चौसष्ठ कलांचा अधिपती आणि आपल्या लाडक्या बाप्पाचा गणेशोत्सव दरवर्षी उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा पाया हा पुण्यातच घातला होता. त्यामुळे येथील गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरतात ते म्हणजे पुण्यातील मानाचे गणपती. दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या गणपतीला पुणेकरांचा लाडका बाप्पा, असे म्हटले जात असले तरी पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचे स्थान आजही कायम आहे. मानाच्या गणपतींमध्ये पहिला मान आहे तो कसबा गणपतीला. अनेकांना असा प्रश्न पडतो की, कसबा गणपतीलाच पुण्यातील मानाचा गणपती का म्हटले जाते? याबाबत इतिहास काय सांगतो ते आपण जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोकसत्ताच्या ‘गोष्ट पुण्याची’या विशेष मालिकेसाठी माहिती देताना कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी कसबा गणपतीलाच पुण्यातील मानाचा गणपती का म्हटले जाते याबाबत खुलासा केला आहे.

हेही वाचा – लाडक्या बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवत आहात? तज्ज्ञांकडून जाणून घ्या मोदकाचे फायदे

कसबा गणपतीचे ऐतिहासिक महत्त्व

गणेशोत्सव हा लोकोत्सव आहे. १४०० वर्षांपूर्वी कसबा गणपतीची प्राणपतिष्ठापना झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ जेव्हा पुण्यात आले तेव्हा त्यांनी कसबा गणपतीची पुन्हा प्राणपतिष्ठापना केली होती आणि दगडी मंडपांचे मंदिर उभारले होते. बाळराजे मोहिमेला जाण्यापूर्वी या कसबा गणपतीचे दर्शन घेत होते. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कर्नाटकातून आठ कुटुंबे शहाजीराजांनी पुण्यात पाठवली होती. त्यापैकी ठकार कुटुंब यांच्याकडे या गणपतीच्या पूजेची जबाबदारी देण्यात आली होती. जेव्हा महाराज या गणपतीचे दर्शन घेत, तेव्हा ते त्यांना नेहमी विजयी भव, असे म्हणत. त्यामुळे या गजाननाला जयति गजाजन, असे नाव मिळाले. इतिपर्यंत जय देणारा जयति आहे. शाळिग्राम कुटुंबातील मोरया गोसावी यांचे वास्तव्य या मंदिरात होते. असा हा देदीप्यमान इतिहास आहे.

कसबा गणपतीला कसे मिळाले मानाच्या पहिला गणपतीचे स्थान?

जेव्हा १२८ वर्षांपूर्वी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली तेव्हा कसबा गणपतीच्या इतिहासातील सुवर्णपर्व सुरू झाले. कसबा गणपती पुण्याचे ग्रामदैवत असल्यामुळे लोकमान्य टिळकांनी या गणपतीला अग्रक्रम दिला आणि कसबा गणपतीला पुण्यातील मानाच्या पहिल्या गणपतीचे स्थान मिळाले. कसबा गणपतीचा उत्सव हा अत्यंत पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो.

हेही वाचा – शिव-पार्वती विवाह सोहळा आता पुण्यात!, तुम्ही पाहिला का ‘हा’ जिवंत देखावा? Video होतोय Viral

कसबा गणपतीची मूर्तीची वैशिष्ट्ये

कसबा गणपतीची मूर्ती ही तांदळा स्वरूपातील मूर्ती आहे. म्हणजे जिला घडवलेले नसते. दर आठवड्यातून दोनदा त्याला शेंदराचे लेपन केले जाते. त्यामुळे अत्यंत स्वयंभू स्वरूपातील ही मूर्ती आहे. या मूर्तीच्या बेंबीमध्ये माणिक आणि डोळ्यांच्या जागी हिरे बसवलेले आहेत. लंबोदरस्वरूप मूर्ती असली तरी ती थोडी मागे कललेली आहे. वीरासनातील या मूर्तीकडे पाहिल्यानंतर मन अत्यंत प्रसन्न होते. आजही कसबा गणपती मंडळाद्वारे शिस्तबद्ध आणि पारंपारिक पद्धतीनेच गणेशोत्सव साजरा केला जातो.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How did kasba ganapati get the position of the first ganapati of mana in pune know what is history snk