Highest Priority Trains: प्रवाशांच्या सुविधेसाठी भारतीय रेल्वेने वेगवेगळ्या पल्ल्याच्या व प्रकारच्या ट्रेन सुरू केल्या आहेत. सामान्य माणूस ते चैनीचा प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी भारतीय रेल्वेकडे विविध सुविधा आहेत. अनेकदा रेल्वे प्रवासात एक तक्रार असते ती म्हणजे स्टेशन नसताना किंवा सिग्नल न लागताही ट्रेन अनेकदा अनिश्चित थांबा घेऊ शकते. याचे मुख्य कारण म्हणजे ट्रेनच्या प्रायोरिटी रँकिंगनुसार ट्रेन क्रॉसिंगचे नियम आखण्यात आले आहेत. जेव्हा टॉप प्राधान्य असणाऱ्या ट्रेनला पुढे जाऊ द्यायचे असेल तेव्हा तुमची रेल्वे थांबू शकते. बहुतांश वेळा शताब्दी व राजधानी एक्स्प्रेस या भारतातील प्रीमियम ट्रेन म्हणून ओळखल्या जातात पण तुम्हाला माहीत आहे का, भारतात अशी एक ट्रेन आहे जिच्यासाठी प्रत्येक ट्रेनला थांबावे लागू शकते.
भारतातील टॉप कॅटेगरी ट्रेनमध्ये आतापर्यंत राजधानी, शताब्दी व आता वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचा समावेश आहे. राजधानी ही देशातील सर्वात महत्त्वाची ट्रेन मानली जाते. पण अगदी विशेष परिस्थितीमध्ये रेल्वेतर्फे राजधानीलाही थांबवून या एका ट्रेनला पुढे जाण्यासाठी परवानगी दिली जाते. ही ट्रेन म्हणजे अपघातग्रस्त मदतीसाठीची वैद्यकीय उपकरणांनी सज्ज ट्रेन (ARME). अपघातग्रस्तांना व दुर्घटनाग्रस्तांना मदत करण्यासाठी, त्यांच्यापर्यंत वैद्यकीय मदत पोहोचवण्यासाठी ही ट्रेन धावते. त्यामुळे देशातील सर्व ट्रेनच्या आधी या ट्रेनला प्राधान्य दिले जाते.
याशिवाय देशाच्या राष्ट्रपतींसाठी राखीव असलेल्या ट्रेनला सुद्धा प्राधान्यक्रमात उच्च स्थान आहे. पण सध्या राष्ट्रपतींचा बहुतांश प्रवास हा विमानमार्गे होत असल्याने या ट्रेनचा प्रवास नगण्य असतो.
हे ही वाचा<<भारतीय रेल्वेचं ‘हे’ स्टेशन दोन राज्य जोडतं पण अपघात होताच… इतिहास जाणून व्हाल थक्क
याशिवाय आता आपण भारतीय रेल्वेच्या ट्रेनचे प्राधान्यक्रम पाहिले तर, राजधानीचे नाव सर्वोच्च आहे. ही ट्रेन आपल्या नियोजित वेळेत धावते व हीच तिची सर्वात खास ओळख आहे. यानंतर शताब्दी एक्स्प्रेसचे स्थान आहे. ही सुद्धा भारतातील सर्वात वेगवान ट्रेनपैकी एक आहे. यानंतर दुरांतो एक्स्प्रेस, गरीबरथ एक्स्प्रेस यांनाही प्राधान्य यादीत स्थान आहे.