Stock Market Word History : स्टॉक मार्केट म्हणजे शेअर्सची खरेदी-विक्री होणारी जागा, जिथे गुंतवणूकदार शेअर्स विकत घेतात किंवा खरेदी करतात. याला इक्विटी मार्केट किंवा शेअर मार्केट, असंही म्हणतात. कंपन्यांची मालकी हक्क सांगणारा तुकडा म्हणजे शेअर किंवा स्टॉक आणि जिथे या शेअर्सची खरेदी-विक्री होते, त्यास मार्केट म्हणतात. पण तुम्हाला माहितीये का, स्टॉक मार्केट हा शब्द कसा अस्तित्वात आला? आज आपण त्या विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

स्टॉक मार्केट शब्द कसा अस्तित्वात आला? (Origins of the Stock Market Word)

‘स्टॉक’ हा शब्द लक्षात घेतला, तर जुन्या इंग्रजीमध्ये ‘स्टॉक’चा अर्थ झाडाचे खोड (स्थिरतेचे प्रतीक), असा होता. त्यानंतर त्याचा अर्थ मूल्य किंवा मालकीचा साठा, असा झाला. स्टॉक मार्केट हा शब्द ‘स्टॉक’ या शब्दाचा गुंतवणूक अर्थाने (म्हणजे कंपनीच्या मालकीचे शेअर्स) ‘मार्केट’ म्हणजे खरेदी-विक्री करण्याची जागा या अर्थाने अस्तित्वात आला.

स्टॉक मार्केट या शब्दाचा पहिला ज्ञात वापर १८०९ मध्ये झाला. कंपनीचे शेअर्स खरेदी-विक्री करण्याची संकल्पना पूर्वी अस्तित्वात असतानासुद्धा ‘स्टॉक मार्केट’ हा शब्द या स्टॉकच्या खरेदी-विक्रीच्या एकत्र ठिकाणांचे वर्णन करण्याच्या दृष्टीने उदयास आला.

पहिले शेअर मार्केट (History of first share Market)

स्टॉक मार्केट हा शब्द शोधून काढण्याचे श्रेय एका व्यक्तीला दिले जात नाही; पण कंपन्यांच्या शेअरची संकल्पना युरोपमध्ये संयुक्त शेअर कंपन्यांसह सुरू झाली. शेअर मार्केटचा इतिहास हा शेकडो वर्षांपूर्वीचा आहे. जरी पहिले शेअर मार्केट १६११ मध्ये अॅमस्टरडॅममध्ये सुरू झाले असले तरी १७०० च्या दरम्यान अमेरिकेने शेअर बाजारात प्रवेश केला नव्हता, तेव्हाच व्यवसाय करणाऱ्या एका लहान गटाने बटनवूड ट्री करार केला. पुरुषांचा हा गट स्टॉक आणि बाँडची खरेदी आणि विक्री करण्यासाठी दररोज एकत्र येत असे, जो आज आपण न्यू यॉर्क स्टॉक एक्स्चेंज (NYSE) म्हणून ओळखतो.

भारतातील पहिले शेअर मार्केट म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) होय. या शेअर मार्केटची स्थापना ९ जुलै १८७५ रोजी झाली. हे आशियातील सर्वांत जुने स्टॉक एक्स्चेंज मार्केट आहे.