‘एग्झिट पोल’ मतदारांनी मतदान केल्यानंतर घेतले जातात. एग्झिट पोल म्हणजे निवडणुका संपल्यानंतर मतदान केंद्रांवरून बाहेर येणाऱ्या मतदारांना त्यांच्या मतदानाबद्दल विचारून घेतलेल्या माहितीच्या आधारे वर्तवलेला अंदाज. हा अंदाज मतदारांनी कोणत्या पक्षाला किंवा उमेदवाराला मतदान केले यावर आधारित असतो. मतदानोत्तर चाचण्या अर्थात एग्झिट पोलच्या माध्यमातून निवडणुकीचे अंतिम निकाल काय असतील याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो. ‘एग्झिट पोल’ आणि ‘ओपिनियन पोल’ हे दोन्हीही वेगळे आहेत. ‘ओपिनियन पोल’ मतदानापूर्वी घेतले जातात.
‘एग्झिट पोल’ची सुरुवात कधी झाली याबाबत वेगवेगळी मते आहेत. नेदरलँडमधील समाजशास्त्रज्ञ आणि माजी राजकीय नेते मार्सेल वॉन डॅम यांनी १५ फेब्रुवारी १९६७ साली पहिला ‘एग्झिट पोल’ प्रकाशित केला असे अनेक जण मानतात. तर काही अहवालांनुसार, अमेरिकेचे वॉरेन मिटोफस्की यांनी १९६७ साली सीबीएस न्यूजसाठी पहिला ‘एग्झिट पोल’ तयार केला होता. तसेच, १९४० साली ही एग्झिट पोल तयार करण्याचा प्रयत्न झाला होता, पण तो अयशस्वी ठरला, अशी नोंद सापडते.
एग्झिट पोलची संकल्पना भारतात १९६० च्या दशकात आली. भारताच्या इतिहासातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका याच कालखंडात घेण्यात आल्या होत्या. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियन (आयआयपीओ) द्वारे भारतातील पहिला व्यापक एग्झिट पोल घेण्यात आला. अर्थशास्त्रज्ञ एरिक-डा-कोस्टा यांच्याकडे या पोलचे श्रेय जाते. त्या कालखंडात प्रसार माध्यमांची पोहोच मर्यादित होती, त्यामुळे ही संकल्पना काही पक्षांपुरताच मर्यादित राहिली. परंतु ८०-९० च्या दशकानंतर या पोलला महत्त्व प्राप्त झाले. तर १९९८-९९ च्या निवडणुकांमध्ये याचे प्रस्थ वाढल्याचे चित्र होते. पुढे तर ते निवडणूक विश्लेषणाचा भागच ठरले. या सुरुवातीच्या काही पोलची आकडेवारी संशयास्पद होती.
निकालांचा कल समजण्यास ते उपयुक्त असले तरी नमुने घेतानाचे पूर्वग्रह, भारतातील वैविध्यपूर्ण मतदार/ मतदार संघाची गुंतागुंत, मतदारांच्या वर्तनातील सामाजिक आणि प्रादेशिक तफावत यांसारख्या घटकांनी अचूकता कमी होण्याला हातभारच लावला. २००४ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) विजयाच्या अंदाज बहुतेक एग्झिट पोल वर्तवत असताना, काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीने (युपीए) निर्णायक बहुमत मिळवून राजकीय पंडितांना आश्चर्यचकित केले. या चुकीमुळे या पोलच्या विश्वासार्हतेबद्दल शंका निर्माण झाली होती. याचीच पुनरावृत्ती २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्येही अलीकडेच पाहायला मिळाली. असे असतानाही एकूणच मतदानोत्तर चाचण्यांविषयी लोकांमध्ये असलेली उत्सुकता कायम आहे.