठी कव्हरेज मिळत नाही. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीए) 29 इन्शुरर्सची नावे मंजूर केली आहेत ज्यांना नुकसान भरपाईचे आरोग्य विमा उत्पादन विकण्याची परवानगी असेल, जे कोविड 19 च्या उपचारासाठी हॉस्पिटलायझेशनच्या खर्चाची भरपाई करेल. नुकसान भरपाईचा आरोग्य विमा 1 लाख आणि 5 लाख रुपयांचे संरक्षण देईल. नियामकाने असेही स्पष्ट केले की भारतातील सध्याच्या सर्व मेडिक्लेम पॉलिसींमध्ये कोविड 19 हॉस्पिटलायझेशनचा समावेश असेल. अश्या कठीण परिस्थितीत ही एक दिलासादायक गोष्ट आहे.

(लेखक सह-संस्थापक, टर्टलमिंट आहेत.)