रस्त्यावर दुचाकी चालवताना उत्तम दर्जाचं हेल्मेट घालणं अत्यंत गरजेचं आहे. एक चांगलं हेल्मेट नेहमीच अपघातामुळे होणाऱ्या नुकसानापासून आपला बचाव करतं. अनेकदा तर मोठ्या अपघातातही फक्त हेल्मेटमुळे कित्येक दुचाकीस्वारांचा जीव वाचला आहे. पण अनेकदा थोडे पैसे वाचवण्याच्या नादात लोक रस्त्यावर कुठेही स्वस्तात हेल्मेट खरेदी करतात. पण आता असं होणार नाही, कारण रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आयएसआय मार्क नसलेल्या हेल्मेटच्या उत्पादन, आयात, विक्री आणि साठवणुकीला बंदी घातली आहे.
या नियमांतर्गत दुचाकी चालवताना आयएसआय मार्क असणारं हेल्मेट न वापरणाऱ्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो तसंच दंडही ठोठावला जाऊ शकतो. यामुळे तुम्ही हेल्मेट घातलेलं असलं तरीही तुम्हाला शिक्षा आणि दंड अशा कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. मंत्रालयाने १ जूनपासून हा नियम लागू केला आहे. जाणून घेऊयात याबद्दल…
कायदेशीर कारवाई होऊ शकते
केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार, जर कोणी आयएसआय मार्क नसलेलं हेल्मेट विकत असेल किंवा खरेदी करत असेल तर दोघांवरही कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. यामुळे आता दुचाकी चालकांना आयएसआय मार्क असणारं हेल्मेट घालणं अनिवार्य आहे. हे हेल्मेट BIS (ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड) गुणवत्ता मार्गदर्शकानुसार असणं गरजेचं आहे.
गेल्या वर्षी अधिसूचना प्रसिद्ध
१ नोव्हेंबर २०१८ मध्येही असाच निर्णय जारी केला होता. दरम्यान रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून २६ नोव्हेंबर २०२० रोजी यासंबंधी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये स्पष्टपणे सर्व दुचाकींसाठी वापरण्यात येणारे हेम्लेट बीआयएस गुणवत्ता मार्गदर्शकांनुसार असले पाहिजेत तसंच १ जूनपासून त्यांच्यावर आयएसआय मार्क असला पाहिजे असं सांगण्यात आलं आहे.
किती दंड होऊ शकतो
या नव्या नियमांच्या सहाय्याने दुचाकीस्वारांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचा तसंच ती अजून चांगली करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. दरम्यान कायद्याचं आणि नियमांचं पालन न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. जर एखादी व्यक्ती आयएसआय मार्क नसणाऱ्या हेल्मेटचं उत्पादन, विक्री, साठवणूक किंवा आयात करत असेल तर त्याला एक वर्षांपर्यंतची जेल किंवा एक ते पाच लाखांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो.