‘टीव्ही’चे रिमोट कंट्रोल कसे काम करते?
आज टी.व्ही., म्युझिक सिस्टम अशी उपकरणे विनारिमोट वापरण्याची कल्पनाही करू शकत नाही. लांब बसून उपकरण वापरण्याकरिता आपण रिमोट कंट्रोल वापरतो. आपल्या हातातील रिमोट म्हणजे एक ट्रान्समीटर असतो. आपण जेव्हा टी.व्ही.चा आवाज कमी अथवा वाढविण्याकरिता रिमोटवरील बटण दाबतो तेव्हा त्या आज्ञेचं रूपांतर इलेक्ट्रानिक भाषेत (बायनरी कोड) होते. प्रत्येक बटणाशी निगडित कार्याचे विशिष्ट बायनरी कोड असते. बायनरी कोडमधील ही आज्ञा रिमोटमधून अवरक्त किरणांद्वारे उपकरण म्हणजेच रिसिव्हपर्यंत पोहोचते. उपकरणातील रिसिव्हर त्या अवरक्त किरणातील आज्ञा ग्रहण करतात. उपकरणातील मायक्रोप्रोसेसरला ही इलेक्ट्रॉनिक भाषा (बायनरी कोड) कळते व त्यानुसार क्रिया तो घडवून आणतो.
अवरक्त किरण या दृश्य प्रकाशापेक्षा अधिक तरंगलांबीच्या विद्युत चुंबकीय तरंग आहेत. हे किरण मानवी डोळ्यांना दिसत नाहीत. अशा प्रकारच्या अवरक्त प्रकाशाच्या मार्गात जर अडथळा आला तर तो ते पार करू शकत नाही. म्हणून रिमोट व उपकरण समोरासमोर असणे गरजेचे असते. याला तांत्रिक भाषेत ‘लाइन ऑफ साइट कम्युनिकेशन’ असे म्हणतात. हे रिमोट जास्तीत जास्त १०-१२ मीटर इतक्या अंतरापर्यंतच कार्यक्षम असतात.
पंखे व दिवे वापरण्याकरिता असलेले रिमोट कसे चालतात?
टि.व्ही. अथवा ए. सी. यामध्ये वापरलेल्या रिमोटमध्ये काही मर्यादा असतात. जशा त्या १०-१२ मीटर व समोरासमोर असणे गरजेचे असते. या दोन मर्यादांवर मात म्हणून रेडिओ तरंग वापरणारे रिमोट बनवले गेले. रेडिओ तरंग या प्रकाशापेक्षा अधिक तरंग लांबीच्या विद्युत चुंबकीय तरंग आहेत. रेडिओ तरंगाच्या मार्गात अडथळा असला तरी त्यांच्या आरपार ते जाऊ शकतात. असे रिमोट साधारण ३० मीटर लांबपर्यंत कार्यक्षम असतात. पंख्यातील काही रिमोट अवरक्त तरंग तर काही रेडिओ तरंग वापरतात. रिमोट कोणत्या प्रकारचा आहे हे जर जाणून घ्यायचे असेल तर रिमोट हाताखाली लपवून वापरावा. तशा स्थितीत वापरता येत असेल तर रेडिओ तरंग वापरणारा रिमोट आहे अन्यथा अवरक्त प्रकारातला आहे. रेडिओ तरंगाचा वापर हा कार लॉक करणे अथवा उघडणे, घराचे दरवाजे उघडणे अथवा बंद करणे इत्यादीसाठी वापरला जातो. आधुनिक युगात रेडिओ तरंग वापणाऱ्या रिमोटचा वापर सैन्यदल अनेक ठिकाणी करते. तसेच अग्निशमन दलही हल्ली आग विझवण्याच्या कामात काही ठिकाणी पाणी फवारण्यासाठी रिमोट कंट्रोलवर चालणारे छोटे वाहन वापरतात.
सुधा मोघे – सोमणी (मराठी विज्ञान परिषद, अंबरनाथ विभाग)