मराठी अभिनेत्री हेमांगी कवीची ‘बाई, बुब्स आणि ब्रा…’ ही फेसबुक पोस्ट सध्या जोरदार व्हायरल झाली आहे. या पोस्टमुळं ती गुगल ट्रेडिंगमध्ये आली आहे. ब्रा वापरण्यासंदर्भात तिनं एक पोस्ट फेसबुकवर लिहिली आहे. यानंतर या विषयावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अभिनेत्री हेमांगी कवीच्या पोस्टमुळे आता सोशल मीडियावर ब्रा या विषयावर बोलू लागले आहेत. तर जाणून घेऊया ब्रा नेमकी बनली कशी आणि काय आहे याचा इतिहास?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ब्रा’ हा शब्द आला कुठून ? ब्रा बनली कशी ? ब्रा घालायची सुरूवात कधीपासून झाली ? असे प्रश्न तुमच्या मनात कधीतरी आलेच असतील. ‘ब्रा’ चा इतिहास फार रंजक आहे. कोणत्याही कपड्यांच्या फॅशनची सुरूवात ही फ्रान्समधूनच होते. ब्रा देखील तिथूनच आल्या आहेत. ‘brassiere’ या फ्रेंच शब्दाचं शॉर्ट फॉर्म करत ‘ब्रा’ हा शब्द तयार झाला आहे. ‘Brassiere’ शब्दाचा अर्थ शरीरावरील वरचा भाग असा होतो. सगळ्यात आधी ‘ब्रा’ फ्रान्समध्ये तयार करण्यात आली. १८६९ साली फ्रान्सच्या हर्मिनी कॅडोल यांनी सर्वात आधी ही रचना केली होती. कॉर्सेटला दोन तुकड्यांमध्ये तोडून त्यांनी ही ब्रा ची रचना तयार केली होती आणि सगळ्यात आधी या अंतवस्त्राला ‘ब्रा’ म्हटलं गेलं. काही काळानंतर फ्रान्समध्ये ‘ब्रा’ विक्रीसाठी देखील बाजारात येऊ लागले.

सुरवातीच्या काळात महिला त्यांचे स्तन लपवण्यासाठी कॉर्सेट परिधान करत असत. हे कॉर्सेट एका जॅकेटप्रमाणे दिसत असत. युरोपात सुद्धा महिला त्या काळी शरीराला आकर्षक बनवण्यासोबतच स्तनांना आधार देण्यासाठी लोखंडी कॉर्सेट्स मोठ्या प्रमाणात वापरत होते. पण दुसऱ्या महायुद्धानंतर धातूंचा तुटवटा निर्माण झाला आणि लोखंडी कॉर्सेट्स वापरणं बंद झालं. या लोखंडी कॉर्सेट्सच्या ऐवजी नंतर वेगवेगळ्या कपड्यांमधले कॉर्सेट्स येऊ लागले. अगदी राजघराण्यातल्या आणि श्रीमंत महिला हे कापडी कॉर्सेट्स फॅशन म्हणून सुद्धा वापरत होत्या. पण हे कॉर्सेट मागच्या बाजुने अगदी घट्ट आवळून बांधले जात होते. त्यामूळे ते आरोग्याला हानिकारक असल्याचं त्यावेळी डॉक्टरांनी सांगितलं होतं.

भारताचा विचार केला तर सम्राट हर्षवर्धनच्या काळात स्त्रिया देखील ब्रा सारखे वस्त्र परिधान करत असल्याचे पुरावे अढळून येतात. या वस्त्राच्या वापराने स्त्रियांचे स्तन झाकले जात होते आणि सोबतच शरीर देखील सुडौल दिसून येत होते.

सध्याच्या काळात अनेक महिला पुश-अप ब्रा वापरतात. ही पुश-अप ब्रा संकल्पना १९ व्या शतकाच्या सुरवातीला उदयास आली होती. लंडनच्या विज्ञान संग्रहालयात ठेवण्यात आलेली पुश-अप ब्रा ही त्याचा पुरावा आहे.
जस जशी मानवी संस्कृती बदलली तस तसं ‘ब्रा’ चा इतिहास देखील बदलत गेला. १४ व्या शतकात सुद्धा मोनोयन इतिहासात ‘ब्रा’ या संकल्पनेचं मूळ सापडतं. ग्रीस आणि रोमनच्या इतिहासात देखील ‘ब्रा’ सारखे दिसणाऱ्या वस्त्रांचा उल्लेख आहे. रोमन काळातल्या महिला या त्यांचे स्तन लपवण्यासाठी छातीभोवती एक कपडा बांधत असत. तर ग्रीक इतिहासात महिला स्तनांखाली एक पट्टा बांधून स्तनांना उभारी देत असत.

१९०७ मध्ये अमेरिकेतून ब्रा ला खरी प्रसिद्धी मिळाली. तेव्हापासून अमेरिका आणि इतर देशातील महिलांमध्ये ‘ब्रा’ वापरण्याची सुरवात झाली. अमेरिकेतील प्रसिद्ध फॅशन मॅगजिन ‘वोग’नं ‘ब्रा’ घातलेल्या एका युवतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यावरून ‘brassiere’ शब्द लोकप्रिय ठरला.

पण या जाहिरातीवरून १९७० मध्ये अमेरिकेत ब्रा ला विरोध सुरू झाला. महिलांनी अक्षरशः ब्रा रस्त्यावर पेटवून दिल्या होत्या. महिला सुंदर दिसाव्यात म्हणून ब्रा वापरली जाते आणि महिलांकडे एक वस्तू म्हणून पाहण्याचा दृष्टीकोण तयार होतो, असा अक्षेप घेत हा विरोध करण्यात आला.

2016 मध्ये पुन्हा एकदा ब्रा विरोधी मेहिमेनं सोशल मीडियावर जोर धरला. 17 वर्षांच्या कॅटलीन जुविक टॉपच्या आत ब्रा न घालता शाळेत गेली आणि शाळेच्या उपमुख्यध्यापकानं तिला बोलावून ब्रा न घालण्याचं कारण विचारलं. कॅटलीननं या घटनेचा उल्लेख तिच्या स्नॅपचॅटवर केला आणि तिला अनेकांचं समर्थन मिळालं. अशा प्रकारे ‘No Bra, No Problem’ या मोहिमेची सुरुवात झाली.

त्यानंतर आता मराठी अभिनेत्री हेमांगी कवीच्या पोस्टमुळे ब्रा हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: History of bra when wearing bra is started prp
Show comments