आंबा हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय, त्यात जर हापूस असेल तर विचारायलाच नको. फळांचा राजा म्हणून हापूस आंब्याला ओळखल जाते. उन्हाळा सुरु झाला की अनेकांना हापूस आंब्याची चाहूल लागते. आंबा असा शब्द उच्चारला तरी आपल्या डोळ्यासमोर गोड, रसाळ, पिवळसर केशरी रंगाचा ‘हापूस आंबा’ दिसायला लागतो. यात कोकणातील हापूस आंबा हा भारतासह जगभरात प्रसिद्ध आहे. पण भारतासह परदेशात प्रसिद्ध झालेला आंब्याला ‘हापूस’ हे नाव कसे पडले? तसेच हा शब्द मराठी भाषेत नेमका कुठून आला? यामागची रंजक गोष्ट जाणून घेऊ…
महाराष्ट्रात आंब्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूरसह अनेक राज्यांमध्ये आंब्याच्या बागा आहेत. पण यात कोकणातील विशेषत: सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये आंब्यांची मोठ्या प्रमाणात लागवड होते, तसेच याच भागातून मोठ्याप्रमाणात आंबे मुंबईसह परदेशात निर्यात होतात. पण या आंब्याला ‘हापूस’ हे नाव कसे पडले हे आपण ‘कहाणी शब्दांची : मराठी भाषेच्या जडणघडणीची’ या पुस्तकात लेखक सदानंद कदम यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे जाणून घेऊ….
आंब्याला ‘हापूस’ हे नाव कसे पडले?
‘आंबा खावा तर तो हापूसच. त्याची चव दुसच्या कोणत्याच आंब्याला यायची नाही’ हे वाक्य आंब्याच्या सीझनमध्ये हमखास ऐकायला मिळते. या नावावरुन एक मराठी चित्रपटही आला होता. पण आंब्याला हे नाव आलं कुठून? कोणी याचं हे नामकरण केलं? याचा शोध जातो तो थेट पोर्तुगीजांपर्यंत. पहिल्यांदा भारतात या जातीचा आंबा लावला तो पोर्तुगीजांनी. पण तो सुद्धा गोवा प्रांतात. तिथून तो कोकणभर पसरला आणि आता तर साऱ्या जगभर. या आंब्याचे मूळ नाव ‘आल्फोन्सो’ असे होते, जे पोर्तुगीज भाषेतील आहे. पण कालांतराने झालं अपूस आणि मग महाराष्ट्रात येईपर्यंत त्याचं झालं हापूस…. यात देवगड हापूस आंब्याने साऱ्या जगात नाव कमावलं. इथला हापूस आंबा इतका महाग विकला जातो की अनेकदा तो सर्वसामान्य लोकांना विकत घेणं परवडत नाही.
बाजारपेठांमध्ये आज कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, बिहार, तेलंगणा राज्यांतूनही मोठ्याप्रमामात आंबे येतात. हे आंबे हल्ली अनेक आंबा विक्रेते हापूसच्या नावाने खपवतात. पण हापूस तो हापूस. त्याची चव, गंध दुसऱ्या कोणत्याच आंब्याला येणार नाही, विशेष म्हणजे हात धुतल्यानंतरही गंध दरवळत राहतो आणि जिभेवर मधुर चव रेंगाळत राहते.
आज महाराष्ट्रात आंब्याच्या दहाहून अधिक जाती आहेत. यात पायरी, तोतापुरी, गोवा माणकूर, सुवर्णरेखा, नीलम, दशेरी, लंगडा, केसर बेंगनपल्ली, हिमसागर, बनेशन, ओलूर समावेश आहे, पण यातील कोणत्याच आंब्याला हापूसची चव येणार नाही.