Holi traditions in India: वाईटावर विजय मिळवल्याच्या आनंदात होळी हा सण साजरा केला जातो. भारतासह जगभरात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे फाल्गुन महिन्याच्या पोर्णिमेला रात्री होलिका दहन केले जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रंग खेळले जातात. पुढे पाच दिवसांनी रंगपंचमी असते. होळीचा सण हिवाळा संपून उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे हे दर्शवतो. या सणाला भारतामध्ये फार महत्त्व आहे. देशातील प्रत्येक भागात होळीचा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

होलिका दहन

फाल्गुन शुक्ल पौर्णिमेच्या रात्री होलिका दहन करण्याची परंपरा आहे. काही राज्यांमध्ये याला छोटी होळी असे म्हटले जाते. प्रल्हादला मारण्यासाठी हिरण्यकश्यपने त्याच्या बहिणीची मदत घेतली. पण या प्रयत्नांमध्ये होलिकेचा अंत झाला. होलिका दहनासाठी लाकूड, गवत आणि शेणाची पोळी यांची एक मोठी मोळी उभी केली जाते, त्याभोवती सजावट करुन तिची पूजा केली जाते. त्यानंतर तिला अग्नी दिला जातो. सोबतच होलिका दहनासाठी तयार केलेले पदार्थ अग्नीत समर्पित केले जातात.

लठमार

मथुरेतील ब्रज प्रदेशामध्ये होळी आठवडभर असते. येथील लठमार होळीची परंपरा फार प्रसिद्ध आहे. बरसाना या गावामध्ये हा खेळ होळीच्या दिवशी खेळला जात असे. हे राधेचे गाव होते असे म्हटले जाते. लठमार होळीमध्ये स्त्रिया हातात काठ्या घेऊन पुरुषांना मारण्याचा प्रयत्न करत असतात. येणारा प्रहार रोखण्यासाठी पुरुषांना ढाल दिलेली असते. ही होळी पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक मथुरेला जमतात.

दोल जत्रा

पश्चिम बंगाल, ओडिसा अशा काही राज्यांमध्ये होळीच्या दिवशी दोल जत्रा/ डोल जात्रा असते. या निमित्ताने कृष्णाची आराधना केली जाते. कृष्ण-राधा यांच्या मूर्ती झोपाळ्यावर प्रस्थापित केल्या जातात. पूजा सुरु असताना झोपाळा झुलवला जातो. त्यानंतर भक्तगण मिळून रंग खेळतात.

आणखी वाचा – विश्लेषण : होळीच्या नानाविध उत्पत्तीकथा आणि भारताची सांस्कृतिक विविधता

होळी-योशांग

मणिपूर राज्यात होळी आणि योशांग हे उत्सव एकत्रितपणे साजरा केले जातात. सहा दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सामूहिक गायन-नृत्य करत नागरिक हा सण साजरा करतात.

भस्म होळी

वाराणसीमध्ये भस्म होळी खेळण्याची मोठी प्रथा आहे. नागा साधू, अघोरी आणि अन्य साधू मंडळी ही अनोखी होळी खेळतात. अंत्यसंस्कार झाल्यानंतर जमा झालेल्या राखेने होळी खेळण्याची अघोरी संप्रदायमध्ये परंपरा आहे. ही होळी प्रामुख्याने स्मशानभूमीमध्ये साजरी केली जाते.

आणखी वाचा – Holi 2023 : ६ मार्चला केवळ २ तास असणार होळी दहनाचा शुभ मुहूर्त; जाणून घ्या योग्य तिथी आणि पूजाविधी

फुलों वाली होळी

वृंदावनमध्ये होळीच्या आदल्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी राधा-कृष्णाच्या मूर्तींवर फुलांचा वर्षाव केला जातो आणि त्यांची पूजा-अर्चना केली जाते. यंदाच्या वर्षी ३ मार्च रोजी वृंदावनातील बांकेबिहारी मंदिरामध्ये फुलों वाली होळी खेळली गेली.

महाराष्ट्रामधील कोकण, विदर्भ अशा प्रत्येक विभागामध्ये होळीचा उत्सव साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी असल्याचे पाहायला मिळते.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Holi 2023 lathmar bhasma holi to dol jatra this is how holi is celebrated in different parts of india yps
Show comments