भारतीय रेल्वे दररोज सुमारे ३ कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करतात. ही संख्या ऑस्ट्रेलिया देशाच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही अधिक आहे. देशातील अनेक लहान मोठ्या रेल्वे स्थानकातून हे प्रवासी प्रवास करत असतात. इतक्या लोकांना गंतव्यस्थानावर नेण्यासाठी भारतीय रेल्वे चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क चालवते. यासाठी १३ लाखांहून अधिक कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत असतात. भारतीय रेल्वे प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत असते. पण या प्रयत्नांसाठी भारतीय रेल्वेकडे पैसा कुठून येतो, तसेच लाखो कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी रेल्वेचे नियोजन कसे असते आणि रेल्वेच्या उत्पन्नाचे स्त्रोत काय आहेत जाणून घेऊ…
भारतीय रेल्वेला कमाई कशी मिळते?
भारतीय रेल्वेला तिकिटांच्या कमाईतून सर्वाधिक पैसे मिळतात, असे बहुतेकांना वाटते. पण तसे नाही. तिकिटांव्यतिरिक्त रेल्वेकडून इतरही अनेकही सेवा पुरवल्या जातात. यामध्ये मालवाहतूक, प्लॅटफॉर्मवरील जाहिराती, स्टेशनवरील दुकानांचे भाडे यासारख्या स्रोतांचा समावेश आहे. यात तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये ट्रेनचे शूटिंग पाहिले असेल. शूटिंगसाठी जागा देऊनही रेल्वे करोडोंची कमाई करते. रेल्वेला मालवाहतुकीतून सर्वाधिक उत्पन्न मिळते.
रेल्वेला कोणत्या ठिकाणाहून किती पैसे मिळतात?
भारतीय रेल्वेचे उत्पन्नाचे स्रोत तर समजले पण या स्त्रोतातून भारतीय रेल्वेला किती कमाई होते ते जाणून घेऊया. यातील काही आकडे जाणून तुम्हाला धक्का बसेल. रेल्वे मंत्रालयाच्या २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या अहवालात रेल्वेला मिळालेल्या उत्पन्नाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार २०२२-२३ या आर्थिक वर्षात रेल्वेने २.४० लाख कोटी रुपयांचा महसूल नोंदवला. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे २५ % म्हणजेच सुमारे ४९ हजार कोटी अधिक आहे. भारतीय रेल्वेने मालवाहतुकीतून सर्वाधिक १.६२ लाख कोटी रुपयांची कमाई केली. यानंतर सर्वाधिक उत्पन्न प्रवासी सेवेतून आले आहे.
अहवालानुसार, प्रवाशांच्या महसुलातून ६३,००० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. रेल्वेला इतर कोचिंग महसूल म्हणून ५९५१ कोटी रुपये मिळाले. त्याचवेळी, विविध महसूल ८४४० कोटी रुपये होता. यामध्ये प्लॅटफॉर्मवरील जाहिराती, दुकानातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश आहे. कर्मचारी आणि इतर खर्च काढल्यानंतर उरलेला नफा रेल्वेच्या विकासात गुंतवला जातो.