परीक्षेचा पेपर हातात येण्याआधी, एखादी मीटिंग सुरू होण्याआधी किंवा अनोळखी व्यक्तीस पहिल्यांदा भेटायला जाताना काही जणांच्या छातीत एकदम धडधडू लागते आणि घाम फुटतो. कसे होणार, काय होणार, मी हे करू शकेन का, असे अनेक प्रश्न मनात फेर धरून नाचू लागतात आणि अचानक भीती वाटू लागते. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का? जेव्हा आपण घाबरतो, तेव्हा आपला मेंदू कसा प्रतिसाद देतो?… तर आज आपण या लेखातून याविषयी अधिक जाणून घेणार आहोत.

नायर हॉस्पिटलच्या मानसोपचार तज्ज्ञ विभागातील सहायक प्राध्यापक प्राजक्ता पाटकर यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’शी या विषयावर चर्चा केली आहे. भीतीचे प्रकार, छोट्या किंवा निव्वळ क्षुल्लक गोष्टींसाठी घाबरणे योग्य आहे का? आपण घाबरतो तेव्हा मेंदू कसा प्रतिसाद देतो? भीती मनातून काढून टाकण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत, याबाबत मानसोपचार तज्ज्ञांनी माहिती सांगितली आहे.

chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
Fear, man behaviour, courage,
‘भय’भूती : …तर भयमुक्ती होईल
loksatta readers feedback
लोकमानस: संशय आणि असुरक्षिततेचा परिणाम
Loksatta kutuhal Fear of misuse of artificial intelligence
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गैरवापराची भीती
More intelligent planet in space with life forms may exist
आपल्यासारखे बुद्धिमान सजीव विश्वात अन्यत्र असतील का? त्यांच्याशी संपर्क होईल का?

मानसोपचारतज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे भीती, एन्झायटी, फोबिया असे भीतीचे तीन प्रकार आहेत. सुरुवातीला या तीन प्रकारांमधला फरक समजून घेऊ.

१. भीती – बाह्य भीती (एक्स्टर्नल). जेव्हा आपण जंगलातील प्राणी किंवा एखादा भयावह (हॉरर) चित्रपट पाहतो.

२. एन्झायटी – अंतर्गत भीती (इंटर्नल). एखादी गोष्ट आपल्याबरोबर घडली आहे याचा आपण सतत विचार करत राहतो. जसे की लैंगिक शोषण झालेलं असेल, लग्न मोडलेलं असेल इत्यादी.

३. फोबिया – फोबिया म्हणजेच निवडक (स्पेसिफिक) गोष्टींची भीती वाटणे. म्हणजे उंचावर गेल्यावर पोटात गोळा येणे किंवा कॅमेऱ्यासमोर बोलायला घाबरणे आदींचा यात समावेश होतो.

हेही वाचा…पुण्यातील प्रसिद्ध ‘सारसबाग’ कोणी बांधली? पाहा काय आहे इतिहास…

एकूणच, जेव्हा आपल्यासमोर एखादी गोष्ट घडत असते तेव्हा आपल्या मनात भीती असते. पण, हीच गोष्ट तुम्हाला काही दिवसांनी, महिन्यांनी किंवा वर्षांनी आठवली, तर ती एन्झायटी असते. पण, एन्झायटी ही दीर्घ काळ टिकते आणि भीती ही काही वेळेपुरतीच मर्यादित असते. उदाहरणार्थ- तुमच्यासमोर एखादा वाघ उभा आहे. तेव्हा पटकन तुम्ही घाबरून जाल. पण, जेव्हा हा वाघ तिथून निघून जाईल तेव्हा तुमच्या मनातून ही भीती आपोआप निघून जाईल. पण, हीच बाब एन्झायटीच्या बाबतीत खूप वेगळी असते. तुम्ही तुमच्यारोबर घडलेल्या एखाद्या वैयक्तिक गोष्टीचा सतत विचार करीत असाल, तर ती गोष्ट वा तो प्रसंग तुमच्या मनात कायमचा किंवा दीर्घ काळासाठी घर करून राहतो.

जेव्हा तुम्ही घाबरता, तेव्हा तुमचा मेंदू कसा प्रतिसाद देतो?

अमिग्डाला (amygdala) म्हणून आपल्या मेंदूमध्ये एक छोटासा भाग असतो. आपल्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटली की मग ती अंतर्गत असो किंवा बाह्य तेव्हा हा मेंदूतील अमिग्डाला प्रतिसाद द्यायला सुरुवात करतो. अमिग्डाला फाईट किंवा फ्लाईट (fight or flight response) असा प्रतिसाद देतो. म्हणजे घडतं असं की, मेंदूतील हा छोटासा भाग अमिग्डाला शरीरास सिग्नल पाठविण्यास सुरुवात करतो आणि सिग्नलमुळे शरीरात हार्मोन्स तयार होतात. या हार्मोन्समुळे शरीराला घाम फुटणं, हृदयाचे ठोके अचानक वाढू लागणं, छातीत धडधड होणं, एकदम गळल्यासारखं वाटणं, उलटी होणं, तर काही लोकांना इतकी भीती वाटते की, त्यांना कपड्यांमध्येच लघवीसुद्धा होते. तर, शरीरात होणारे हे बदल याच हार्मोन्समुळे होत असतात. उदाहरणार्थ भीती वाटल्यावर हृदयाचे ठोके अचानक वाढू लागतात. हे कदाचित माझ्या बाबतीत घडले पण, हेच तुमच्या बाबतीत होईल, असं नाही. त्यामुळे प्रत्येकाची भीती, एन्झायटी, फोबिया वेगवेगळ्या प्रकारे शरीरातून प्रकट होऊ शकतात. कारण- प्रत्येकाचं शरीर वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद देत असते.

