आपल्या आजूबाजूला शेकडो वर्षे जगलेली असंख्य झाडे असतात. ग्रामीण भागात मंदिरांशेजारी किंवा वनराईत अनेक जुनी झाडे सापडतात. त्या प्रत्येक झाडांचा एक इतिहासही असतो. अनेक पौराणिक, ऐतिहासिक घटनांचे ते साक्षीदार असतात. त्यामुळे पुरातत्व खात्याकडूनही या झाडांची देखभाल केली जाते. पण, ही झाडे हजारो वर्षे कशी जगतात? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? वृक्ष सजीव असतात आणि कोणताच सजीव हजारो वर्षे जगत नाही. परंतु, काही वृक्ष त्याला अपवाद असतात. त्यामुळे ही झाडे वर्षानुवर्षे कशी जगतात याबाबत जागतिक आणि देशाच्या संशोधातून काय समोर आलंय हे पाहुयात.
पश्चिम अमेरिकेत ब्रिस्टलकोन पाईन्स हे सर्वात जुन्या झाडांचा संच आहे. यामध्ये काही वृक्ष तीन हजार वर्षांहून अधिक जुने आहेत. २०१२ मध्ये सापडलेल्या एका वृक्षाचं वय ५ हजार वर्षांहून अधिक असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे ते जगातील सर्वात जुने ज्ञात नॉन-क्लोनल वृक्ष बनले आहे! तसंच, जगभरात अशी अनेक वृक्षे आहेत जी हजारो वर्षे जगली आहेत.
झाडे हजारो वर्षे कशी जगतात याचं ठराविक असं वैज्ञानिक कारण नसल्याचं मेलिसा पेट्रुझेलो यांनी ब्रिटानिका या संकेतस्थळावरील एका लेखामध्ये लिहिलं आहे. शतकानुशतके अनेक वृक्षांनी अनेक नैसर्गिक आणि कृत्रिम आपत्ती सहन केलेल्या असतात. प्राणघातक रोगांचा प्रादुर्भाव, आग, दुष्काळ, वादळ, भूस्खलन, वणवा आदी समस्यांतूनही ही वृक्षे तग धरून राहतात.
हेही वाचा >> ख्रिसमसच्या दिवशी मिस्टलेटो झाडाखाली लोक Kiss का करतात? त्यामागे आहे रंजक गोष्ट; जाणून घ्या विविध परंपरा
सर्वच प्राचीन वृक्षांना अमर म्हणावं का यावर अनेक वाद आहेत. कारण, ही प्राचीन वृक्षे कृत्रिम आघातांनी म्हणजेच बाहेरच्या शक्तींनी मारली जातील का? याचं उत्तर अद्यापही सापडलेलं नाही. परंतु, ही वृक्षे मानव किंवा इतर प्राण्यांच्या वयापेक्षा भिन्न असतात. कारण मनुष्य आणि प्राण्याचा ठराविक वयोमानानंतर मृत्यू होऊ शकतो. परंतु, वृक्षाला हा नियम लागू नाही. एका अभ्यासात जिन्को झाडाच्या vascular cambiumमध्ये (वृक्षाच्या सालीजवळ आढळणारं उतक) पेशींच्या मृत्यूचे थोडेसे पुरावे आढळून आले आहेत. vascular cambium मुळे अन्न, पाणी आणि वाहून नेण्यासाठी सतत नवीन झाइलम आणि फ्लोम तयार केले जाते. काही प्राचीन झाडांमध्ये कीटक आणि रोगांविरुद्ध उच्च रासायनिक संरक्षण असल्याचंही अभ्यासातून सिद्ध झालं आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे झाड कोलमडले, किंवा वादळवाऱ्यामुळे पाने-फांद्या गळून पडल्या तरी त्या पुन्हा नव्याने येऊ शकतात. खरं तर, जुने झाड ९५ टक्के मृत ऊतक असू शकते. ही झाडे जिवंत नसली तरीही त्यांची झाडे टिकवून ठेवण्याकरता प्रक्रिया करून ठेवावी लागत नाही. म्हणून जुन्या झाडाला जिवंत ठेवण्यासाठी खरोखर काही करण्याची आवश्यकता नसते.
पुरातत्व विषयांत पीएचडी प्राप्त केलेले प्रमोद जोगळेकर यांनी मराठी विश्वकोषमध्येही यासंदर्भात लिहिलं आहे. ते म्हणतात, वृक्षवलय कालमापनाचे तत्त्व प्रामुख्याने वृक्षांच्या वाढीच्या प्रक्रियेवर अवलंबून आहे. झाडांची वाढ होत असताना, विशेषतः समशीतोष्ण प्रदेशातील झाडांच्या खोडात दरवर्षी नवीन थराची भर पडते. झाडाचा बुंधा कापल्यावर आपल्याला हे थर वलयांच्या किंवा वर्तुळांच्या स्वरूपात दिसतात. झाडांची वाढ प्रत्येक वर्षी समप्रमाणात होत नाही. एखाद्या वर्षी किती जाडीचा थर तयार होईल हे त्या झाडाला मिळणारे पोषण, बाहेरील तापमान व हवेतील आर्द्रता अशा अनेक घटकांवर अवलंबून असते. निरनिराळ्या वर्षी, इतकेच नाही, तर निरनिराळ्या ऋतूंमध्ये वाढीच्या प्रमाणात फरक पडत असल्याने खोडांमध्ये वृद्धिवलये तयार होतात.
हेही वाचा >> Congress Grass : शेतात सर्वत्र आढळणाऱ्या काँग्रेस गवताचा ‘काँग्रेस’ पक्षाशी संबंध काय?
खोडाची जाडी वाढत जाताना जेव्हा वाढीचा वेग जास्त असतो, तेव्हा तयार होणाऱ्या लाकडाची घनता कमी असते. याला वैज्ञानिक परिभाषेत स्प्रिंगवुड किंवा पूर्वकाष्ठ (Earlywood – वाढीच्या प्रारंभीचे लाकूड) असे म्हणतात. या वर्तुळाच्या बाहेर तयार होणारे वर्तुळ जास्त घनता असलेल्या लाकडाचे बनते. याला समरवुड किंवा पश्चकाठ (Latewood – वाढीच्या नंतरच्या कालखंडातील लाकूड) असे म्हणतात. अशा प्रकारे कमी-अधिक घनता असणाऱ्या वलयांची एक मालिका तयार होते. ते झाड जिवंत असेपर्यंत म्हणजे ते झाड कापले जाईपर्यंत अथवा नैसर्गिकरीत्या मृत होईपर्यंत अशी वलये तयार होत जातात. साहजिकच जे झाड खूप वयस्कर आहे, त्याच्या बुंध्यात जास्त वलये आढळतात. प्रत्येक वलयाची अथवा वर्तुळाची जाडी वेगवेगळी असल्याने अशी वर्तुळे सहज वेगळी दिसतात. कोणत्या ऋतूमध्ये आणि कोणत्या हवामानात नेमके किती जाड वलय तयार होते, याचे मापन केले जाते. यामधून मांडलेल्या सूत्राचा उपयेाग करून पुरातत्त्वीय अवशेषांमध्ये मिळालेल्या लाकडाच्या प्राचीन नमुन्याचे वय ठरवता येते. असे वय ठरविण्यासाठी झाडांच्या वाढीचा वेग आणि दीर्घकाळ जगणाऱ्या वृक्षप्रजातींचा अतिशय सखोल अभ्यास करून गणिती व संख्याशास्त्रीय पद्धतींचा वापर केला जातो.