Dog tracking criminals माणसाने उत्क्रांतीच्या प्रारंभिक टप्प्यामध्ये जो प्राणी सर्वप्रथम पाळला किंवा ज्याला रानटी जनावरापासून पाळीव केलं तो म्हणजे कुत्रा. अगदी अश्मयुगीन कालखंडापासून ते आतापर्यंत कुत्रा या प्राण्याने मानवाची इमाने-इतबारे सेवा केली आहे. आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहतो चोरी किंवा खून होतो आणि गुन्हेगार पळून जातो. मग पोलीस आपल्या कुत्र्याला आणतात. त्याला गुन्ह्याच्या जागेवर काही वेळ फिरायला देतात. कुत्रा तिथल्या काही जागा आपल्या नाकाने हुंगतो आणि मग विशिष्ट दिशेने पळत सुटतो. त्याची साखळी धरून मग त्याला हाताळणारा पोलीस अधिकारी व इतरही त्याच्या पाठोपाठ पळत निघतात. एका ठिकाणी उभा राहून कुत्रा जोरजोराने भुंकायला लागतो. पोलीस तिथे शोध घेतात आणि गुन्हेगाराला मुद्देमालासह पकडतात. गुन्हा घडून काही काळ गेलेला असला तरी कुत्र्याच्या मदतीने पोलिसांना गुन्हेगारांना शोधण्यात यश येते. हे चित्रपटातील दृश्य असलं तरी हे चित्रण वास्तववादी आहे. पोलीस खरोखरच अनेक वेळा गुन्ह्याच्या शोधासाठी कुत्र्यांची मदत घेतात. परंतु असे का? कुत्रा या प्राण्यात असे वेगळेपण काय आहे? हे जाणून घेणे नक्कीच माहितीपूर्ण ठरावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अधिक वाचा: चिंचेच्या झाडाखाली झोपणे वैज्ञानिकदृष्ट्या निषिद्ध का मानले जाते?

कुत्रा हा कॅनिस वंशाचा प्राणी

मराठी विश्वकोशात म्हटले आहे की, कुत्रा हा सस्तन- वर्गाच्या मांसाहारी गणातल्या कॅनिडी कुलातील कॅनिस वंशाचा प्राणी आहे. लांडगा (कॅनिस ल्युपस), कोल्हा (कॅनिस ऑरियस), कोयोट (कॅनिस लॅट्रॅन्स) हे इतर जंगली प्राणी याच वंशातील आहेत. या सर्व प्राण्यांची शरीररचना, हाडांचा सांगाडा यामध्ये पुष्कळच साम्य आहे पण आकार, कातडी, केस व रंग ह्यांमध्ये फरक आहेत. कुत्र्याच्या वंशातील वर उल्लेखिलेल्या सर्व जातींमध्ये संकर होऊ शकतो व संकरित प्रजा प्रजोत्पादनक्षम असते म्हणून कुत्रा ह्या प्राण्याच्या उत्पत्तीचा विचार करताना कोल्हा व लांडगा हे कुत्र्याचे पूर्वज असावेत असे दिसते. याच कारणासाठी माणसाळलेल्या कुत्र्याच्या सर्व जाती कॅनिस फॅमिलिॲरिस या जातिविशिष्ट नावाने ओळखल्या जातात. कुत्र्यांच्या जंगली जातींमध्ये ऑस्ट्रेलियातील डिंगो, आफ्रिकेतील केप हंटिंग, अमेरिकेतील कॅरॅसिसी, भारतातील ढोले व चीनमधील रॅकून ह्या जातींचा समावेश आहे.

जगभरात गुन्हेगारांच्या शोधासाठी जर्मन शेफर्ड (erman Shepherd), बेल्जियन मालिनॉइस (Belgian Malinois), ब्लडहाऊंड (Bloodhound), डच शेफर्ड (Dutch Shepherd) आणि लॅब्राडोर रिट्रीव्हर (Labrador Retriever) या जाती पसंत केल्या जातात.

जर्मन शेफर्ड/ German Shepherd (सौजन्य: विकिपीडिया)

अधिक वाचा: बोंबिलाला ‘बॉम्बे डक’ का म्हणतात? हा मासा नाही, तर बदक आहे का?

कुत्र्यांना गुन्हेगाराचा सुगावा कसा लागतो?/ How are dogs used to detect thieves?

डॉ. बाळ फोंडके यांनी आपल्या ‘कसं’ या पुस्तकात कुत्रा गुन्हेगाराचा शोध कसा लावतो याबद्दल सविस्तर विश्लेषण दिले आहे. कुत्र्यांची गंधज्ञानाची शक्ती मानवी गंधज्ञानाच्या क्षमतेपेक्षा ५० पटीने जास्त तीव्र असते. तरीही कोणत्याही कुत्र्याला केवळ गंधाद्वारे गुन्हेगाराचा सुगावा लावता येत नाही. त्यासाठी कुत्र्याच्या या अंगभूत गंधशक्तीचा हवा तसा उपयोग करून घेण्यासाठी त्याला प्रशिक्षण देणे गरजेचे ठरते. आपल्या सगळ्यांच्याच शरीराला विशिष्ट गंध असतो. तो ओळखण्याची क्षमता कुत्र्यांजवळ असते. ती अधिक सक्षम होण्याकरिता प्रशिक्षण देणे गरजेचे असते. या प्रक्रियेत प्रशिक्षणकर्त्याच्या हाताचा गंध किंवा इतर स्रावांचा स्पर्श ज्या वस्तूला झाला आहे, ती वस्तू लपवून ठेवली जाते. त्यानंतर त्या प्रशिक्षणकर्त्याचा हाताचा गंध कुत्र्याला हुंगवला जातो. त्याची ओळख पटवून त्यानं आपल्या स्मृतिकोशात ती साठवली आहे याची खात्री पटली, की त्याला मग त्या मैदानात मोकळं सोडलं जात. त्या वस्तूला चिकटलेल्या प्रशिक्षकाच्या शरीरगंधाचे रेणू हवेत उडत असतात. त्यांचा वेध घेत कुत्रा नेमका त्या वस्तूजवळ पोहोचतो. याच गंधशक्तीचा वापर करून मादक पदार्थांचा छडा लावण्याचं प्रशिक्षणही कुत्र्यांना दिल जात. ते इतकं प्रभावी ठरत की, असे पदार्थ कपड्यांमध्ये गुंडाळून त्यांचा वास लपवण्याचा प्रयत्न झाला किंवा त्या पदार्थांच्या पार्सलवर सुगंधाचा फवारा मारून दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला तरी त्यात यश येत नाही. कुत्रा त्या बेकायदा पदार्थांचा नेमका वेध घेतोच घेतो. अशा प्रकारे कुत्र्याच्या गंधशक्तीची वापर गुन्हेगाराचा छडा लावण्यासाठी पोलिसांतर्फे केला जातो.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How dogs track criminals the science and training behind canine crime detection svs