जेव्हा आपण घाबरतो तेव्हा प्रत्येकाच्या मेंदूतील अमिग्डालाचा छोटासा भाग फाईट किंवा फ्लाईट ही प्रणाली कार्यान्वित करतो. म्हणजेच आपल्याला कोणत्याही गोष्टीची भीती वाटली की, आपला मेंदू दोन प्रकारांमध्ये प्रतिसाद देतो. ‘एक तर मला इथून पळून जायचं आहे किंवा मी इथे उभं राहून या प्रसंगाला सामोरा जाणार’. तर याच दोन प्रतिसादांना फ्लाईट प्रतिसाद (flight response) व फाईट प्रतिसाद (fight response) असे म्हणतात; जे मेंदूतील अमिग्डालाचा छोटासा भाग करतं. आपण घाबरतो किंवा आपल्याला भीती वाटते तेव्हा आपला मेंदू तशा प्रकारे काम किंवा कार्य करतो. एकूणच मेंदूमध्ये भावना निर्माण होतात आणि आपलं शरीर त्यावर प्रतिक्रिया देत असतं.

हेही वाचा…जगातील सर्वात लांब चोच असणारा पक्षी कोणता माहितीय का? जाणून घ्या….

काही जणांना भयावह (हॉरर) चित्रपट पाहायला आवडतात किंवा ते असे चित्रपट पाहताना खूप हसतात; मग त्यांना भीती वाटत नाही का?

तर अशा लोकांनासुद्धा भीती ही वाटतेच. पण, कसं असतं की, त्यांना या गोष्टीची कल्पना असते की, थिएटरमधील पडदा, टीव्ही, मोबाईल किंवा संगणकावर पाहिले जाणारे हे चित्रपट चित्रित केलेले असतात. त्यामुळे असे चित्रपट पाहताना त्यांना सहसा भीती वाटत नाही. पण, हेच जर त्यांच्याबरोबर प्रत्यक्षात घडलं, तर मात्र त्यांनाही तितकीच भीती वाटणार एवढं नक्की.

मनातून भीती काढून टाकण्यासाठी डॉक्टरांचा किंवा मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा का?

बऱ्याच लोकांना असं वाटतं की, अरे, या व्यक्तीचा स्वभावच भित्रा आहे. बऱ्याच लोकांचा भित्रा स्वभाव असतो. पण, छोट्या छोट्या गोष्टींसाठी भीती वाटणं, घाबरून जाणं, समोरची व्यक्ती काय विचार करेल हे आपण ठरवून चारचौघांत न बोलणं, असं तुमच्याबरोबर होत असेल, तर ही अगदीच चिंतेची बाब आहे. त्यामुळे कधी कधी आपण स्वतःला हा प्रश्न विचारतो की, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींना मी का घाबरते वा घाबरतो आहे? तर अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला किंवा मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कारण- या गोष्टीवरही मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार असतात. मानसोपचार तज्ज्ञ पहिल्याच भेटीत औषध सुरू करीत नाहीत; ज्यांना गरज असते, त्यांनाच ही औषधं दिली जातात आणि ती कायमस्वरूपीही नसतात. तर, ही औषधं सुरुवातीला नियमित घेऊन, ती हळूहळू कमी करून नंतर बंद करायची असतात. पण, या सगळ्या गोष्टी एखाद्या व्यक्तीचं शरीर कसं प्रतिसाद देत यावर अवलंबून असतात. तसेच तुम्ही यावर वेळीच उपचार घेतले नाहीत, तर या भीती, एन्झायटी, फोबियाचा परिणाम तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनावरसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे कामात लक्ष न लागणं, चारचौघांत न मिसळणं किंवा तुमचा आत्मविश्वास कमी होणं आदी समस्या उद्भवू शकतात.

भीती मनातून काढून टाकण्यासाठी घरी सराव करू शकतो का ?

मनातून भीती काढून टाकण्यासाठी तुम्ही घरी सराव करू शकता. त्यामध्ये ध्यान करणं, श्वासोच्छवासाचा व्यायाम, तर दिवसातून एकदा आरशासमोर उभं राहून स्वतःशी संवाद साधणं किंवा तुम्हाला आवडणाऱ्या एखाद्या गोष्टीत मन रमवणं; जसं की, डान्स, पेंटिंग, शिवणकाम इत्यादी. पण, याव्यतिरिक्त एकदा मूल्यांकन (EVALUATE) करणं गरजेचं आहे की, फक्त घरी ध्यान, श्वासोच्छवासाचा व्यायाम यांचा सराव करून ही भीती जाणार आहे का? कारण- आपल्याला सतत का भीती वाटते आहे हेसुद्धा काही जणांना सांगता येत नाही. त्यामुळे याचे वैयक्तिक कारण जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा किंवा मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणं किंवा भेट घेणं आपल्या सगळ्यांसाठीच फायदेशीर ठरू शकतं. त्या आधारे आपण भीतीवर यशस्वी मात करू शकतो.